विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“भारताचे वैज्ञानिक क्षेत्र आता महिलांच्या नेतृत्वाखाली”: आंतरराष्ट्रीय महिला दिनी डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

Posted On: 08 MAR 2025 8:29PM by PIB Mumbai

 

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी उद्धृत केल्याप्रमाणे महिला आता जीवनाच्या विविध क्षेत्रात नेतृत्व करत आहेत. “उदाहरण द्यायचे झाले तर भारताचे आदित्य-एल1 मिशन एका महिलेच्या नेतृत्वाखाली सुरू आहे, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि त्याच्या सहा प्रयोगशाळांचे नेतृत्वही महिलाच करत आहेत आणि चांद्रयान-3 मिशनच्या नेतृत्वाचे शिवधनुष्य एका महिलेनेच उचलले होते. यामुळे आपल्या वैज्ञानिक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण बदल घडला आहे,” असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. ते आज सीएसआयआर - राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा (सीएसआयआर-एनपीएल) येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025 निमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत होते.

या कार्यक्रमात आदित्य-एल1 च्या प्रकल्प संचालक निगार शाजी; चांद्रयान-3 च्या सहयोगी प्रकल्प संचालक कल्पना कलाहस्ती; आणि सीएसआयआरच्या महासंचालक आणि डीएसआयआर सचिव - सीएसआयआरच्या 80 वर्षांच्या इतिहासातील पहिल्या महिला महासंचालक डॉ. एन. कलैसेल्वी उपस्थित होत्या. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारतातील लिंगाधारित प्रतिनिधित्वाच्या जलद परिवर्तनावर विविध सीएसआयआर प्रयोगशाळांचे नेतृत्व करणाऱ्या सहा महिला संचालक आणि मंत्र्यांनी भर दिला.

या कार्यक्रमात मंत्र्यांनी "सीएसआयआर शक्ती: विज्ञानात महिला सहभागाचा उत्सव" या शीर्षकाचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओत भारताच्या संशोधन विश्वाला आकार देण्यात महिला शास्त्रज्ञांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला होता. सिंह यांनी सीएसआयआर तंत्रज्ञानाचे यशस्वीरित्या व्यावसायिकीकरण करणाऱ्या महिला उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. सीएसआयआर-आयआयसीटी च्या एजीआर तंत्रज्ञानानुसार बाजारातील कचऱ्याचे स्वयंपाकाच्या गॅसमध्ये रूपांतर करणाऱ्या डॉ. दिशा आहुजा, सीएसआयआर-सीएमईआरआय च्या ई-ट्रॅक्टर नवोन्मेषासाठी सुधा रेड्डी आणि पर्पल रिव्होल्यूशन उपक्रमांतर्गत सीएसआयआर-आयआयआयएम  च्या लैव्हेंडर उत्पादनांसाठी शिखा विरमणी यांचा सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता. याव्यतिरिक्त, सिंह यांनी "सीएसआयआर ASPIRE महिला शास्त्रज्ञ पुरस्कार विजेते" नावाचा एक संग्रह प्रसिद्ध केला. या संग्रहात सीएसआयआरचे सहकार्य लाभलेल्या महिला शास्त्रज्ञांच्या कामगिरीचे दस्तऐवजीकरण केलेले आहे. विशेष सन्मान म्हणून, डॉ. सिंह यांनी भारताच्या चांद्र मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या चांद्रयान-3 च्या सहयोगी प्रकल्प संचालक कल्पना कलाहस्ती यांचाही सत्कार केला.

या कार्यक्रमात बोलताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारतीय विज्ञान आणि प्रशासनाच्या बदलत्या चित्रावर भाष्य केले. महिलांनी केवळ सहभागाच्या पुढे जाऊन महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पांचे नेतृत्व केले असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील नागरी सेवांमध्ये उच्चपदस्थ महिलांची उदाहरणे सिंह यांनी उद्धृत केली. एक असे क्षेत्र जे एकेकाळी पुरुषप्रधान होते परंतु आता महिला या क्षेत्रातही सातत्याने उच्च पदांवर पोहोचत आहेत, असे ते म्हणाले. अलिकडच्या काही वर्षांत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) निकालांमध्ये महिलांचे नेतृत्व मोठ्या प्रमाणात दिसत असून हे भारताच्या सामाजिक-व्यावसायिक रचनेतील व्यापक बदल दर्शवणारे चिन्ह आहे, असेही ते म्हणाले.

अंतराळ संशोधनात लिंगाधारित सर्वसमावेशकतेसाठी भारताच्या वचनबद्धतेवर अधिक भर देताना, डॉ. सिंह यांनी खुलासा केला की गगनयान मोहिमेच्या आगामी चाचणी उड्डाणात एका महिलेसारखी दिसणारी 'व्योमित्रा' नावाची रोबोटिक अंतराळवीर असेल. ही रोबोटिक स्त्री भारताच्या अंतराळ प्रयत्नांमध्ये महिलांच्या वाढत्या भूमिकेचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले.

***

S.Tupe/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2109549) Visitor Counter : 26


Read this release in: Tamil , English , Hindi