ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्राम विकास मंत्रालयाच्या वतीने ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने वेबिनारचे आयोजन व विविध महत्वाच्या उपक्रमांचा प्रारंभ

Posted On: 05 APR 2025 11:05AM by PIB Mumbai

 

ग्राम विकास मंत्रालयाच्या वतीने शुक्रवार दि. 4 एप्रिल 2025 रोजी परस्परसंवादी स्वरुपाच्या अभिनव वेबिनारचे आयोजन केले होते. या वेबिनारमध्ये लखपती दीदी व राज्य ग्रामीण उपजीविका अभियानांचे (State Rural Livelihood Missions - SRLMs) प्रतिनिधी सहभागी झाले होते. वेबिनारचे हे सत्र 2025-26 च्या अर्थसंकल्पातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने आयोजित केल्या जात असलेल्या अर्थसंकल्पोत्तर सल्लामसलत मालिकेचा भाग म्हणून आयोजित केले होते. या वेबिनारमध्ये सहकार्य व धोरणात्मक कृतींवर भर दिला गेला होता.

ग्राम विकास मंत्रालयाचे सचिव शैलेश कुमार सिंग यांनी या वेबिनारला संबोधित केले. ग्रामीण समृद्धी व लवचिकता कार्यक्रम (Rural Prosperity and Resilience Programme) पुढे नेण्यासाठी राज्यांच्या सहभागाचे महत्त्व त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले. ग्राम विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव टी. के. अनिल कुमार यांनी देखील या परस्पर संवादी वेबिनारची सविस्तर रूपरेषा सहभागींसमोर मांडली व या वेबिनारला विधायक चर्चाची दिशा दिली. या वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी स्वयंसहायता गटांमधील (Self Help Group - SHG) महिलांना आर्थिक स्वावलंबनाकडे नेण्यासाठी तसेच त्यांना यशस्वी बनवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची निरीक्षणे मांडली तसेच, त्याबाबतच्या आपल्या धोरणात्मक उपाययोजनाही सामायिक केल्या. या सल्लामसलती अंतर्गत झालेल्या चर्चेत ग्रामीण भागाच्या समृद्धीच्या दृष्टीने प्रमुख स्तंभ असलेल्या पायाभूत सुविधा, वित्त, विपणन व कौशल्य विकास या चार घटकांवर भर दिला गेला.

ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, ग्राम विकास मंत्रालयाच्या वतीने उद्योजकता नियोजन विषयक डिजिटल साधन अर्थात एका Entrepreneurship Planning Digital Tool  (EPDT) चाही प्रारंभ केला. हे डिजीटल साधन लाखपती दीदी होऊ इच्छिणाऱ्या महिलांना आपल्या व्यवसायाकरता प्रभावी नियोजन आराखडा तयार उपयुक्त ठरेल, तसेच अशा पद्धतीनेच या साधनाची रचनात्मक आखणी केली गेली असून LoKOS या संस्थेने ते विकसित केले आहे. या साधनाअंतर्गत स्वयंसहायता समूहातील सदस्य महिलांसाठी त्यांच्याकडील माहिती  डिजीटल स्वरुपात भरण्याची अथवा नोंद करण्याच्या प्रक्रियेचे सुलभीकरण केले गेले आहे. याशिवाय या साधनाच्या माध्यमातून या महिलांना आपल्या उद्योजकीय प्रगतीचा मागोवा घेण्याची तसेच आवश्यक तिथे मार्गदर्शन मिळवण्याची सोयही उपलब्ध करून दिली गेली आहे. यामुळे हे डिजीटल साधन या महिलांच्या उद्योजकतेची भरभराट होण्यासाठी एक महत्त्वाचे साधन ठरले आहे. याशिवाय या महिलांना लखपती दीदी होण्याशी संबंधित काही प्रश्न वा शंका असतील तर त्यांच्या निरसनासाठी 0120-5202521 या टोल-फ्री क्रमांकाची सुविधा देखील उपलब्द करून दिली गेली आहे.  ही हेल्पलाईन सोमवार ते शनिवार, सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत (राष्ट्रीय सुट्ट्यांशिवाय) कार्यरत असणार आहे. या हेल्पलाईनमुळे या महिलांना वेळेत व परिणामकारक सहाय्य मिळणार आहे.

ग्राम विकास मंत्रालयाच्या संयुक्त सचिव स्मृती शरण, ग्राम विकास मंत्रालयाच्या संयुक्त सचिव स्वाती शर्मा यांच्यासह ग्राम विकास मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी व विशेष तज्ज्ञ या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.

***

S.Pophale/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2119170) Visitor Counter : 22


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil