आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वैद्यकीय प्राणवायू (ऑक्सिजन) व्यवस्थापन याविषयावर जारी केली राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे


नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या सहकार्याने प्राणवायू व्यवस्थापनाबाबत राष्ट्रीय क्षमता निर्माण कार्यक्रमाचा आरंभ

Posted On: 27 MAR 2025 7:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 मार्च 2025

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने वैद्यकीय प्राणवायू व्यवस्थापन या विषयावर नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्स येथे झालेल्या कार्यशाळेत राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. याशिवाय या कार्यशाळेत प्राणवायू व्यवस्थापनाबाबत राष्ट्रीय क्षमता निर्माण कार्यक्रम देखील सुरु करण्यात आला असून नवी दिल्लीतील एम्स च्या रुग्णालय प्रशासन विभागाच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम कार्यान्वित केला जाईल.

वैद्यकीय प्राणवायू संदर्भातील पायाभूत घटकांचा सुयोग्य वापर आणि सुव्यवस्थित देखभाल अतिशय महत्वपूर्ण असून अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत त्याचा तात्काळ पुरवठा  केला जाऊ शकतो असे केंद्रीय गृह सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी यावेळी बोलताना सांगितले.  कोविड 19 महामारीच्या काळातील भारताच्या व्यवस्थापनातून शिकण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

एम्सचे संचालक प्राध्यापक एम श्रीनिवास यांनी  क्षमता निर्माण कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यामागील एम्सची भूमिका विशद केली तसेच आरोग्यसेवा क्षेत्रातील सर्व स्तरांवर प्रशिक्षण आणि जागरूकता यांच्या महत्वावर भर दिला. 

वैद्यकीय प्राणवायू व्यवस्थापन याविषयावरील राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे जारी करणे हे देशाच्या वैद्यकीय प्राणवायू सुविधेला अधिक बळकट करण्यासोबतच संपूर्ण आरोग्यसेवा विषयक सुविधांमध्ये प्राणवायू व्यवस्थापनातील सर्वोत्तम आणि एकसमान पद्धतींचा अंगीकार करण्यासाठी उचललेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनची कायर्क्षम खरेदी, साठवण आणि व्यवस्थापन याविषयी एक रूपरेषा तयार केली असून त्यामध्ये रुग्णांची सुरक्षितता,  क्षमता निर्माण आणि आपत्कालीन सज्जतेवर भर देण्यात आला आहे.  

ऑक्सिजन व्यवस्थापनावरील राष्ट्रीय क्षमता बांधणी कार्यक्रम हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या नेतृत्वाखालील आणि नवी दिल्लीतील एम्सच्या सहकार्याने राबविण्यात येणारा एक उपक्रम आहे. या माध्यमातून देशभरातील 200 मास्टर प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.  ज्यामुळे देशभरातील रुग्णालय प्रशासनातील क्षमता निर्मितीवर लक्ष केंद्रित केले जाईल तसेच वैद्यकीय प्राणवायू हाताळण्यासाठी आणि योग्य वापर करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षित केले जाईल ज्यामुळे त्याचा अपव्यय होणार नाही आणि उपचारांच्या परिणामकारकतेमध्ये सुधारणा होईल.  

या कार्यशाळेत आरोग्य मंत्रालय,  एम्सचे इतर वरिष्ठ अधिकारी आणि देशभरातील वैद्यकीय व्यावसायिक आणि तज्ज्ञ उपस्थित होते.

 

* * *

S.Patil/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2115895) Visitor Counter : 35