वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाद्वारे (Agricultural and Processed Food Products Export Development Authority - APEDA) गोली पॉप सोडा हे भारतीय पेय उत्पादनाचे जागतिक बाजारपेठेसाठी रवाना
स्वदेशी पेय उत्पादनांना जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्याच्या दिशेने गोली सोडाच्या पुनरुज्जीवनाच्या माध्यमातून एक मोठे पाऊल
गोली पॉप सोडा हे भारतीय पेय उत्पादन अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि आखाती देशांच्या बाजारपेठेत यशस्वीपणे दाखल, ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
Posted On:
23 MAR 2025 11:26AM by PIB Mumbai
भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (Agricultural and Processed Food Products Export Development Authority - APEDA) 'अपेडा ने पारंपरिक भारतीय गोली सोडा या लोकप्रिय शीतपेय उत्पादनाला पुनरुज्जीवीत करत त्याला जागतिक बाजारपेठेत गोली पॉप सोडा या नवीन नावाने आणण्याची घोषणा केली आहे. एके काळी हे लोकप्रिय पेय भारतात घरोघरी आढळत असे. आता ते पुन्हा बाजारपेठेत दमदार पुनरागमन करणार असून, यादृष्टीने अपेडाने या उत्पादनात नाविन्यपूर्ण बदल केले आहेत, तसेच या उत्पादनाच्या आंतरराष्ट्रीय विस्तारासाठी धोरणात्मक रणनितीची जोडही दिली आहे.
या उत्पादनाच्या अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि आखाती देशांमधील निर्यात वाहतुकीच्या यशस्वी चाचण्याही झाल्या असून, याद्वारे हे उत्पादन जागतिक बाजारपेठेत दमदारपणे दाखल झाले आहे. यासाठी अपेडाने फेअर एक्सपोर्ट्स इंडियासोबतच्या धोरणात्मक भागीदारी केली आहे. त्यामुळे या उत्पादनाचे आखाती प्रदेशातील सर्वात मोठ्या किरकोळ व्यापार साखळींपैकी एक असलेल्या लुलू हायपर मार्केटमध्ये नियमित वितरण होत राहील याचीही सुनिश्चिती झाली आहे. याअंतर्गत सध्या लुलूच्या आउटलेटमध्ये हजारो बाटल्यांचा साठा करण्यात आला आहे, आणि त्याला प्रचंड सकारात्मक प्रतिसादही मिळू लागला आहे.
गोली पॉप सोडा या भारतीय शीतपेय उत्पादनाचे युनायटेड किंगडममध्ये, अगदी अल्पावधीतच एक सांस्कृतिक घटक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. या पेयाच्या पारंपरिक भारतीय चवीच्या आधुनिक स्वादासोबत घडवून आणलेल्या मिश्रणाने तिथल्या ग्राहकांवर मोहिनी घालण्यास सुरुवात केली आहे. या घडामोडींच्या माध्यमातून भारताने आपल्या समृद्ध पेय उत्पादन वारशाला जागतिक ओळख मिळवून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
या महत्त्वाच्या टप्प्याच्या स्मरणीय गौरवार्थ अपेडाने 4 फेब्रुवारी 2025 रोजी एबीएनएनने आयोजित केलेल्या फ्लॅग ऑफ अर्थात निर्यात प्रवासाच्या प्रारंभ समारंभाला सहकार्य पूर्ण पाठबळ दिले. या समारंभाने गोली पॉप सोडा हे भारतीय पेय उत्पादन अधिकृतपणे जागतिक बाजारपेठेत दाखल झाले असल्यावरही शिक्कामोर्तब केले. या प्रसंगाने अस्सल, उच्च-गुणवत्तेच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पेय उत्पादन बाजारात आपले अस्तित्व मजबूत करण्यासाठी भारताची वचनबद्धताही अधोरेखित केली आहे.
बहुराष्ट्रीय पेय कंपन्यांच्या वर्चस्वामुळे बाजारपेठेतून जवळजवळ नाहीसा झालेल्या गोली सोडा उत्पादनाचे पुनरागमन होणे, हा अस्सल, घरगुती खाद्यान्न आणि पेय उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या आणि निर्यात करण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. अपेडाने गोली पॉप सोड्याशी जोडलेल्या भावनिक करणार्या आठवणींना आधुनिक पॅकेजिंगची जोड देत, हे लोकप्रिय पेय उत्पादन जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
गोली पॉप सोड्याला इतर उत्पादनांच्या तुलनेत वेगळी ओळख मिळवून देणारे घटक म्हणजे त्याचे नाविन्यपूर्ण पॅकेजिंग. यात एक अभिनव पॉप ओपनरचा अंतर्भाव आहे. या ओपनरमुळे भारतीय ग्राहकांच्या आठवणीत खोलवर घट्ट रुतून बसलेला बुडबुड्यांचा ऐकावासा वाटत राहणार स्फोटक आवाज पुन्हा ऐकू येऊ लागला आहे. अशा अत्यंत विचारपूर्वक केलेल्या रिब्रँडिंगमुळे या उत्पादनाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठांना स्वतःकडे खेचून आणले आहे. यामुळे आता हे पेय उत्पादन एक रोमांचक आणि ट्रेंडी उत्पादन म्हणून स्थान मिळवू लागले आहे.
याव्यतिरिक्त गोली पॉप सोड्याचा प्रचार -प्रसार करण्याच्या उद्देशाने 17-19 मार्च 2025 दरम्यान लंडन मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय अन्न आणि पेय सोहळा 2025 (International Food & Drink Event- IFE) मध्ये अपेडाच्या वतीने हे पेय उत्पादन प्रदर्शित केले गेले होते. या कार्यक्रमामुळे भारतीय उद्योजक आणि निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसोबत संपर्क साधण्यासाठी, नवीन सहकार्य पूर्ण व्यावसायिक संधी तपासून घेण्यासाठी आणि जगभरात भारताच्या विविध कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले.
गोली सोडा या उत्पादनाच्या अशा प्रकारे झालेल्या पुनरुज्जीवनाने आता, गोली पॉप सोडा हे केवळ एक पेय उत्पादन राहीले नाही—तर ते भारताच्या समृद्ध पाककृती कलेचा वारसा आणि बहुआयामी पेय उत्पादन उद्योग क्षेत्राची नवी ओळख बनले आहे. जागतिक बाजारपेठेत घरगुती भारतीय खाद्यपदार्थ आघाडीच्या आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांच्या बरोबरीने स्पर्धा करू शकतात हेच या उत्पादनाच्या वाढत्या यशातून सिद्ध झाले आहे. यामुळे भारतीय निर्यातीसाठीही नवीन मार्ग खुले झाले असून, जागतिक खाद्यान्न आणि पेय उत्पादन क्षेत्रातले भारताचे नेतृत्वही अधिक बळकट झाले आहे.
****
NM/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2114159)
Visitor Counter : 64