इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि हैदराबाद इथल्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या वतीने बोटांच्या ठशांच्या बाबतीत जैवमितीय अर्थात बायोमेट्रिक अल्गोरिदममधील वयानुसार होणाऱ्या बदलांची चाचणी घेण्यासाठी स्पर्धेचे आयोजन
लहान मुलांच्या बोटांच्या ठशांच्या प्रमाणीकरणात सुधारणा घडवून आणे हा बेंचमार्किंग स्पर्धेचा उद्देश
या आव्हानात्मक स्पर्धेतअंतर्गत 7.7 लाख रुपये (9,000 अमेरिकन डॉलर्स) पर्यंतची बक्षिसे आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणासोबत तंत्रज्ञान विषयक भागीदारीची संधी
Posted On:
27 MAR 2025 10:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मार्च 2025
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (Unique Identification Authority of India - UIDAI)) आणि हैदराबाद इथल्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या वतीने संयुक्तपणे जैवमितीय अर्थात बायोमेट्रिक अल्गोरिदममधील वयानुसार होणाऱ्या बदलांची चाचणी घेण्यासाठी मोठ्या व्याप्तीच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
बायोमेट्रिक एसडीके बेंचमार्किंग स्पर्धेच्या पहिला टप्प्यात बोटांच्या ठशांच्या प्रमाणीकरणावर भर दिला गेला आहे. याअंतर्गत 5 ते 10 वर्षे वयोगटातील मुलांसाठी चाचणी घेतली जाईल, याला 5 ते 10 वर्षांनंतरच्या बदलांचीहीही जोड दिली जाणार आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांच्या सादरीकरणांचे सुरक्षितपणे मूल्यांकन केले जाईल, तसेच कोणत्याही स्पर्धकास किंवा बाह्य व्यक्तींना डेटा सामायिक केला जाणार नाही याची सुनिश्चिती करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने गुप्तनाम (anonymized) डेटासेट वापरण्याची व्यवस्थाही केली आहे.
जागतिक सहभागाला प्रोत्साहन:
वास्तविक जगातील परिस्थितीतील अचूकतेत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने आपापल्या बायोमेट्रिक मॉडेलमध्ये भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या विशेष क्षेत्रीय डेटासेटच्या उपयोगाने सुधारणा कराव्यात याकरता प्राधिकरणाने जगभरातील संशोधक आणि विकसकांना निमंत्रित केले आहे.
ही आव्हानात्मक स्पर्धा 25 मार्च 2025 ते 25 मे 2025 पर्यंत चालणार आहे, या स्परअधेतील नोंदणीसंबंधीची माहिती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या संकेतस्थळासह https://biochallenge.uidai.gov.in/ या दुव्यावर उपलब्ध आहे.
या आव्हानात्मक स्पर्धेतअंतर्गत 7.7 लाख रुपये (9,000 अमेरिकन डॉलर्स) पर्यंतची बक्षिसे आणि बायोमेट्रिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणासोबत सहकार्यपूर्ण भागीदारीची संधी उपलब्ध करून दिली आहे.
बोटांच्या ठशांशी संबंधित स्पर्धेनंतर, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या वतीने डोळ्यांच्या बुबुळांची (iris authentication) आणि चेहऱ्याच्या ओळखीच्या (face authentication) चाचणींसाठी एसडीके बेंचमार्किंग स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.
भारतात आधार हा सुशासन आणि डिजिटल समावेशनाचा मुख्य आधारस्तंभ ठरला असून, आधार क्रमांक धारक विविध सेवा आणि लाभासाठी, दररोज जवळपास 90 दशलक्ष (9 कोटी) पडताळणी व्यवहार (authentication transactions) करत आहेत.
* * *
S.Patil/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2115986)
Visitor Counter : 64