गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन अनुकंपा तत्त्वावर 9 जणांना नियुक्तीपत्रे केली सुपूर्द
देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे: केंद्रीय मंत्री अमित शाह
Posted On:
07 APR 2025 9:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 एप्रिल 2025
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी आज जम्मू-काश्मीरमधील शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि नऊ नामनिर्देशित व्यक्तींना नियुक्तीपत्रे सुपूर्त केली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी शहीद पोलिसांना आदरांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, साडेतीन दशकांहून अधिक काळ जम्मू-काश्मीरने दहशतवादाचे विनाशकारी परिणाम भोगले आहेत. देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज दहशतवाद संपुष्टात आणण्यात आणि फुटीरतावादी विचारसरणीचा बिमोड करण्यात लक्षणीय प्रगती झाल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवादाला आळा बसला आहे, मात्र तो पूर्णपणे संपला नाही, त्यामुळे आमचे उद्दिष्ट अजूनही पूर्ण झाले नाही, असेही शहा म्हणाले.
शहीद एसजीसीटी जसवंत सिंह यांचा मुलगा युवराज सिंह, 18 वर्षांचा झाल्यावर त्याची अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करण्यासाठी जम्मू-काश्मीर सरकारने सकारात्मक पावले उचलावीत, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले. आपण सर्वांनी शहिदांचा आदर्श ठेवून कर्तव्य, सन्मान आणि भारत मातेप्रति अतूट प्रेम ठेवावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्र्यांनी केले. शहिदांचे बलिदान,त्याग, धाडस आणि वचनबद्धता आपल्या हृदयावर कोरली जाईल, आणि त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्याची प्रेरणा देत राहील, असे ते म्हणाले.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचा जम्मू-काश्मीर दौरा, जम्मू-काश्मीरमध्ये शांतता आणि समृद्धी आणण्यासाठी, विशेषत: पायाभूत सुविधांचा विकास आणि सुरक्षा स्थिती मजबूत करण्यासाठी असलेली भारत सरकारची निरंतर वचनबद्धता प्रतिबिंबित करतो.
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2119905)
Visitor Counter : 14