वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
"क्रिएटर्स हे भारताचे डिजिटल राजदूत आहेत, त्यांनी भारताची गाथा जगापर्यंत पोहोचवावी" - पीयूष गोयल
पीयूष गोयल यांनी आरआयएसई/डीईएल परिषद 2025 मध्ये क्रिएटर्सना केले संबोधित
Posted On:
13 MAR 2025 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मार्च 2025
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे आरआयएसई /डीईएल परिषद 2025 मध्ये क्रिएटर्सना संबोधित केले. संगीत, सर्जनशील उद्योग आणि स्टार्टअप्स यांना जोडणारी ही बहुशाखीय तीन दिवस चालणारी परिषद आहे. आपल्या भाषणात, गोयल यांनी देशाच्या भविष्याला आकार देण्यात सर्जनशील परिसंस्थेची ताकद आणि डिजिटल नवोपक्रमाची भूमिका यावर प्रकाश टाकला.
आपल्या भाषणात, गोयल यांनी सर्जनशील उद्योगाला भारताची गाथा जागतिक स्तरावर नेण्याचे आणि आर्थिक वाढीमध्ये अधिक योगदान देण्याचे आवाहन केले. त्यांनी क्रिएटर्सना विश्वास आणि प्रामाणिकतेला आपल्या कामाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचे महत्त्व सांगितले तसेच त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाची जबाबदारी आणि उत्तरदायित्व घेतले पाहिजे, असे नमूद केले. त्यांनी जबाबदार सामग्री, नाविन्यपूर्ण कथा कथन , कौशल्य विकास आणि भारतीय सर्जनशीलतेची निर्यात हे 4 पैलू सांगितले, ज्याद्वारे सर्जनशील उद्योग भारताच्या विकासामध्ये योगदान देऊ शकतो.
ते पुढे म्हणाले की, क्रिएटर्स हे भारताचे डिजिटल राजदूत आहेत, त्यांनी भारताची गाथा जागतिक स्तरावर पोहोचवून भारताबद्दल जागतिक धारणा घडवण्यात आणि भारताचा सांस्कृतिक ठसा वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी.
"भारतातील डेटा खर्च युरोप, अमेरिका किंवा इतर कोणत्याही विकसित देशांच्या तुलनेत खूप कमी आहे. कमी खर्चातील डेटा आणि भारताकडील उच्च दर्जाची प्रतिभा एकत्र आल्यास, आपण सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवू शकतो," असे त्यांनी नमूद केले.
त्यांनी भारताच्या सर्जनशील क्षेत्रातील अमर्याद संधींबद्दल सांगितले, जे पारंपरिक क्षेत्रांपलीकडे जाऊन चित्रपट निर्मिती , नाटक आणि थिएटरच्या पलिकडे गेमिंग, एआय-आधारित सामग्री निर्मिती आणि डिजिटल मीडिया यासारख्या क्षेत्रांमध्ये झपाट्याने विकसित होत आहे. त्यांनी नमूद केले की, हा उद्योग आधीच एक अब्जावधी डॉलर्सचे क्षेत्र बनला आहे आणि संपूर्ण देशभर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करत आहे.
ते आरआयएसई /डीईएल मधील सहभागींच्या सर्जनशीलतेचे कौतुक करत म्हणाले की, अशा व्यासपीठांचा उपयोग भविष्यातील वाढ आणि विकासासाठी आराखडा विकसित करण्यासाठी केला पाहिजे. त्यांनी प्रभावशाली व्यक्ती (इन्फ्लुएन्सर्स) यांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला आणि ते कशा प्रकारे नवीन तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचवू शकतात, हे स्पष्ट केले. तसेच, भारताच्या समृद्ध इतिहास, परंपरा आणि संस्कृतीशी लोकांना जोडण्यासाठी त्यांनी क्रिएटर्सना पुढाकार घेण्याचे आवाहन केले. त्यांनी हेही स्पष्ट केले की, भारताच्या पारंपरिक शिक्षणशास्त्राच्या आधारे शैक्षणिक साधने विकसित केली जाऊ शकतात आणि त्यामुळे कंटेंट क्रिएटर्ससाठी अमर्याद संधी उपलब्ध होतील. "सामान्य माणसाशी जोडण्याची क्रिएटर्सची क्षमता विशेष आहे—ती प्रचंड संधी निर्माण करू शकते," असे त्यांनी नमूद केले.
गोयल यांनी सरकारच्या भूमिकेवरही प्रकाश टाकला आणि व्यक्तींना त्यांचे स्वतःचे कल्पना आणि तंत्रज्ञान विकसित करण्यास मदत करण्यासाठी सरकार सक्षम भूमिका बजावत आहे, असे सांगितले. त्यांनी भारताच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय सहभागावर भर दिला आणि जगभरातील कलाकारांना भारतात सहकार्य करण्यासाठी आमंत्रित केले. "जितके आपण जगाशी अधिक संवाद साधू, तितक्या अधिक संधी भारतीय क्रिएटर्ससाठी उपलब्ध होतील. आपले कलाकार आधीच जागतिक स्तरावर स्वीकारले जात आहेत आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण प्रत्येक घरात पोहोचू शकतो," असे ते म्हणाले.
गोयल यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना भारताला "जगाची कंटेंट राजधानी" बनविण्याच्या महत्त्वाकांक्षेबाबत पुनरुच्चार केला. त्यांनी क्रिएटर्सना जबाबदार आणि नाविन्यपूर्ण सामग्रीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आणि भारताच्या निर्यात उत्पन्न वृद्धीमध्ये कौशल्य, कथा कथन, चित्रपट निर्मिती, संगीत निर्मिती, गेमिंग आणि डिजिटल मीडियाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.
* * *
N.Chitale/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2111332)
Visitor Counter : 18