दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
ट्रायच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या कॉल्सपासून ग्राहकांनी सावध राहण्याचे ट्रायचे आवाहन
Posted On:
07 APR 2025 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 एप्रिल 2025
ट्राय, अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अधिकारी असल्याचे भासवून दूरध्वनी कॉल अथवा संदेशाद्वारे ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या बातम्या अलीकडे प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. फसवणूक करणाऱ्यांकडून ग्राहकांना दूरध्वनी कॉल अथवा संदेशाद्वारे लक्ष्य केले जात असून, बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल अथवा पैसे उकळण्यासाठी मोबाइल कनेक्शन (जोडणी) तोडण्याची धमकी दिली जात आहे.
यासंदर्भात ट्राय ने स्पष्टीकरण दिले आहे की, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय), मेसेजद्वारे अथवा अन्य कोणत्याही स्वरुपात मोबाइल नंबरचे कनेक्शन तोडण्याबाबत ग्राहकांशी संवाद साधत नाही. ट्रायने कोणत्याही अन्य संस्थेला या कामासाठी ग्राहकांशी संपर्क साधण्याचा अधिकार दिलेला नाही. त्यामुळे ट्रायकडून असल्याचा दावा करणारे कोणत्याही प्रकारचे संवाद (कॉल, मेसेज अथवा नोटीस) अथवा मोबाइल नंबरचे कनेक्शन तोडण्याची धमकी, हा संभाव्य फसवणुकीचा प्रयत्न मानला जावा आणि त्याची दखल घेऊ नये.
बिलिंग, केवायसी अथवा गैरवापर झाल्या प्रकरणी एखाद्या मोबाइल क्रमांकाचे कनेक्शन तोडण्याचे काम संबंधित टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर (टीएसपी), अर्थात दूरसंचार सेवा प्रदाता करतो. नागरिकांनी सतर्क राहावे आणि संभाव्य फसवणुकीला बळी पडून घाबरून जाऊ नये, असे आवाहन ट्राय ने केले आहे. संबंधित टीएसपीचे अधिकृत कॉल सेंटर अथवा ग्राहक सेवा केंद्रांशी संपर्क साधून अशा कॉल्सचे क्रॉस-व्हेरिफिकेशन (पडताळणी) करण्याची सूचना दिली आहे.
सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीसाठी दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्यासाठी, ग्राहकांनी दूरसंचार विभागाच्या संचार साथी व्यासपीठावर चक्षू सुविधेद्वारे संशयास्पद फसवणुकीची तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे. या व्यासपीठावर प्रवेश करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करावे: https://sancharsaathi.gov.in/sfc/.
सायबर गुन्हा झाल्याची खात्री पटल्यावर पीडितांनी '1930' या निर्धारित सायबर क्राइम हेल्पलाइन क्रमांकावर अथवा https://cybercrime.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी.
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2119835)
Visitor Counter : 23