भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

निवडणूक प्रक्रिया बळकट करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) गेल्या महिन्याभरापासून उचलली धाडसी पावले

Posted On: 20 MAR 2025 8:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मार्च 2025


देशाचे  26 वे मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) म्हणून ज्ञानेश कुमार यांनी  सूत्रे हाती घेतल्यापासून निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू आणि डॉ.विवेक जोशी यांच्यासह  महिन्याभरातच मतदान केंद्र स्तरावरील अधिकाऱ्यांसह (बीएलओ) संपूर्ण निवडणूक यंत्रणेला समर्थपणे कार्यरत केले असून प्रत्येक मतदाराचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढवून मतदान केंद्रांमध्ये त्यांच्यासाठी मतदानाचा सुखदायी अनुभव सुनिश्चित करण्यासाठी कंबर कसली आहे. या प्रक्रियेत महत्त्वाच्या भागधारक असलेल्या राजकीय पक्षांना देखील त्यांनी पायाभूत स्तरावर सहभागी करून घेतले आहे.

देशभरातील सुमारे 100 कोटी मतदार आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहेत या वचनाला आयोगाने दुजोरा दिला आहे. युआयडीएआय म्हणजेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणातील अधिकारी आणि भारतीय निवडणूक आयोगातील (ईसीआय) तज्ञ यांच्यात लवकरच तांत्रिक चर्चा सुरु होणार आहे. मतदार त्याला नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरच मतदान करू शकत असला आणि इतर कोठेही तो मतदान करू शकत नसला तरीही आयोगाने देशभरातून ईपीआयसी म्हणजेच मतदार छायाचित्र ओळखपत्रांच्या नकला निपटून काढण्याचा आणि ही दीर्घकाळ भेडसावणारी समस्या येत्या 3 महिन्यात सोडवण्याचा निर्धार केला आहे. जन्म-मृत्यू नोंदणी अधिकाऱ्यांशी दृढ समन्वय ठेवून मतदार यादीचे नियमित अद्ययावतीकरण अधिक मजबूत केले जाईल. राजकीय पक्षांशी साधलेल्या संवादात निवडणूक आयोगाने असे स्पष्ट केले आहे की, मतदार यादीतील कोणत्याही नावाचा नव्याने समावेश अथवा नावे रद्द करणे ही प्रक्रिया लोकप्रतिनिधित्व कायदा, 1950 मध्ये विहित, सर्व राजकीय पक्षांना उपलब्ध असलेल्या, दावे तसेच आक्षेप दाखल करण्यासाठी, संबंधित कायदेशीर तरतुदींच्या अंतर्गत अपीलाच्या प्रक्रीयेद्वारे नियंत्रित केली जाते. अशा कोणत्याही अपिलांच्या अनुपस्थितीत, निवडणूक नोंदणी अधिकाऱ्याने (ईआरओ) तयार केलेली यादीच अंतिम समजली जाते.

देशातील सर्व पात्र नागरिकांची मतदार नोंदणी 100 टक्के पूर्ण झाल्याची, मतदान प्रक्रियेत सुलभता आणण्याची तसेच मतदानाचा अनुभव सुखदायी होण्याची सुनिश्चिती करून घेणे ही निवडणूक आयोगाची  महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. कोणत्याही मतदान केंद्रावर 1200 पेक्षा जास्त मतदार असू नयेत  आणि मतदान केंद्र प्रत्येक मतदाराच्या निवासस्थानापासून 2 किलोमीटरच्या परिघात असेल याची सुनिश्चिती करून घेण्यासाठी पावले उचलण्यात येतील.

निवडणूक पुस्तिका आणि सूचनांचे मॅन्युअल सर्वात ताज्या बदलांसह समन्वयीत केले जाईल. आघाडीच्या फळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सोप्या पद्धतीने शिक्षण आणि परिणामकारक प्रशिक्षण यासाठी विविध भारतीय भाषांमध्ये डिजिटल प्रशिक्षण किट्स तयार करण्यात येतील. अॅनिमेटेड व्हिडिओ आणि एकात्मिक डॅशबोर्ड यांच्यामुळे प्रशिक्षणाला डिजिटल चालना दिली जाईल. येत्या काही काळात बीएलओजना प्रशिक्षित करण्यासाठी एक प्रशिक्षण नमुना तयार करण्यात येत आहे.

आयोगाने  सर्व राजकीय पक्षांकडून निवडणुकांशी संबंधित कोणत्याही आणि सर्व बाबींशी संबंधित सूचना देखील मागवल्या आहेत आणि या पक्षांनी त्या 30 एप्रिल 2025 पर्यंत आयोगाकडे पाठवणे अपेक्षित आहे.
 
निवडणूक आयोगाने हाती घेतलेले हे धाडसी तसेच दूरगामी उपक्रम, निवडणुकांशी संबंधित प्रत्येक क्षेत्र व्यापतात आणि सर्व महत्त्वाच्या भागधारकांना सहभागात्मक पद्धतीने आपल्या परिघात आणतात.


N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2113449) Visitor Counter : 35