गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली श्रीनगरमध्ये उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक संपन्न


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, सरकार जम्मू आणि काश्मीरमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कटिबद्ध

जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी समन्वित दृष्टिकोन ठेवून प्रयत्न सुरू ठेवण्याचे गृहमंत्र्यांचे सर्व सुरक्षा संस्थांना निर्देश

Posted On: 08 APR 2025 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 एप्रिल 2025

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या श्रीनगरमध्ये उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार जम्मू आणि काश्मीरमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कटिबद्ध आहे. बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवादाशी निगडित घटना, घुसखोरी आणि दहशतवादी संघटनांमध्ये तरुणांची भरती यामध्ये लक्षणीय घट झाल्याबद्दल सुरक्षा संस्थांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरणाचा त्यांनी पुनरुच्चार केला. मोदी सरकारच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांमुळे, जम्मू आणि काश्मीरमध्ये आपल्या देशाच्या शत्रूद्वारे  पोसलेली संपूर्ण दहशतवादी परिसंस्था कमकुवत  झाली आहे असे शाह यांनी नमूद केले. 

अमित शाह यांनी सर्व सुरक्षा संस्थांना जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी समन्वित दृष्टिकोनाने प्रयत्न सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. क्षेत्र अधिपत्य योजना आणि शून्य दहशतवाद योजनेची अंमलबजावणी मिशन मोडमध्ये सुनिश्चित केली पाहिजे असेही निर्देश त्यांनी दिले. सर्व संस्थांनी समन्वयाने काम करत राहावे जेणेकरून केंद्रशासित प्रदेशात कलम 370 रद्द केल्यानंतर मिळालेले यश अबाधित राहील आणि 'दहशतवादमुक्त जम्मू-काश्मीर'चे ध्येय लवकरात लवकर साध्य करता येईल याकडे गृहमंत्र्यांनी लक्ष वेधले. हे ध्येय साध्य करण्यासाठी मोदी सरकार आवश्यक असलेली सर्व संसाधने पुरवत असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी या वर्षी 3 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या श्री अमरनाथजी यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला आणि ही पवित्र यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे निर्देश संबंधित एजन्सींना दिले.

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2120241) Visitor Counter : 23