युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने एनसीएएएफएस-2025 या क्रीडा स्पर्धांमध्ये वयाच्या फेरफारांविरोधातील राष्ट्रीय संहितेच्या मसुद्यावर मागवले अभिप्राय


वयामधील फेरफाराला प्रतिबंध करणारा, प्रामाणिक खेळाडूंना संरक्षण पुरवणारा आणि खेळाशी बांधिलकी जपणारा राष्ट्रीय संहितेचा मसुदा

Posted On: 13 MAR 2025 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 मार्च 2025

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने एऩसीएएएफएस 2025 या क्रीडा स्पर्धांमध्ये वयाच्या फेरफारांविरोधातील राष्ट्रीय संहितेचा मसुदा प्रसिद्ध केला असून त्यावर विचारविनिमय करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आणि हितधारकांकडून अभिप्राय/शिफारशी मागवल्या आहेत. या संहितेमुळे खेळाडूंच्या वय फेरफारीच्या(वय कमी दाखवण्याचे) प्रकारांना आळा घालता येईल, तसेच प्रामाणिक खेळाडूंच्या हिताचे संरक्षण होईल आणि देशव्यापी क्रीडा स्पर्धांमध्ये नैतिकता आणि खेळाविषयीची बांधिलकी जपली जाईल. खेळांमध्ये निकोप स्पर्धा सुनिश्चित करण्यासाठी, नैतिक प्रशासन निर्माण करण्यासाठी आणि भारतीय क्रीडा क्षेत्रात उत्तरदायित्व वृद्धिंगत करण्यासाठी सुमारे 15 वर्षांनंतर सध्याच्या चौकटीमध्ये बदल करण्यासाठी ही सुधारणा हाती घेण्यात आली आहे.   

या संहितेचे उद्दिष्ट:

  • खेळांमधील बांधिलकी आणि नैतिकतेशी तडजोड करणारे वयचोरीचे प्रकार रोखून, निकोप स्पर्धा सुनिश्चित करणे
  • केंद्रीकृत डेटाबेसच्या माध्यमातून वय निश्चित करण्यासाठी एका भक्कम पडताळणी प्रणालीची अंमलबजावणी करणे.
  • वयाच्या दाखल्यांमध्ये फेरफार करण्याच्या प्रकारात दोषी आढळणारे खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकारी यांना कठोर दंडांची तरतूद करणे
  • आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतींना अनुसरून क्रीडा शासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वृद्धिंगत करणे.

एनसीएएएफएस 2025 ची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  1. अनिवार्य वय पडताळणी आणि डिजिटल लॉकिंग: सर्व खेळाडूंनी नोंदणी प्रक्रियेदरम्यान, तीन अनिवार्य दस्तावेज सादर केलेच पाहिजेत. पडताळणी केल्यानंतर खेळाडूच्या वयाची एका केंद्रीकृत डिजिटल डेटाबेसमध्ये सुरक्षितपणे नोंदणी केली जाईल आणि भविष्यात त्यामध्ये कोणतेही फेरफार होऊ नयेत यासाठी कायमस्वरुपी लॉकिंग प्रक्रिया केली जाईल.
  2. वयामधील विसंगतीसाठी वैद्यकीय तपासणी: वयामध्ये विसंगती असल्याच्या प्रकरणात TW3 पद्धती, एमआरआय स्कॅन्स आणि सामान्य भौतिक आणि दंत तपासणीसारख्या चाचण्यांचा वापर केला जाईल. त्याशिवाय खेळाडूचे वय अचूकपणे निर्धारित करण्यासाठी एआय आधारित हाडांची तपासणी प्रायोगिक टप्प्यात करण्यात येईल. या चाचण्यांमधून काही विवाद उत्पन्न झाल्यास त्याबाबत अधिकारप्राप्त अपिलीय वैद्यकीय पॅनेलकडे पुढील मूल्यांकनासाठी दाद मागता येईल.
  3. नियमभंगासाठी समान दंड: वयाची चोरी केल्याचे आढळल्यास कठोर दंड ठोठावण्यात येईल. पहिल्यांदाच दोषी आढळलेल्या खेळाडूवर सर्व स्पर्धांमध्ये दोन वर्षासाठी बंदी घालण्यात येईल. त्यासोबत त्याची पदके आणि पुरस्कार रद्द केले जातील. दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास त्याच्यावर आजन्म बंदी घालण्यात येईल आणि आणि दंड संहिते अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल. प्रशिक्षक आणि इतर अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई केली जाईल आणि त्यांच्या पदावरून त्यांना हटवण्यात येईल.
  4. व्हिसल- बोअर यंत्रणा: खेळाडूंनी वय चोरून फसवणूक केलेल्या प्रकरणांची निनावी तक्रार नोंदवता यावी यासाठी सुरक्षित आणि गोपनीय व्यासपीठ तयार करण्यात येणार आहे. याशिवाय बेकायदा कृत्ये  उघडकीस आणून त्यांची जाहीर वाच्यता करणाऱ्या व्हिसलब्लोअर्सनी वास्तववादी अहवाल सादर करावेत यासाठी प्रोत्साहन आणि सवलत देणारी प्रणाली राबवली जाणार आहे.
  5. स्वेच्छेने वय जाहीर करणाऱ्या खेळाडूंसाठी माफी योजना: खेळाडूंनी त्यांचे खरे वय स्वेच्छेने जाहीर केले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. त्यांना वय जाहीर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देणाऱ्या माफी योजनेचा लाभ घेता येईल. या कार्यक्रमाअंतर्गत सहभागी खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर त्यांचा समावेश योग्य वयोगटात केला जाईल.
  6. द्विस्तरीय अपील यंत्रणा: वय निश्चितीशी संबंधित वाद हाताळण्यासाठी द्विस्तरीय अपील यंत्रणा वापरली जाईल. प्राथमिक वैद्यकीय तपासणीतील निष्कर्ष समाधानकारक वाटले नाहीत तर खेळाडू प्रथम प्रादेशिक अपील पॅनेलकडे अपील करू शकतात. त्यानंतरही समाधान झाले नाही तर खेळाडू केंद्रीय अपील समिती (सीएसी) कडे दाद मागू शकतात. सीएसीचा निर्णय अंतिम असेल आणि सर्व संबंधितांसाठी हा निर्णय बंधनकारक असेल.
  7. सचोटी/अनुपालन अधिकाऱ्यांची भूमिका: प्रत्येक स्पर्धेसाठी राष्ट्रीय क्रीडा महासंघ (एनएसएफ) द्वारे सचोटी/अनुपालन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल.  संहितेतील तरतुदींचे काटेकोर पालन करणे हे त्यांचे उत्तरदायित्व असेल.
  8. समर्पित राष्ट्रीय डेटाबेस: सर्व वयोगटातील खेळाडूंची पडताळणी माहिती सुरक्षितपणे संग्रहित करण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा भांडार प्रणाली (एनएसआरएस) शी जोडलेले एक समर्पित, केंद्रीकृत डिजिटल पोर्टल तयार केले जाईल.
  9. क्यूआर-सक्षम ओळखपत्रे: यशस्वी पडताळणीनंतर खेळाडूंना क्यूआर कोड असलेली ओळखपत्रे मिळतील. ही ओळखपत्रे डिजीलॉकर प्लॅटफॉर्मद्वारे डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून दिली जातील आणि सर्व क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी ही ओळखपत्रे अनिवार्य राहतील.
  10. सार्वजनिक उत्तरदायित्व आणि पारदर्शकता: संहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक मजबूत रचनात्मक देखरेख चौकट तयार केली जाईल. एनएसएफ आणि क्रीडा प्राधिकरण (साई) यांना नियमितपणे तपशीलवार अनुपालन अहवाल सादर करण्यास सांगून युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय अनुपालनाचे निरीक्षण करेल. त्यामुळे जबाबदारी आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होईल.

मान्यताप्राप्त राष्ट्रीय क्रीडा महासंघ (एनएसएप), भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई), केंद्र सरकारच्या विभागांद्वारे व्यवस्थापित क्रीडा नियंत्रण मंडळे आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयु) आणि स्वयंसेवी संस्था, एनएसपीओ, सार्वजनिक/खाजगी संस्था आणि क्रीडा विकासाला प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांमध्ये सामील असलेल्या सर्व खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी, प्रशासक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना हा मसुदा लागू असेल.

राज्ये/केंद्रशासित प्रदेश हा मसुदा स्वीकारू शकतात किंवा देशव्यापी एकवाक्यतेसाठी या मसुद्याचा वापर आदर्श रचनात्मक चौकट म्हणून करून त्या धर्तीवर त्यांचे स्वतःचे धोरण विकसित करू शकतात.

भागधारक आणि सामान्य जनतेने त्यांच्या सूचना/टिप्पण्या मंत्रालयाला section.sp3-moyas[at]gov[dot]in या ईमेलवर, 31.03.2025 पर्यंत पाठवाव्यात. एनसीएएएफएस 2025 चा मसुदा येथे पाहता येईल.

https://yas.gov.in/sports/draft-national-code-against-age-fraud-sports-ncaafs-2025-inviting-comments-suggestions.

 

* * *

N.Chitale/Shailesh/Prajna/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2111275) Visitor Counter : 25