शिक्षण मंत्रालय
वाचन,लेखन आणि पुस्तक संस्कृतीला चालना देण्यासाठी युवा लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठीच्या पंतप्रधान योजनेचा (पीएम-युवा 3.0) प्रारंभ
Posted On:
12 MAR 2025 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मार्च 2025
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने 11 मार्च 2025 रोजी, पीएम-युवा 3.0 (PM-YUVA 3.0)- या युवा लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठीच्या योजनेचा प्रारंभ केला. देशात वाचन, लेखन आणि पुस्तक संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि भारत आणि भारतीय लेखनाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी तरुण आणि उदयोन्मुख लेखकांना (30 वर्षांखालील) प्रशिक्षित करण्यासाठीचा हा लेखक मार्गदर्शन कार्यक्रम आहे.
पीएम-युवा योजनेच्या पहिल्या दोन कार्यक्रमांचा मोठा प्रभाव लक्षात घेता, तसेच 22 वेगवेगळ्या भारतीय भाषा आणि इंग्रजीतील तरुण आणि नवोदित लेखकांचा मोठ्या प्रमाणात असलेला सहभाग लक्षात घेता, आता पीएम-युवा 3.0 योजना सुरु केली जात आहे.
पीएम-युवा 3.0 (युवा, उदयोन्मुख आणि अष्टपैलू लेखक) योजनेची सुरुवात, भारताची समृद्ध संस्कृती, वारसा आणि देशाच्या विकासामधील दूरदर्शी लोकांचे योगदान जाणून घेण्यासाठी आणि त्याची प्रशंसा करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देण्याच्या पंतप्रधानांचा दृष्टीकोनाला अनुसरून आहे. पीएम-युवा 3.0 चे उद्दिष्ट, 1) राष्ट्र उभारणीमधील भारतीय वंशाच्या समुदायाचे योगदान 2) भारतीय ज्ञान प्रणाली आणि 3) आधुनिक भारताचे निर्माते (1950-2025) या संकल्पनांबाबत युवा पिढीचा दृष्टीकोन नवोन्मेशी आणि सृजनशील पद्धतीने समोर आणण्याचे आहे. अशा प्रकारे भारतीय वारसा, संस्कृती आणि ज्ञानव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध विषयांवर लिहिणाऱ्या लेखकांचा प्रवाह विकसित व्हायला ही योजना उपयोगी ठरेल.
शिक्षण मंत्रालयांतर्गत अंमलबजावणी संस्था म्हणून, नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया, मार्गदर्शनाच्या सुपरिभाषित टप्प्यांमध्ये योजनेची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुनिश्चित करेल. या योजनेअंतर्गत तयार केलेली पुस्तके नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियातर्फे प्रकाशित केली जातील आणि इतर भारतीय भाषांमध्ये अनुवादित केली जातील, ज्यामुळे 'एक भारत श्रेष्ठ भारत'च्या प्रचाराबरोबरच, सांस्कृतिक आणि साहित्यिक आदानप्रदान वाढेल. निवड झालेले तरुण लेखक मान्यवर लेखकांशी संवाद साधतील, साहित्य संमेलनांमध्ये सहभागी होतील आणि भारताचा समृद्ध वारसा आणि समकालीन प्रगती प्रतिबिंबित करणाऱ्या विविध प्रकारच्या कामांमध्ये योगदान देतील.
पीएम-युवा 3.0 (युवा, उदयोन्मुख आणि अष्टपैलू लेखक) चे वेळापत्रक पुढील प्रमाणे:
योजनेची घोषणा 11 मार्च 2025
11 मार्च 2025 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत https://www.mygov.in/ माध्यमातून होणाऱ्या अखिल भारतीय स्पर्धेच्या माध्यमातून एकूण 50 लेखकांची निवड केली जाईल.
संकल्पनेनुसार निवडल्या जाणाऱ्या लेखकांची संख्या:
1) राष्ट्र उभारणीमधील भारतीय वंशाच्या समुदायाचे योगदान – 10 लेखक
2) भारतीय ज्ञान प्रणाली – 20 लेखक
3) आधुनिक भारताचे निर्माते (1950-2025) – 20 लेखक
प्राप्त प्रस्तावांचे मूल्यांकन एप्रिल 2025 मध्ये केले जाईल.
निवड झालेल्या लेखकांची यादी मे - जून 2025 मध्ये जाहीर केली जाईल.
30 जून ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत नामवंत लेखक/मार्गदर्शकांकडून तरुण लेखकांना प्रशिक्षण देण्यात येईल.
नवी दिल्ली येथे होणार्या जागतिक पुस्तक मेळा 2026 मध्ये पीएम-युवा 3.0 मधील लेखकांसाठी मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय शिबिर आयोजित केले जाईल.
S.Kakade/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2111049)
Visitor Counter : 26