विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
संशोधन आणि नवोन्मेषासाठी केंद्र सरकारची 20,000 कोटी रुपयांची तरतूद - केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह
भारत जागतिक संशोधन आणि विकास क्षेत्राचे नेतृत्व करणारा देश म्हणून उदयाला येत आहे - केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह
प्रविष्टि तिथि:
05 MAR 2025 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2025
भारताने स्टार्टअप्स क्षेत्रात गेल्या दशकभरात जागतिक स्तरावर तिसरे स्थान प्राप्त केले असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. जितेंद्र सिंह यांनी आज नवोन्मेषातील गुंतवणूक या विषयारील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारच्या समारोप सत्राला संबोधित केले. यावेळी जितेंद्र सिंह यांनी केंद्र सरकार भारताला नवोन्मेषाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला आणि केंद्र सरकारने 2025-26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात संशोधन, विकास आणि नवोन्मेषाशी संबंधित उपक्रमांसाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे अधोरेखित केले.
खाजगी क्षेत्रातील संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देणे हाच या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. याअंतर्गत सरकार उदयोन्मुख तंत्रज्ञानाधारीत उद्योग क्षेत्राच्या (सनराईझ उद्योग ) विस्तारासाठीच्या प्रयत्नांवर अधिक भर देत असल्याची बाबही त्यांनी अधोरेखीत केली.केंद्र सरकाच्या वतीने केल्या गेलेल्या या निधीच्या तरतुदीमुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेषतः डीप टेक क्षेत्रातील प्रगत संशोधनाला गती मिळेल तसेच यातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयक प्रगतीचे उद्दिष्टही साध्य होईल असे ते म्हणाले.

हा उपक्रम भारताच्या नवोन्मेष विषयक परिसंस्थेला बळकटी देईल, तसेच यामुळे अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर) उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), 5G आणि क्वांटम संगणन यांसारख्या अत्यावश्यक तंत्रज्ञान क्षेत्रांमधील खासगी गुंतवणुकीला अधिक प्रोत्साहन मिळेल असे ते म्हणाले.
भारताने नवोन्मेषाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे, 2014 च्या तुलनेत आत्तापर्यंत भारताच्या पेटंट मंजुरीचे प्रमाण 17 पटींने वाढले आहे, जागतिक नवोन्मेष निर्देशांकात भारताने 133 देशांमध्ये 81 व्या स्थानावरून 39 व्या स्थानापर्यंत मजल मारली आहे तसेच, वैज्ञानिक संशोधनात योगदान देणाऱ्या देशांमध्ये भारत आता जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे, अशी भारताची गौरवास्पद कामगिरीही जितेंद्र सिंह यांनी या वेबिनारमधील सहभागींसमोर मांडली.

केंद्र सरकारने विकसित भारत 2047 चे ध्येय समोर ठेवले असून, त्याला अनुसरूनच सरकारच्या वतीने हे उपक्रम आखले गेले आहेत असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले. या उपक्रमांच्या माध्यामातून सरकारने आखलेल्या आराखड्यानुसार आपल्या देशाचे विकसित देशात परिवर्तन घडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवोन्मेषातील गुंतवणूक ही केवळ आर्थिक प्रगतीशी संबंधित नाही, तर या गुंतवणुकीचा संबंध हा युवा पिढीला सक्षम करणे, भारताच्या तांत्रिक सार्वभौमत्वाला बळकटी देणे आणि जागतिक स्तरावर भारताचे भवितव्य सुरक्षित करण्याशी असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.
केंद्र सरकार संशोधन पाठ्यवृत्ती, डीप-टेक आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात धाडसाने गुंतवणूक करून भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानातील जागतिक नेतृत्व म्हणून प्रस्थापित करण्याचा निर्णायक प्रयत्न करत आहे, असेही जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले.
N.Chitale/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2108661)
आगंतुक पटल : 64