ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक ग्राहक हक्क दिन 2025


इको-लेबलिंग, ई-कॉमर्स क्षेत्रातील अनुचित व्यापार पद्धतींपासून ग्राहक संरक्षण आणि ग्राहक तक्रार मंच यासाठीचे सरकारी उपक्रम ग्राहकांना सक्षम बनवत आहेत :  प्रल्हाद जोशी

Posted On: 15 MAR 2025 3:21PM by PIB Mumbai

 

इको लेबलिंग, ई-वाणिज्य क्षेत्रातील अनुचित व्यापार पद्धतींपासून ग्राहक संरक्षण, पर्यावरणाबाबत खोटे किंवा दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या विपणन तंत्राविरोधात (ग्रीनवॉशिंग)  नियामक चौकट मजबूत करणे आणि ग्राहक तक्रार मंचासाठीचे केंद्र सरकारचे उपक्रम ग्राहकांना अधिक सक्षम बनवत आहेत, असे मत केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज नवी दिल्लीत व्यक्त केले. 2025 च्या जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

जबाबदार ग्राहक धोरणांद्वारे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात केंद्र सरकार आघाडीवर आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा दाखला देत ते म्हणाले, “केंद्र सरकार ग्राहक संरक्षणाबरोबरच ग्राहकांची भरभराट कशी होईल यावर भर देत आहे.”

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत ग्राहक व्यवहार विभागाने जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त “शाश्वत जीवनशैलीकडे न्याय्य संक्रमण” या विषयावर एक वेबिनार आयोजित केला.

आर्थिक आणि सामाजिक न्यायाशी तडजोड न करता ग्राहकांच्या नेहमीच्या निवडींबाबत जागरूकता निर्माण करणे आणि संवाद वाढवणे हा या वेबिनारचा उद्देश आहे.

ग्राहकांसाठी शाश्वत आणि निरोगी जीवनशैलीचे पर्याय सहजपणे उपलब्ध होण्याबरोबरच हे पर्याय परवडणारे बनवण्याची गरज यंदाच्या संकल्पनेत प्रतिबिंबित होत असल्याचे ते म्हणाले. हे संक्रमण होताना ग्राहकांच्या मूलभूत हक्कांकडे लक्ष दिले जाईल आणि त्यांच्या गरजा भागवल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली. हवामान बदल, जैवविविधतेची हानी आणि प्रदूषण या परस्परांशी संबंधित संकटांना तोंड देण्यासाठी शाश्वत जीवनशैली ही गुरुकिल्ली आहे.  'सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास' ची ही संधी ग्राहकांसाठी लाभदायक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ग्राहक संरक्षण आणि शाश्वतता वाढवणे हे प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीचा भाग आहे आणि तो आपल्या प्रशासनाचा गाभा आहे, असे त्यांनी सांगितले.

कोचिंग क्षेत्रात दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, डार्क पॅटर्न, ग्रीनवॉशिंग यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्याबद्दल ग्राहक व्यवहार विभाग आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची (सीसीपीए) जोशी यांनी प्रशंसा केली. ग्राहक संरक्षण ई-कॉमर्स नियम, 2020 लागू केल्याबद्दल आणि ई-कॉमर्सवर ग्राहकांच्या संरक्षणासाठी सक्रिय कृती आणि उपक्रम सुरू केल्याबद्दल त्यांनी विभागाचे अभिनंदन केले.

***

S.Patil/P.Jambhekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2111544) Visitor Counter : 14