आयुष मंत्रालय
हरित योगामुळे वैयक्तिक व पृथ्वीच्या आरोग्याचे पोषण – केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव
प्रविष्टि तिथि:
07 APR 2025 4:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 एप्रिल 2025
भुवनेश्वरमध्ये कलिंगा मैदानावर योग करणाऱ्या 6000 पेक्षा अधिक उत्साही व्यक्तींनी आज एकाच वेळी सामान्य योग प्रात्यक्षिके सादर केली. हरित योग नावाच्या या अनोख्या कार्यक्रमाची सुरुवात, केंद्रिय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते औषधी वनस्पतींची रोपे लावून करण्यात आली. योग प्रात्यक्षिक सादरीकरणासाठी उपस्थित सर्व व्यक्तींना औषधी वनस्पतींची रोपे देण्यात आली.

या कार्यक्रमात बोलताना मंत्री म्हणाले, “गेल्या 10 वर्षात योगाला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली आहे आणि आता ही एक वैश्विक भावना बनली आहे. 30 मार्च 2025 रोजीच्या मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दैनंदिन आयुष्यातील आरोग्यसंपन्नतेच्या महत्त्वावर भर देऊन आंतरराष्ट्रीय योग दिनासारख्या उपक्रमांची प्रशंसा केली होती. जगातल्या लोकांच्या आरोग्याबाबत भारताचा दृष्टीकोन विशद करताना पंतप्रधानांनी नमूद केले होते की, ‘एक धरती एक आरोग्यासाठी योग’ ही 2025 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे. ही संकल्पना संपूर्ण जगाच्या समग्र आरोग्याची हमी देणारी आहे.”
हरित योग उपक्रमाबाबत बोलताना मंत्री म्हणाले, “आपले आरोग्य पृथ्वीच्या आरोग्याशी अविभाज्यपणे निगडीत आहे. जसे योगामुळे आपल्या मन व शरीराचे पोषण होते तसेच वृक्षारोपणामुळे पृथ्वीचे पोषण होते आणि आगामी पिढ्यांच्या आरोग्यपूर्ण, हरित भविष्याची हमी मिळते.”

हरित योगाचा कार्यक्रम संस्मरणीय करण्यासाठी योग प्रात्यक्षिके सादर करणाऱ्यांना 5000 पेक्षा जास्त औषधी वनस्पतींची रोपे देण्यात आली. या उपक्रमाने योग व पर्यावरणाबाबतची जागरुकता एकत्र जोडले गेले.
भुवनेश्वरमधील योग महोत्सव म्हणजे 2025 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने टाकलेले लक्षणीय पाऊल ठरले. योगाच्या माध्यमातून सर्वंकष आरोग्य व पर्यावरणीय शाश्वतता यांना प्रोत्साहन देण्याप्रतीची भारत सरकारची वचनबद्धता या कार्यक्रमाद्वारे पुन्हा अधोरेखित झाली.

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 निमित्त आयोजित उपक्रमांसाठी मार्गदर्शक ठरणारे 10 अनोखे उपक्रम
आंतरराष्ट्रीय योग दिन या जागतिक कार्यक्रमाच्या 11 व्या आवृत्तीनिमित्त यावर्षी आयोजित कार्यक्रम 10 अनोख्या उपक्रमांभोवती केंद्रित असतील. यामुळे हा कार्यक्रम सर्वाधिक व्यापक व सर्वसमावेशक होईल.
- योग संगम – जागतिक विक्रमाच्या उद्देशाने 1,00,000 ठिकाणी एकाच वेळी योग प्रात्यक्षिके
- योग बंधन – प्रसिध्द ठिकाणी योग प्रात्यक्षिके आयोजित करण्यासाठी 10 देशांसोबत वैश्विक भागीदारी
- योग उद्यान – दीर्घ कालीन सामाजिक सहभागासाठी 1000 योग उद्यानांचा विकास
- योग समावेश – दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, आणि लहान मुले यांसाठी विशेष योग कार्यक्रम
- योग प्रभाव – सार्वजनिक आरोग्यामध्ये योगाची भूमिका यावरील दशकभरातील प्रभाव मूल्यांकन.
- योग संपर्क – दूरदृश्य प्रणालीद्वारे जागतिक योग परिषदेचे आयोजन, यामध्ये विख्यात योग तज्ज्ञांचा व आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांचा सहभाग
- हरित योग – योग आणि वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम यांना जोडणारा शाश्वतता आधारित उपक्रम
- योग अनप्लग्ड – तरुणांना योगाकडे आकर्षित करणारा उपक्रम
- योग महा कुंभ – 10 वेगवेगळ्या ठिकाणी आठवडाभर चालणारा उत्सव, उत्सवाच्या समारोपाला आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वात केंद्रिय समारंभ
- सम योगम – संपूर्ण स्वास्थ्यासाठी योग व आधुनिक आरोग्यशास्त्र यांची सांगड घालणारा 100 दिवसांचा उपक्रम
* * *
S.Tupe/S.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2119779)
आगंतुक पटल : 57