युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
देशव्यापी ‘फिट इंडिया सायकलवर रविवार’ अभियानाचे नेतृत्व केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय लखनऊमधून करणार; किशोर जेना यांच्यासह स्थूलतेविरोधातील लढ्याला पाठिंबा देण्याची PEFI ची प्रतिज्ञा
Posted On:
22 MAR 2025 4:45PM by PIB Mumbai
स्थूलतेविरोधातील लढा आणखी व्यापक करण्यासाठी केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री आणि श्रम व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय 23 मार्च 2025 रोजी देशव्यापी ‘फिट इंडिया सायकलवर रविवार’ मोहीमेत सहभागी होणार आहेत. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे युवा व्यवहार व क्रीडा मंत्री गिरीश चंद्र यादव केंद्रीय मंत्र्यांसोबत या मोहिमेत सहभागी होतील.
डॉ. मांडवीय मरीन ड्राइव्ह (सामाजिक परिवर्तन स्थळ), समता मूलक चौराहा, 1090 चौराहा आणि परत मरीन ड्राइव्ह असा 3 किलोमीटरचा प्रवास सायकलवरुन करणार आहेत. 400 सायकलस्वारांच्या गटाचे ते नेतृत्व करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्थूलतेवर मात करुन आरोग्यपूर्ण व कार्यक्षम जीवनशैली अंगिकारण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत.
दुसरीकडे, आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळविलेला भालाफेकपटू किशोर जेना या सायकल अभियानात मुंबईतील 'अक्सा बीच' इथून सहभागी होईल. नवी दिल्लीतून भारतीय शारीरिक शिक्षण संस्थेचे सदस्य या अभियानात सहभागी होणार आहेत.
आतापर्यंत देशभरातील 4200 ठिकाणी ही सायकल मोहीम आयोजित करण्यात आली असून सुमारे 2 लाख व्यक्तींनी त्यामध्ये सहभाग घेतला आहे. देशातली प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे कामदेखील ही मोहीम करते. विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे आणि उत्साही सायकलपटू, खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाविज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ यामध्ये सहभागी होणार आहेत.
याआधी झालेल्या सायकल मोहीमांमध्ये भारतीय लष्करातील जवान, केंद्रिय राखीव पोलिस दलाचे जवान, भारत तिबेट सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि लवलीना बोर्गहेन, संग्राम सिंग, शॅन्की सिंग, नीतू घंघास, साविती बूरा, पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती रुबिना फ्रान्सिस आणि पॅरा चॅम्पियन सिमरन शर्मा यांच्यासारखे प्रमुख क्रीडापटू तसेच राहुल बोस, अमित सियाल, गुल पनाग यांच्यासारखे कलाकार सहभागी झाले होते.
‘फिट इंडिया सायकलवर रविवार’ ही मोहीम क्रीडा व युवा व्यवहार मंत्रालयातर्फे सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, माय बाइक्स आणि माय भारत या संस्थांच्या सहयोगाने आयोजित केली जाते. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या देशभरातील क्षेत्रिय संस्था, राष्ट्रीय सर्वोत्कृष्टता संस्था आणि खेलो इंडिया केंद्रांमध्ये हे उपक्रम नियमितपणे आयोजित केले जातात.
***
M.Pange/S.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2114034)
Visitor Counter : 33