आयुष मंत्रालय
आयुष मंत्रालयाने जागतिक होमिओपॅथी दिन 2025 निमित्त गांधीनगर येथे एका महासंमेलनात जागतिक होमिओपॅथी क्षेत्रातील हितसंबंधियांना आणले एकत्र
Posted On:
10 APR 2025 8:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2025
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटरमध्ये जागतिक होमिओपॅथी दिन, 2025 मोठ्या उत्साहात साजरा केला. होमिओपॅथीचे संस्थापक डॉ. सॅम्युअल हानेमान यांच्या 270 व्या जयंतीनिमित्त होमिओपॅथीमधील जागतिक मान्यवरांना एकत्र आणण्यासाठी मंत्रालयाने त्यांच्या सर्वोच्च संशोधन आणि शैक्षणिक संस्था - सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी (सीसीआरएच), नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी (एनसीएच) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी (एनआयएच) यांच्या माध्यमातून दोन दिवसांचा हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या भव्य समारंभात 'होमिओपॅथीमधील शिक्षण, सराव आणि संशोधन' या संकल्पनेवर भर देण्यात आला आणि भारत तसेच परदेशातील 8,000 पेक्षा जास्त प्रतिनिधींचा सहभाग दिसून आला, ज्यात शिक्षणतज्ज्ञ, चिकित्सक, संशोधक, विद्यार्थी आणि उद्योग व्यावसायिकांचा समावेश होता. या कार्यक्रमात पॅनेल चर्चा, प्रदर्शने, वैज्ञानिक पेपर सादरीकरण आणि जागतिक तसेच राष्ट्रीय आरोग्य सेवा प्रणालींचा अविभाज्य घटक म्हणून होमिओपॅथीला पुढे नेण्याबाबत चर्चा करण्यात आली.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला गुजरात सरकारचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी जागतिक पारंपरिक औषध प्रणालींमधील भारताच्या नेतृत्वावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "होमिओपॅथी हा केवळ एक पर्याय नाही - ते करुणा आणि पुराव्यांवर आधारित विज्ञान आहे. या जागतिक होमिओपॅथी दिनी आम्ही संशोधन, शिक्षण आणि सार्वजनिक संपर्काद्वारे त्याची व्याप्ती वाढविण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो."
या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी यजमान राज्य म्हणून गुजरातची निवड केल्याबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात आयुष मंत्रालयाचे कौतुक केले. आधुनिक आरोग्यसेवेमध्ये होमिओपॅथीच्या वाढत्या प्रासंगिकतेवर त्यांनी भर दिला तसेच सार्वजनिक आरोग्य सेवा आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये होमिओपॅथीचे एकत्रीकरण करण्याच्या मंत्रालयाच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

बीजभाषण करताना आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी सांगितले की "हा प्रसंग म्हणजे डॉ. हानेमान यांच्या दूरदर्शी उपचार पद्धतीला श्रद्धांजली आहे. पुराव्यावर आधारित, एकात्मिक आणि रुग्ण-केंद्रित आरोग्यसेवेची वाढती मागणी पाहता भविष्यातील पिढ्यांना सेवा देण्यासाठी होमिओपॅथी हा चांगला पर्याय आहे. आयुष मंत्रालय मजबूत संशोधन, शिक्षण आणि धोरणाद्वारे त्याचा प्रभाव वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे.”
उद्घाटन समारंभात मान्यवरांनी एक अधिवेशन स्मरणिका, आठ नवीन प्रकाशने, सीसीआरएच ग्रंथालय आणि होमिओपॅथी अभिलेखागाराचे ई-पोर्टल तसेच औषध सिद्धतेवरील एक माहितीपट यांचे प्रकाशन केले, ज्यामध्ये या क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधन आणि दस्तऐवजीकरण कार्याचे प्रदर्शन करण्यात आले आहे.
या परिसंवादात होमिओपॅथी उद्योगाचे आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रदर्शन देखील भरविण्यात आले होते, जे शैक्षणिक आणि उद्योगांना जोडणारे ठरले. विद्यार्थी आणि व्यावसायिकांमध्ये नवोपक्रमाला चालना देण्यासाठी अशा प्रकारची राष्ट्रीय स्तरावरील पहिली स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती.
* * *
M.Pange/N.Mathure/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2120790)
Visitor Counter : 42