वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
नवी दिल्ली येथे भारत-मलेशिया राज्यमंत्री स्तरावरील द्विपक्षीय बैठक संपन्न
Posted On:
18 MAR 2025 9:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मार्च 2025
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी 18 मार्च 2025 रोजी नवी दिल्लीतील वाणिज्य भवन येथे मलेशियाचे गुंतवणूक, व्यापार आणि उद्योग उपमंत्री ल्यू चिन टोंग यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीला मलेशियन राजदूत, मलेशियातील गुंतवणूक, व्यापार आणि उद्योग मंत्रालयातील वरिष्ठ सरकारी अधिकारी, तसेच भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय मानक ब्युरोचे वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.
मलेशिया हा आसियान संघटनेच्या दहा सदस्यीय देशांपैकी एक आहे आणि तो 2025 या वर्षासाठी आसियानचा अध्यक्ष आहे. बैठकीत आसियान इंडिया ट्रेड इन गुड्स अॅग्रीमेंटच्या (AITIGA) सध्याच्या पुनरावलोकनावर चर्चा झाली आणि 2025 पर्यंत या कराराचे पुनरावलोकन पूर्ण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याला मान्यता दिली.
दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय व्यापार समस्या, बाजारपेठ उपलब्धता समस्या, सेमीकंडक्टर उद्योगातील सहकार्य, सेवा क्षेत्रातील सहकार्य आणि भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) परदेशी उत्पादक प्रमाणन योजनेशी (FMCS) संबंधित मुद्द्यांवरही चर्चा केली.ही बैठक द्विपक्षीय व्यापार समस्यांचे जलद निराकरण करण्यास आणि दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार वाढविण्यास मदत करेल, अशी आशा दोन्ही पक्षांनी व्यक्त केली.
2023-24 मध्ये 20.02 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा एकूण व्यापार करत मलेशिया हा आसियानमध्ये भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. हा व्यापार भारताच्या आसियानसोबतच्या एकूण व्यापाराच्या सुमारे 17% आहे.

N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2112583)
Visitor Counter : 48