पंचायती राज मंत्रालय
नवीन डिजिटल मोहिमेत “सरपंच पती” संस्कृतीवर लक्ष केंद्रित
पंचायत वेब सिरीजचा नवीन भाग “असली प्रधान कौन?” मध्ये निवडून आलेल्या महिला ग्रामप्रधानांच्या अनुकरणीय नेतृत्व कौशल्यांचे घडते दर्शन
Posted On:
07 MAR 2025 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मार्च 2025
पंचायती राज मंत्रालयाने प्रॉक्सी अर्थात छुपे प्रतिनिधित्व काढून टाकण्यासाठी आणि तळागाळातील प्रामाणिक महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी एक अग्रणी मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, पंचायती राज मंत्रालयाने स्थानिक ग्रामीण प्रशासनावर परिणाम करणाऱ्या महत्वपूर्ण समस्यांचे निवारण करण्यासाठी आकर्षक डिजिटल आशयावरील मालिकेच्या निर्मितीसाठी द व्हायरल फिव्हर (TVF) संस्थेबरोबर सहकार्य केले आहे. मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळवलेल्या पंचायत वेब-सिरीजच्या कथा विश्वात साकारलेल्या TVF च्या या निर्मितीमध्ये नीना गुप्ता, चंदन रॉय आणि फैसल मलिक यांच्यासारखे प्रसिद्ध कलाकार आहेत.

यातील पहिली प्रस्तुती “असली प्रधान कौन?” चा प्रीमिअर 4 मार्च 2025 रोजी मंत्रालयाच्या “सशक्त पंचायत नेत्री अभियान” च्या शुभारंभासह झाला. हा चित्रपट विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे देशभरातील पंचायती राज संस्थांमध्ये निवडून आलेल्या 1,200 हून अधिक महिला प्रतिनिधींसमोर प्रदर्शित करण्यात आला.
एक महिला ग्रामप्रधान लोककल्याणासाठी तिच्या अधिकारांचा किती प्रभावीपणे वापर करते हे ‘असली प्रधान कौन?’ या चित्रपटात दाखवले आहे. "असली प्रधान कौन ?" मध्ये 'सरपंच पती' संस्कृतीच्या मुद्द्याला स्पर्श केला आहे - जिथे पुरुष कुटुंबातील सदस्य अनधिकृतपणे निवडून आलेल्या महिला नेत्यांचे प्रतिनिधित्व करतात - एक अशी प्रथा जी पंचायती राज संस्थांमधील महिलांच्या प्रतिनिधीत्वाच्या घटनात्मक आदेशाला कमकुवत करते. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना, प्रख्यात अभिनेत्री नीना गुप्ता म्हणाल्या, “एक ठोस उद्देश असलेल्या कथांचा भाग बनणे नेहमीच आनंददायी असते. असली प्रधान कौन ? ही केवळ एक निर्मिती नाही तर ग्रामीण भारतातील महिलांना भेडसावणाऱ्या वास्तविक जीवनातील आव्हानांचे हे प्रतिबिंब आहे. कथा सांगण्याच्या या माध्यमातून हा संदेश किती सुंदरपणे पोहोचवला गेला आहे हे प्रेक्षकांनी पहावे यासाठी मी उत्सुक आहे.”

"पंचायती राज प्रणाली आणि संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधीत्व आणि भूमिकांमध्ये बदल: प्रॉक्सी सहभागासाठी प्रयत्न मोडून काढणे" यावरील अलिकडच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम सुरु केला असून त्याने व्यापक प्रमाणात लक्ष वेधले आहे आणि स्थानिक प्रशासनात प्रामाणिक महिला नेतृत्व मजबूत करण्यासाठी मंत्रालयाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना गती मिळाली आहे. आपल्या सर्वसमावेशक दृष्टिकोनाचा भाग म्हणून, मंत्रालय पुढील गोष्टींवर लक्ष केंद्रित करणाऱ्या दोन अतिरिक्त प्रस्तुती जारी करेल:
- डिजिटल हस्तक्षेप आणि पारदर्शकता – तंत्रज्ञान ग्रामीण प्रशासन कसे बदलू शकते हे दाखवणे
- स्वतःचे स्रोत महसूल - पंचायतींसाठी आर्थिक स्वातंत्र्य / आत्मनिर्भरतेचे महत्त्व अधोरेखित करणे
अभिनेते दुर्गेश कुमार आणि बुल्लू कुमार यांचाही सहभाग असलेले, हे आगामी चित्रपट तळागाळात प्रभावी बदल घडवून आणण्याच्या मंत्रालयाच्या ध्येयाला पुढे नेतील. वर्षभर चालणारे “सशक्त पंचायत नेत्री अभियान” देशभरातील पंचायती राज संस्थांच्या महिला निर्वाचित प्रतिनिधींची क्षमता आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. पंचायती राज पदांवर निवडून आलेल्या महिलांचे कौशल्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यावर ते लक्ष केंद्रित करेल, जेणेकरून त्या त्यांचे घटनात्मक अधिकार आणि जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडू शकतील.

पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://youtu.be/GVxadWl5Cjk?si=B8A652NLbt1odCo6
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2109206)
Visitor Counter : 57