लोकसभा सचिवालय
मादागास्कर भारताचा विश्वासू मित्र आणि हिंद महासागर क्षेत्रातील महत्त्वाचा भागीदार - लोकसभा अध्यक्ष
आपत्तीच्या वेळी शेजारी देशांना मदत करण्याच्या बाबतीत भारत नेहमीच अग्रस्थानी - लोकसभा अध्यक्ष
Posted On:
12 MAR 2025 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मार्च 2025
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज स्पष्ट केले की भारत मादागास्करला एक आदरणीय आणि विश्वासू मित्र तसेच प्रगतीच्या मार्गातील खंबीर भागीदार मानतो. त्यांनी पुढे सांगितले की "सागर" (सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन दि रिलीजन) या दृष्टिकोनाच्या अनुषंगाने, मादागास्कर हिंद महासागर क्षेत्रातील भारताचा एक महत्त्वपूर्ण सहयोगी आहे. या घट्ट भागीदारीमुळे प्रादेशिक स्थैर्य बळकट होण्यास मदत होते आणि संपूर्ण प्रदेशाच्या आर्थिक समृद्धीला चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले.
बिर्ला यांनी हे विचार आज संसद भवन परिसरात मादागास्करच्या संसदीय शिष्टमंडळासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान मांडले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व मादागास्करच्या नॅशनल असेम्ब्लीचे अध्यक्ष जस्टिन टोकेली यांनी केले. बैठकीदरम्यान, बिर्ला यांनी भारत आणि मादागास्कर यांच्यातील ऐतिहासिकदृष्ट्या दृढ नाते अधोरेखित केले आणि सांगितले की दोन्ही देशांमध्ये अनेक शतकांपासून व्यापार, संस्कृती आणि परस्पर सहकार्याचे संबंध टिकून आहेत.
‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वज्ञानाने प्रेरित होऊन भारत नेहमीच शेजारी देशांना, विशेषतः आपत्तीच्या काळात, मदतीचा हात पुढे करत आला आहे, असे त्यांनी सांगितले. बिर्ला यांनी भारताने मादागास्करला दिलेल्या मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) कार्यांबाबत माहिती दिली. त्यांनी नमूद केले की भारताने मादागास्करच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी विविध प्रकल्पांना मदत केली आहे, जे परस्पर लाभदायक विकासासाठी भारताच्या कटिबद्धतेचे द्योतक आहे. बिर्ला यांनी हेही अधोरेखित केले की मादागास्करमधील भारतीय वंशाच्या नागरिकांनी दोन्ही देशांमधील मैत्री अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
लोकसभा अध्यक्षांनी असेही स्पष्ट केले की, भारतात लोकशाही ही केवळ एक शासनव्यवस्था नाही, तर ती आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा एक अविभाज्य घटक आहे. शिष्टमंडळाशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की स्वतंत्र भारताच्या 1952 मधील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून मतदारांचा सहभाग सातत्याने वाढत गेला आहे, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत जवळपास 66% मतदान झाले. हे भारतीय नागरिकांच्या लोकशाहीवरील दृढ विश्वासाचे आणि सक्रिय सहभागाचे प्रतीक आहे, असे त्यांनी नमूद केले.
बिर्ला यांनी मादागास्करच्या संसदीय शिष्टमंडळाला भारतीय संसदेच्या कार्यप्रणाली आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रक्रियेबाबत माहिती दिली.
जस्टिन टोकेली यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीचे तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या ताकदीचे कौतुक केले.
मादागास्करच्या संसदीय शिष्टमंडळाचे सोमवारी भारतात आगमन झाले. त्यांनी आज लोकसभेतील कार्यवाही प्रत्यक्ष पाहिली. लोकसभेच्या सदस्यांच्या वतीने लोकसभा अध्यक्षांनी या शिष्टमंडळाचे औपचारिक स्वागत केले.
S.Kakade/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2111008)
Visitor Counter : 23