युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 ची केली घोषणा


पॅरा गेम्समध्ये सहभागी होणार आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल पॅरालिम्पियन्स

नवी दिल्ली येथे 20 ते 27 मार्च दरम्यान होत असलेल्या केआयपीजीमध्ये पॅरिस 2024 चे सुवर्णपदक विजेते हरविंदर सिंग (तिरंदाजी) आणि धरमबीर (क्लब थ्रोअर) यांच्यासह 1230 खेळाडू सहभागी होणार

Posted On: 05 MAR 2025 9:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 04 मार्च 2025

नवी दिल्ली येथे 20 ते 27 मार्च दरम्यान होणाऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्स (दिव्यांगांसाठीच्या क्रीडा स्पर्धा) मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल पॅरा अॅथलीट (क्रीडापटू) सहभागी होणार असल्याचे केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी सांगितले.

खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धांचे (केआयपीजी) यंदा दुसर्‍यांदा आयोजन होत असून, डिसेंबर 2023 मध्ये नवी दिल्ली येथे पहिल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. आगामी केआयपीजी 2025 मधील सहा क्रीडा प्रकारांमध्ये सुमारे  1230 पॅरा अॅथलीट स्पर्धेत उतरणार असून, त्यापैकी अनेक जण 2024 पॅरिस पॅरालिम्पिक आणि चीनमधील हांगझोऊ इथल्या आशियाई पॅरा गेम्स 2022 चे पदक विजेते आहेत.

केआयपीजी 2025 मध्ये पॅरा तिरंदाजी, पॅरा अॅथलेटिक्स, पॅरा बॅडमिंटन, पॅरा भारत्तोलन, पॅरा नेमबाजी आणि पॅरा टेबल टेनिस या क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होतील. पहिल्या केआयपीजी मध्ये फुटबॉल (सेरेब्रल पाल्सी) स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती.

जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये 21 ते 26 मार्च दरम्यान पॅरा अॅथलेटिक्स, पॅरा तिरंदाजी, पॅरा भारत्तोलन या खेळांच्या तर, आयजी स्टेडियम येथे 20 ते 27 मार्च दरम्यान पॅरा बॅडमिंटन आणि पॅरा टेबल टेनिस या स्पर्धा होतील. डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजमध्ये 21 ते 25 मार्च दरम्यान पॅरा नेमबाजी स्पर्धा होतील.

यामध्ये हरविंदर सिंग (तिरंदाजी), धरमबीर (क्लब थ्रो) आणि प्रवीण कुमार (उंच उडी) या सुवर्णपदक विजेत्यांचा समावेश आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताने विक्रमी 29 पदकांची कमाई केली होती. त्यापैकी सात सुवर्णपदके होती. पॅरिस पॅरालिम्पिकमधील 84 सदस्यीय भारतीय संघात खेलो इंडियाचे पंचवीस खेळाडू होते. त्यापैकी पाच जण पदके जिंकून परतले.

पॅरा स्पोर्ट (दिव्यांगांसाठीच्या क्रीडा स्पर्धा) हे भारत सरकारचे प्राधान्य क्षेत्र आहे. 2028 एलए ऑलिंपिक सायकलसाठी, टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS), च्या कोअर ग्रुपमध्ये जवळजवळ 52 पॅरा अॅथलीट्सचा समावेश आहे."आपल्या पॅरा अॅथलीट्सची दिमाखदार कामगिरी खेळाडूंसाठी मोठी प्रेरणादायी आहे. 'आपण करू शकतो', ही वृत्ती खरोखरच प्रेरणादायी आहे आणि मला विश्वास आहे, की आगामी खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये आपण आणखी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करू,” डॉ. मांडवीय म्हणाले.

खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेनंतर खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 ही भारतीय क्रीडा प्राधिकरणाद्वारे आयोजित केली जाणारी दुसरी राष्ट्रीय स्पर्धा असेल. याचा पहिला भाग जानेवारीत लडाखमध्ये आयोजित करण्यात आला होता, आणि शेवटचा भाग 9 ते 12 मार्च दरम्यान जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे नियोजित आहे.

खेलो इंडिया पॅरा गेम्स

खेलो इंडिया पॅरा गेम्स हा खेलो इंडिया मिशनचा एक भाग असून, तो प्रतिभावान खेळाडूंना त्यांचे क्रीडा आणि स्पर्धात्मक कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. पॅरा अॅथलीट्सना राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा प्रदर्शित करता यावी, यासाठी डिसेंबर 2023 मध्ये पहिले खेलो इंडिया पॅरा गेम्स आयोजित करण्यात आले होते. या अंतर्गत नवी दिल्ली येथे तीन ठिकाणी सात क्रीडा प्रकारांची स्पर्धा झाली. मार्च 2025 मध्ये राजधानी दिल्ली येथे होणार्‍या दुसर्‍या केआयपीजी मध्ये सहा क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होतील.

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2108674) Visitor Counter : 28