दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

फसवणूक करणाऱ्या कॉल्सवर टीआरएआयकडून नियंत्रण

Posted On: 19 MAR 2025 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 मार्च 2025

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (टीआरएआय) दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी दूरसंचार व्यावसायिक संवाद ग्राहक प्राधान्य नियमावली (टीसीसीसीपीआर),2018 मध्ये सुधारणा केल्या असून त्यात इतर अनेक बाबींसह खालील तरतुदींचा समावेश आहे:

1.ग्राहकाला आता स्पॅम म्हणजेच फसवणूक करणाऱ्या/ अनाहूत व्यावसायिक संभाषणाबाबतची (युसीसी) तक्रार असे संभाषण झाल्यापासून 7 दिवसांच्या आत करता येईल, आधी यासाठी केवळ 3 दिवसांची कालमर्यादा देण्यात आली होती.

2.नोंदणी नसलेल्या प्रेषकांकडून आलेल्या अशा युसीसी विरुद्ध कारवाई करण्यासाठी सेवा प्रदात्यांना देण्यात आलेली कालमर्यादा 30 दिवसांवरून कमी करून 5 दिवस करण्यात आली आहे.

3.युसीसी पाठवणाऱ्यांच्या विरुध्द तातडीची कारवाई सुनिश्चित करण्यासाठी, अशांच्या विरुद्ध पावले उचलण्यासाठीचे निकष सुधारण्यात आले असून आता ते अधिक कठोर करण्यात आले आहेत. सदर कारवाई सुरु करण्यासाठी, ‘गेल्या 7 दिवसांत त्या प्रेषकाविरुद्ध 10 तक्रारी नोंदवलेल्या असणे’ या पूर्वीच्या निकषाच्या तुलनेत, आता त्यामध्ये ‘गेल्या 10 दिवसांत 5 तक्रारी नोंदवल्या जाणे’ अशी सुधारणा करण्यात आली आहे.

या सुधारणांविषयी सरकारी राजपत्रात माहिती प्रकाशित झाल्या दिवसापासून 30 दिवसांच्या आत त्या लागू होणार आहेत, मात्र त्यापैकी नियम 8, नियम 17, नियम 20 मधील उप-नियम (अ) आणि (ब); नियम 21 मधील उप-नियम (ब) अधिकृत राजपत्रातील घोषणेनंतर 60 दिवसांच्या आत लागू होणार आहेत. शिवाय, टीआरएआयने स्पॅम कॉल्स करण्यासाठी वापरले जात असलेले बिगरनोंदणीकृत प्रेषक/बिगर नोंदणीकृत टेलीमार्केटर्स (युटीएम) यांचे सर्व दूरसंचार स्त्रोत खंडित करण्याचे तसेच त्यांची नावे काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी जारी केले आहेत. अॅक्सेस पुरवठादारांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या कारवाईमुळे युटीएम विरुध्द केल्या जाणाऱ्या तक्रारींच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून ऑगस्ट 2024 मध्ये अशा 1,89,419 तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या त्या आता कमी होऊन जानेवारी 2025 मध्ये 1,34,821 इतक्या तक्रारी नोंदवण्यात आल्या.सुमारे 1150 हून अधिक संस्था/व्यक्तींची नावे काळ्या यादीत टाकण्यात आली असून 18.8 लाख दूरसंचार स्त्रोतांची सेवा खंडित करण्यात आली आहे.

लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या लिखित उत्तरात केंद्रीय दूरसंचार आणि ग्रामविकास राज्यमंत्री डॉ.पेम्मसानी चंद्रशेखर यांनी आज ही माहिती दिली.


N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2112841) Visitor Counter : 31