कोळसा मंत्रालय
एक अब्ज टन: भारताच्या ऊर्जाविषयक भविष्याला बळकटी !
देशातील कोळसा उत्पादनाने 1 अब्ज टनांचा टप्पा केला पार
Posted On:
21 MAR 2025 5:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मार्च 2025
भारताने कोळसा उत्पादनात 20 मार्च 2025 रोजी अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठला असून वित्त वर्ष 2024-25 मधील एक अब्ज टन (बीटी) कोळसा उत्पादनाचा टप्पा ओलांडला. गेल्या वित्त वर्षात झालेल्या 997.83 दशलक्ष टन (एमटी) कोळसा उत्पादनाच्या 11 दिवस आधीच ही उल्लेखनीय कामगिरी करून दाखवल्यामुळे, देशाच्या ऊर्जाविषयक गरजांची पूर्तता करण्यात आणि औद्योगिक, कृषीविषयक तसेच समग्र आर्थिक विकासात भारताने केलेली लक्षणीय प्रगती त्यातून अधोरेखित होत आहे.
कोळसा क्षेत्राच्या या यशाचे श्रेय कोळसा क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम (पीएसयुज), खासगी उत्पादक यांचे अथक प्रयत्न आणि देशातील साडेतीनशे कोळसा खाणींमध्ये समर्पित वृत्तीने मेहनत करणाऱ्या सुमारे 5 लाख खाणकामगारांच्या कार्यबळाला जाते. खाणींमध्ये काम करताना उभ्या ठाकणाऱ्या असंख्य आव्हानांना अतुलनीय समर्पणासह पेलणाऱ्या या कोळसा खाण कामगारांनी हा ऐतिहासिक टप्पा गाठण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
भारतातील एकूण उर्जा मिश्रणाच्या गरजेपैकी सुमारे 55% भागासाठी देश कोळशावर अवलंबून आहे आणि देशातील सुमारे 74% विजेची निर्मिती कोळशावर आधारित उर्जा निर्मिती संयंत्रांतून होते. भारताच्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यात आणि उर्जा सुरक्षितता टिकवून ठेवण्यात कोळशाचे निर्णायक महत्त्व यातून अधोरेखित होते.
देशात झालेल्या विक्रमी कोळसा उत्पादनातून, केंद्र सरकारच्या खाण आणि खनिजे (विकास तसेच नियमन)कायद्यात केलेल्या सुधारणा तसेच कोळसा खाणींच्या व्यावसायिक लिलावाच्या माध्यमातून खासगी क्षेत्राला देशातील कोळसा क्षेत्र खुले करून देणे यांसारख्या धोरणात्मक सुधारणा आणि नीतींचे दर्शन घडते. या उपक्रमांमुळे देशांतर्गत कोळशाच्या उपलब्धतेत नोंद घेण्याजोगी वाढ झाली असून हा कोळसा हळूहळू आयात कोळशाला पर्याय उपलब्ध करून देत आहे आणि परकीय चलनाच्या बचतीत मोठे योगदान देत आहे. एप्रिल ते डिसेंबर 2024 या कालावधीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत भारताच्या कोळसा आयातीमध्ये 8.4%ची घट झाली आणि याचा परिणाम म्हणून 5.43 अब्ज डॉलर्स (42,315.7 कोटी रुपये) मूल्याच्या परकीय चलनाची बचत झाली.
हे महत्त्वाचे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारता’च्या संकल्पनेशी सुसंगत असून ते शाश्वत विकासाची सुनिश्चिती करतानाच उर्जा क्षेत्रात स्वावलंबन जोपासण्यासाठी केंद्रीय कोळसा मंत्रालयाद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांना अधोरेखित करते.
ही कामगिरी केवळ कोळसा उत्पादनाशीच संबंधित नाही तर दीर्घकालीन उर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या तसेच भारताच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. प्रगत खनन तंत्रे स्वीकारून, लॉजिस्टिक्समध्ये कमाल वाढ करुन, आणि शाश्वत पद्धतींना चालना देऊन कोळसा क्षेत्र भारताच्या ऊर्जाविषयक पायाभूत सुविधा सशक्त करत आर्थिक लवचिकतेमध्ये वाढ करण्यात मध्यवर्ती भूमिका निभावत आहे.
‘विकसित भारत 2047’ संकल्पनेला अनुसरून, हा महत्त्वाचा टप्पा भारताला उर्जा क्षेत्राच्या बाबतीत संपूर्णपणे स्वावलंबी होण्यासाठी सज्ज करत आहे. सातत्याने केलेल्या धोरणात्मक सुधारणा, तंत्रज्ञानातील प्रगती आणि जबाबदार साधनसंपत्ती व्यवस्थापनावर केंद्रित केलेले लक्ष यांच्या माध्यमातून भारताची आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल योग्य मार्गावर सुरु आहे.हे यश म्हणजे आगामी पिढ्यांसाठी स्वावलंबी, उर्जा-सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्याप्रती भारताच्या अविचल समर्पिततेचा पुरावा आहे.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2113732)
Visitor Counter : 36