भारतीय निवडणूक आयोग
भूतानमधील वरिष्ठ आणि मध्यम स्तरावरील निवडणूक अधिकाऱ्यांना 2-आठवड्यांच्या निवासी कार्यक्रमात निवडणूक प्रशासनाचे प्रशिक्षण
Posted On:
23 MAR 2025 5:16PM by PIB Mumbai
भूतानच्या वरिष्ठ आणि मध्यम स्तरावरील 40 निवडणूक अधिकाऱ्यांसाठी निवडणूक प्रशासनाविषयक 2-आठवड्यांचा निवासी क्षमता विकास कार्यक्रम 21 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथील भारतीय आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन संस्थेत (आयआयडीईएम) यशस्वीपणे संपन्न झाला. या कार्यक्रमात भूतानचे निवडणूक आयुक्त देखील सहभागी झाले होते. हा प्रशिक्षण कार्यक्रम 10 मार्च ते 21 मार्च 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला होता.
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी 18 मार्च 2025 रोजी भारताच्या निवडणूक आयोगाच्या (इसीआय) कार्यालयात भेट देणाऱ्या भूतानचे निवडणूक आयुक्त उग्येन चेवांग यांची भेट घेतली. 21 मार्च रोजी आयआयडीईएम येथे समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. उद्घाटनाच्या भाषणात निवडणूक उपायुक्त अजित कुमार यांनी भारताचे निवडणूक सहकार्य आणि क्षमता विकासाच्या दृढ बांधिलकीवर प्रकाश टाकला. माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांनी देखील निवडणूक आयोगाने अनेक दशके निर्माण केलेल्या संस्थात्मक विश्वासार्हतेविषयी मौलिक विचार मांडले.
समारोप समारंभाची सांगता भूतानच्या निवडणूक आयुक्त उग्येन चेवांग यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. त्यानंतर सर्व सहभागी अधिकाऱ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. हा संवादात्मक आणि केस-स्टडी आधारित प्रशिक्षण कार्यक्रम निवडणूक व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या पैलूंवर केंद्रित होता. यात निवडणूक प्रक्रियेतील कार्यक्षमता वाढवणे, सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पद्धतींची देवाणघेवाण करणे आणि भारत-भूतान यांच्यातील संस्थात्मक सहकार्य अधिक दृढ करणे यावर भर देण्यात आला.
भूतानच्या निवडणूक आयोगाच्या विनंतीनुसार, 15 ते 17 मार्च 2025 दरम्यान हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रिवाल्सर येथे दोन रात्रींच्या अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. हे स्थळ भूतानमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करणाऱ्या गुरू पद्मसंभव यांच्याशी संबंधित आहे. तसेच, 19 मार्च रोजी भूतानच्या निवडणूक आयुक्तांनी आयआयडीईएम कॅम्पसमध्ये पिंपळाच्या रोपट्याचे रोपण केले(फिकस रिलिजियोसा) जे शांतता, शाश्वतता आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या सामायिक मूल्यांचे प्रतीक आहे.
नियमित प्रशिक्षण कार्यक्रम आणि शिष्टमंडळ भेटी भारताच्या निवडणूक आयोगाच्या भूतानसोबतच्या सखोल सहकार्याचा दाखला आहेत.
***
S.Patil/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2114216)