अंतराळ विभाग
प्रगत डॉकिंग,लूनर सॅम्पल कलेक्शनसह भारत चांद्रयान-4 मोहिम राबवणार असल्याची केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांची लोकसभेत माहिती
सुनीता विल्यम्स यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे दिल्या शुभेच्छा आणि भारत भेटीचे आमंत्रण
प्रविष्टि तिथि:
19 MAR 2025 8:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मार्च 2025
भारताच्या ‘गगनयान’ या आगामी मानव मिशन (मोहीम) साठी कठोर प्रशिक्षण घेत असलेल्या चार अंतराळवीरांपैकी एक, ग्रुप कॅप्टन शुक्ला यांची आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मोहिमेत सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आली आहे, तर इतर तीन जण हे मिशन यशस्वी करण्यासाठी सखोल तयारी करत आहेत.
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. आगामी चांद्रयान-4 मोहिमेची माहिती देताना, भारताची अंतराळ क्षेत्रातील महत्वाकांक्षा नवी उंची गाठण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अनेक प्रगत डॉकिंग तंत्रज्ञान आणि लूनर सॅम्पल, म्हणजेच चंद्राच्या पृष्ठभागावरील नमुने गोळा करणारी ही मोहीम 2040 पर्यंत स्वत:चे अंतराळ स्थानक स्थापन करण्याच्या भारताच्या ध्येयाच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार असल्याचे ते म्हणाले.
चांद्रयान 4 आणि भारताच्या अंतराळ मोहिमांवरील लोकसभेतील चर्चेला उत्तर देताना, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सभागृहाला सांगितले की, सुनीता विल्यम्स अंतराळात 300 दिवसांहून अधिक काळ घालवल्यानंतर आज पहाटे 3 वाजून 27 मिनिटांनी पृथ्वीवर परतल्या, आणि त्यानंतर पहाटे 4 च्या सुमाराला आपण समाज माध्यमावर, हा क्षण ‘गौरव, अभिमान आणि दिलासा देणारा’ असल्याचे सांगणारा अभिनंदनाचा संदेश प्रसारित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनिता विल्यम्स यांना लिहिलेल्या पत्राचा संदर्भ त्यांनी दिला, ज्यामध्ये त्यांनी सुनिता विल्यम्स यांना शुभेच्छा दिल्या असून, त्यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे. 2007 मध्ये सुनीता विल्यम्स भारतात आल्या होत्या, तेव्हा त्यांनी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती, असे ते म्हणाले.
जितेंद्र सिंह यांनी भारताची अंतराळ क्षमता बळकट करण्यासाठी चांद्रयान-4 चे महत्त्व अधोरेखित केले. जितेंद्र सिंह यांनी प्रशासन आणि विकासामधील अंतराळ तंत्रज्ञानाच्या व्यापक अनुप्रयोगांवरही प्रकाश टाकला. अंतराळ विज्ञानातील भारताच्या प्रगतीचा सर्वसामान्यांना कसा लाभ मिळत आहे, हे स्पष्ट करताना त्यांनी अंतराळ-आधारित नवोन्मेशाचा आता नगर नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य सेवा आणि कृषी क्षेत्राशी मेळ घातला जात आहे, यावर त्यांनी भर दिला.

त्याशिवाय, त्यांनी ‘गगनयान’ या भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि या मोहिमेसाठी निवड करण्यात आलेले चार अंतराळवीर कठोर प्रशिक्षण घेत असल्याची माहिती दिली.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2113061)
आगंतुक पटल : 74