कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि इस्रायलचे कृषी आणि अन्न सुरक्षा मंत्री अवि डिक्टर यांच्यात चर्चा


कृषी क्षेत्रातील सहकार्य बळकट करण्यासाठी करारावर स्वाक्षऱ्या

फलोत्पादन क्षेत्रात भारत आणि इस्रायल दरम्यान, कार्य आराखड्याची देवाणघेवाण

अन्न सुरक्षा, तंत्रज्ञान हस्तांतरण, दर्जेदार बियाणे, सीओईचा विस्तार, संशोधन आणि विकास, कीटक व्यवस्थापन, क्षमता उभारणी आणि सुगीच्या हंगामातील तंत्रज्ञान यावर काम करण्याबाबत दोन्ही देशांची सहमती

Posted On: 08 APR 2025 9:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 एप्रिल 2025

 

कृषी आणि अन्न सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी, आज नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कृषी विज्ञान संकुलातील आंतरराष्ट्रीय गेस्ट हाऊसमध्ये  केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान आणि इस्रायलचे कृषी आणि अन्न सुरक्षा मंत्री  अवि डिक्टर यांच्यात एक उच्चस्तरीय बैठक झाली. इस्रायलचे कृषी आणि अन्न सुरक्षा मंत्री म्हणून  अवि डिक्टर यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे.

दोन्ही देशांनी आज नवी दिल्ली येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कृषी सहकार्य करार आणि कार्य आराखड्यावर स्वाक्षरी करून परस्परांमधील कृषी भागीदारी मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या करारामुळे मृदा आणि जल व्यवस्थापन, फलोत्पादन आणि कृषी उत्पादन, सुगीच्या हंगामातील आणि प्रक्रिया तंत्रज्ञान, कृषी यांत्रिकीकरण, पशुसंवर्धन आणि संशोधन आणि विकास या क्षेत्रातील सहकार्य बळकट होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था बनत असल्यावर शिवराज सिंह चौहान यांनी भर दिला.

भारत आणि इस्रायल  यांच्यात अतिशय घनिष्ठ संबंध आहेत आणि  दोन्ही देश, उच्च उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचा विकास आणि तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रात एकत्र काम करू शकतात असे इस्रायलचे कृषी आणि अन्न सुरक्षा मंत्री अवि डिक्टर यांनी अधोरेखित केले. हवामान बदलाच्या आव्हानांचा विचार करता भविष्यात अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कृषी क्षेत्रात नवोन्मेष आवश्यक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

अन्न सुरक्षा, तंत्रज्ञान हस्तांतरण, उच्च दर्जाच्या बियाण्यांचा विकास, उत्कृष्टता केंद्रांचा विस्तार (CoE), संशोधन आणि विकास, कीटक व्यवस्थापन, क्षमता बांधणी आणि सुगीच्या हंगामातील तंत्रज्ञानाची प्रगती यासारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांसंदर्भात एकत्रित काम करण्याच्या आवश्यकतेबाबत दोन्ही बाजूंकडून सहमती दर्शवण्यात आली.  याव्यतिरिक्त, कृषी उत्पादकता आणि शाश्वतता वाढविण्यासाठी पंचवार्षिक बियाणे सुधारणा योजनेच्या शक्यता  तपासण्याबाबत  त्यांनी सहमती दर्शविली. 

वाढती लोकसंख्या आणि जमीन धारणेत होणारी घट या आव्हानांचा विचार करून, शिवराज सिंह चौहान यांनी कृषी उत्पादकता वाढवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. सुधारित बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी भारतीय आणि इस्रायली शास्त्रज्ञांमधील सहयोगी प्रयत्नांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. या बैठकीत शेतीशी संबंधित विविध नवोन्मेष आणि इतर महत्त्वाच्या मुद्यांवरही चर्चा झाली.

इस्रायली बाजूने भारताच्या डिजिटल कृषी मोहिमेत आणि  ज्या प्रकारे ती भारतातील शेतकऱ्यांचे  सक्षमीकरण करत आहे त्यामध्ये स्वारस्य दाखवण्यात आले. 

दोन्ही देशांनी कृषी क्षेत्रातील आव्हाने आणि प्राधान्यक्रमांची देवाणघेवाण केली आणि फलोत्पादन क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या सहकार्याचा आढावा घेतला. त्यांनी बाजारपेठ उपलब्धतेशी संबधित मुद्यांबाबतही परस्परांशी विचारविनिमय केला.

 

* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2120230) Visitor Counter : 29