आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय योग दिन पूर्व कार्यक्रम म्हणून आयोजित केलेल्या योग महोत्सव 2025 या दिमाखदार सोहळ्याचे प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन


या कार्यक्रमाने आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाच्या 100 दिवसांच्या उलटगणतीला झाली सुरुवात

योगाभ्यास ही केवळ एक जीवनशैली नव्हे तर मानसिक आणि शारीरिक निरामयतेसाठी एक सामर्थ्यशाली साधन आहे : प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), आयुष मंत्रालय

Posted On: 13 MAR 2025 6:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 मार्च 2025

 

आंतरराष्ट्रीय योग दिन पूर्व कार्यक्रम म्हणून आज नवी दिल्ली येथे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते योग महोत्सव 2025 चे उदघाटन झाले. भारताला जगभरातील योगाभ्यासाचे नेतृत्व म्हणून पुनर्स्थापित करण्याच्या उद्देशाने प्रतापराव जाधव यांनी अकराव्या योग दिनासाठी 10 वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम जाहीर केले. 

भारत सरकाराचे आयुष मंत्रालय आंतरराष्ट्रीय योग दिनासाठीचे नोडल मंत्रालय आहे. आतापर्यंतचे 10 आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत यशस्वी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असून योगदिनाला जगभरातून अतिशय उत्साहपूर्ण पाठिंबा मिळत आला आहे. याच धर्तीवर यावर्षी देखील योगाभ्यासाच्या विविध पैलूंच्या प्रसारासाठी आणि आरोग्य, निरामयता तसेच संपूर्ण विश्वातील शांततेसाठी एक जन चळवळ उभारण्याच्या उद्देशाने योग महोत्सव 2025 आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यापूर्वी 100 दिवसांची उलट गणती ही एक महत्त्वाची घटना असते. या कार्यक्रमामुळे 11 व्या आंतरराष्ट्रीय दिन -2025 च्या दिशेने प्रवासाची औपचारिक सुरुवात होते.

प्रतापराव जाधव यांनी या कार्यक्रमाचे उदघाटन करताना योगाचे महत्व अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण गेली 10 वर्षे या दिवस अतिशय भव्य महोत्सव म्हणून साजरा करत आहोत. योगाभ्यास ही केवळ एक जीवनशैली नव्हे तर मानसिक आणि शारीरिक निरामयतेसाठी एक सामर्थ्यशाली साधन आहे. लॉकडाउनच्या अतिशय आव्हानात्मक कालखंडात जगभरातील लाखो जणांना निरोगी आणि लवचिक राहण्यास मार्गदर्शन करणारी ती एक अतुलनीय शक्ती आहे, असे त्यांनी सांगितले. 

आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 निमित्त तयारीच्या दृष्टीने उपक्रमांना चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आयोजकांनी केलेल्या मागणीला प्रतिसाद म्हणून तसेच लोकहितासाठी तयार केलेल्या  'द इंटरनॅशनल डे ऑफ योगा हँडबुक, 2025, आवृत्ती 1.0' चे अनावरण प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले.

  

आयुष मंत्र्यांनी पुढे सांगितले की, या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिन (आयडीवाय) उपक्रमांमध्ये 10 विशेष वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम असतील, ज्यामुळे हा जागतिक कार्यक्रम अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक ठरेल:

  • योग संगम – 10,000 ठिकाणी एकाच वेळी योग प्रात्यक्षिक, जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न.
  • योग बंधन – 10 देशांसोबत आंतरराष्ट्रीय सहकार्य, जिथे प्रसिद्ध स्थळांवर योग सत्रे आयोजित केली जातील.
  • योग पार्क्स – 1,000 योग उद्यानांची निर्मिती, दीर्घकालीन समाज सहभागासाठी.
  • योग समावेश – दिव्यांगजन, ज्येष्ठ नागरिक, मुले आणि दुर्लक्षित गटांसाठी विशेष योग कार्यक्रम.
  • योग प्रभाव – सार्वजनिक आरोग्यावर योगाचा दशकभराचा प्रभावाचे मुल्यांकन  करण्याचा उपक्रम.
  • योग कनेक्ट – जागतिक आभासी योग शिखर परिषद, जिथे आघाडीचे योग तज्ज्ञ आणि आरोग्य तज्ञ सहभागी होतील.
  • हरित योग – योग आणि पर्यावरणसंवर्धन यांचा समन्वय साधणारा उपक्रम, ज्यामध्ये वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहिमा समाविष्ट असतील.
  • योग अनप्लग्ड – तरुणांना योगाच्या दिशेने आकर्षित करण्यासाठी विशेष कार्यक्रम.
  • योग महाकुंभ – 10 ठिकाणी आठवडाभर चालणारा उत्सव, जो पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील भव्य समारोप सोहळ्याने समाप्त होईल.
  • संयोगम – 100 दिवसांची मोहीम, जी आधुनिक आरोग्यसेवांमध्ये योग समाविष्ट करून सर्वांगीण आरोग्यासाठी योगदान देईल.

आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना (एनएसएसओ) च्या आकडेवारीचा हवाला देत सांगितले की, भारतातील 2.5 कोटी घरांमध्ये  म्हणजेच देशातील एकूण घरांपैकी सुमारे 8% घरांमध्ये किमान एक सदस्य नियमित योग साधना करतो. सार्वजनिक जीवनात  योग खोलवर रुजल्याचे हे  प्रतीक आहे.

   

या दिवसाची सुरुवात सकाळी 7 वाजता मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग (एमडीएनआयवाय) येथे ‘कॉमन योगा प्रोटोकॉल’ (सीवायपी) च्या थेट प्रात्यक्षिकाने झाली, जिथे 1,000 हून अधिक योग प्रेमींनी सहभाग घेतला.

एक दिवस चाललेल्या योग महोत्सव 2025 मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये तीन महत्त्वाची विषयनिहाय तांत्रिक सत्रे होती:

  • ‘कॉमन योगा प्रोटोकॉल’ चे वैज्ञानिक आधार
  • ‘लठ्ठपणाविरोधी अभियान: योगाची भूमिका’
  • ‘आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दशकपूर्तीचा उत्सव’

योग महोत्सव 2025 हा आरोग्य आणि कल्याणाच्या जागतिक क्रांतीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.

या उपक्रमाद्वारे योगाला जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवण्याच्या दिशेने भारत जागतिक स्तरावर नेतृत्व करीत आहे.

 

* * *

N.Chitale/Bhakti/Gajendra/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2111273) Visitor Counter : 23