आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी केले ‘भारत नवोन्मेश शिखर संमेलन –क्षयरोग निर्मुलनासाठी अग्रणी उपाय ’चे उद्घाटन

Posted On: 18 MAR 2025 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 मार्च 2025

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम् येथे ‘भारत नवोन्मेश शिखर संमेलन –क्षयरोग निर्मुलनासाठी अग्रणी उपाय ’या शिखर परिषदेचे उद्घाटन केले. क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी भारताकडून होत असलेल्या प्रयत्नांना गती देण्याच्या उद्देशाने या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले.  

या शिखर परिषदेला संबोधित करताना अनुप्रिया पटेल यांनी क्षयरोग नियंत्रणात भारताने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीला आणि या मोहिमेतील नवोन्मेषाच्या मध्यवर्ती स्थानाला अधोरेखित केले.

2025 पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या दिशेने भारताची निरंतर प्रगती सुरू आहे, असे अनुप्रिया पटेल यांनी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाद्वारे झालेल्या कामगिरीवर भर देत सांगितले. या कार्यक्रमामुळे 2023 मध्ये 25.5 लाख क्षयरुग्ण अधिसूचित झाले आणि 2024 मध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक 26.07 लाख रुग्णांना अधिसूचित करण्यात आले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या क्षयरोग अहवाल 2024 चा दाखला देत त्यांनी भारतातील क्षयरोग घटनांच्या दरात 2015 मधील प्रति एक लाखांमध्ये 237 वरून 17.7%  घट नोंदवत 2023 मध्ये 195 झाल्याची माहिती दिली. क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 2015 मधील प्रतिलाख 28 वरून 2023 मध्ये प्रतिलाख 22 पर्यंत कमी म्हणजेच 21.4% नी कमी झाले आहे. भारतामध्ये क्षयरोगावरील उपचारांच्या व्याप्तीत 2015 मधील 53% वरून 2023 मधील 85% इतकी वाढ झाली आहे.

निःक्षय पोषण योजना(NPY) या योजने अंतर्गत क्षयरुग्णांना पोषक आहार घेण्यासाठी मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या अर्थसाहाय्याच्या रकमेत 1 नोव्हेंबर 2024 पासून मासिक 500 रुपयांवरून मासिक 1000 रुपये प्रतिरुग्ण इतकी वाढ करण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त पटेल यांनी सध्या सुरू असलेल्या टीबीमुक्त भारत-100 दिवसांची तीव्रतेने राबवली जाणारी मोहीम  या मोहिमेचे यश देखील अधोरेखित केले.

क्षयरोगाच्या उच्चाटनातील नवोन्मेषाला अधोरेखित करताना पटेल यांनी डिजिटल आरोग्याचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा संकलन आणि आरोग्य प्रोत्साहन यामुळे दरवर्षी निदान न झालेल्या, उपचार न घेणाऱ्या “मिसिंग मिलियन्स” श्रेणीतील लाखो रुग्णांपर्यंत पोहोचणे शक्य झाल्याची माहिती दिली.

आपल्या संबोधनात नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीकोनातून हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे. या शिखर परिषदेमुळे क्षयरोग संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ एकत्र येऊन आपल्या कल्पनांचे प्रभावी उपाययोजनांमध्ये रुपांतर करणार आहेत.  दीड दिवसांच्या या शिखर परिषदेत 200 पेक्षा जास्त क्रांतिकारक संशोधनांचे सादरीकरण करण्यात आले आहे. यामध्ये जलदगतीने टीबी स्क्रीनिंग करणाऱ्या हँडहेल्ड एक्स रे उपकरणाचा, एआय पॉवर्ड डायग्नोस्टिक टूल्सचा आणि नव्या मॉलिक्युलर चाचणी तंत्रज्ञानाचा समावेश आहे. या कार्यक्रमामुळे नवोन्मेषकर्त्यांना धोरणकर्त्यांसोबत, नियामकांसोबत आणि तज्ञांसोबत संपर्क साधण्याची संधी निर्माण झाली आहे. यामुळे राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमात आश्वासक उपाययोजनांचा समावेश करणे शक्य होणार आहे. शैक्षणिक, उद्योग, आरोग्यसेवा आणि संशोधन क्षेत्रातील1200 पेक्षा जास्त सहभागींच्या सहभागाद्वारे महत्त्वाचे सहकार्य प्रस्थापित करण्याचे या शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे. या शिखर परिषदेत भारताच्या क्षयरोगाविरोधातील लढाईला बळ देण्यात महत्त्वाचे ठरणारे 200 पेक्षा जास्त नवोन्मेषी उपक्रम एका प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आले आहेत तसेच नवोन्मेष, व्याख्याने, गोलमेज आणि पॅनल चर्चांच्या माध्यमातून विचारमंथन होणार आहे.

 
N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2112578) Visitor Counter : 37