पंतप्रधान कार्यालय
बिमस्टेक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बांगलादेशच्या मुख्य सल्लागारांची घेतली भेट
Posted On:
04 APR 2025 3:16PM by PIB Mumbai
बँकॉक येथे सुरू असलेल्या बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मुहम्मद युनूस यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी लोकशाहीवादी, स्थिर, शांततापूर्ण, प्रगतीशील आणि समावेशक बांगलादेशाला भारताचा पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला. नातेसंबंधांबाबत भारताचा लोककेंद्रित दृष्टिकोन अधोरेखित करताना पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील सहकार्यामुळे दोन्ही देशांच्या लोकांना प्रत्यक्ष फायदे मिळाले आहेत, असे प्रतिपादन केले. बांगलादेशासोबत व्यावहारिकतेवर आधारित सकारात्मक आणि रचनात्मक संबंध निर्माण करण्याची भारताची इच्छा त्यांनी अधोरेखित केली.
वातावरण कलुषित करतील अशी वक्तव्ये टाळली पाहिजेत, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. सीमा सुरक्षा आणि स्थैर्य राखण्यासाठी सीमेवर कायद्याची कडक अंमलबजावणी तसेच बेकायदेशीरपणे सीमा ओलांडण्याला प्रतिबंध करणे, विशेषतः रात्रीच्या वेळी, आवश्यक आहे. आपले संबंध पुढे नेण्यासाठी आणि त्यांचा आढावा घेण्यासाठी द्विपक्षीय यंत्रणा योग्य वेळी बैठक घेऊ शकेल, असे ते म्हणाले.
बांगलादेशातील हिंदूंसह अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेबाबत भारताच्या चिंता पंतप्रधानांनी अधोरेखित केल्या आणि त्यांच्यावरील अत्याचारांच्या प्रकरणांची बांगलादेश सरकार सविस्तर चौकशी करून त्यांची सुरक्षा सुनिश्चित करेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
बिमस्टेकचे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी बांगलादेशाचे अभिनंदन केले आणि त्याच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक सहकार्य आणखी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली. बिमस्टेक चौकटीअंतर्गत प्रादेशिक एकात्मता वाढविण्यासाठी सल्लामसलत तसेच सहकार्य वाढविण्यावर नेत्यांनी सहमती दर्शविली.
दोन्ही देशांमधील परस्पर हिताचे सर्व मुद्दे त्यांच्या दीर्घकालीन आणि परस्पर फायदेशीर द्विपक्षीय संबंधांच्या हितासाठी रचनात्मक चर्चेद्वारे द्विपक्षीय पद्धतीने लक्षात घेऊन सोडवले जातील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
***
S.Kakade/N.Mathure/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2118912)
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam