युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गुजरात मधील गिफ्ट सिटी येथे आयोजित ऑस्ट्रेलिया भारत क्रीडा उत्कृष्टता मंचाचे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटन

Posted On: 05 MAR 2025 5:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 05 मार्च 2025

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी बुधवारी गुजरातमध्ये गांधीनगर येथील गिफ्ट सिटी मध्ये आयोजित ऑस्ट्रेलिया-भारत क्रीडा उत्कृष्टता मंचाचे उद्घाटन केले. हा उपक्रम प्रथमच आयोजित करण्यात आला असून, दोन्ही देशांमधील क्रीडा सहकार्य बळकट करणे, हे या दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

भारतातील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त फिलिप ग्रीन ओएएम, गुजरातचे क्रीडा, युवा कल्याण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री हर्ष संघवी, आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. सकाळच्या सत्रात ऑस्ट्रेलियन क्रीडा क्षेत्रातील प्रभावी निर्णय कर्ते, भारतीय आणि ऑस्ट्रेलियन क्रीडा संस्था, उच्च शिक्षण प्रदाता आणि उद्योग क्षेत्रातील भागधारक उपस्थित होते. ऑलिंपिक आणि पॅरालिम्पिक खेळांच्या बोली, प्रतिभा विकास, क्रीडा विज्ञान आणि इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये सहकार्याच्या संधी शोधणे, हे या मंचाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

क्रिकेट आणि हॉकी व्यतिरिक्त अन्य क्रीडा प्रकारांमधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वाढत्या भागीदारीवर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला आणि प्रतिभा विकास, खासगी क्षेत्राचा सहभाग, क्रीडा विज्ञान आणि क्रीडा उद्योगातील व्यापार ही सहकार्याची प्रमुख क्षेत्रे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

“खेळाची आवड हा भारत आणि ऑस्ट्रेलियाला जोडणारा समान धागा आहे. या ऐतिहासिक व्यासपीठाच्या माध्यमातून आपण क्रिकेट आणि हॉकीच्या पलीकडे जात, उत्कृष्ट खेळाडू घडवणे, क्रीडा पायाभूत सुविधा आणि क्रीडा उद्योगातील गुंतवणुकीपर्यंत या भागीदारीचा विस्तार करत आहोत. 2036 च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवण्याची भारताची महत्त्वाकांक्षा, आमच्या देशाचे वाढते सामर्थ्य आणि खेळांप्रति असलेली वचनबद्धता दर्शवते,” त्या म्हणाल्या.

खेलो इंडिया, टॉप्स (TOPS), फिट इंडिया आणि अस्मिता (ASMITA) यासारख्या उपक्रमांद्वारे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली एक मजबूत क्रीडा परिसंस्था तयार करण्यासाठी काम करत आहोत, असे त्या म्हणाल्या.

2036 ऑलिंपिक आणि पॅरालिम्पिकच्या बोलीसाठी तयारी करत असताना, क्रीडा विकासातील ऑस्ट्रेलियन कौशल्याचा लाभ घेण्यासाठी आणि भारताला सर्वोत्तम पद्धतींची ओळख करून देण्याच्या दृष्टीने या मंचाची रचना करण्यात आली आहे. यावेळी सर्वोत्तम प्रतिभा विकास, प्रमुख क्रीडा स्पर्धा व्यवस्थापन, विविधता आणि समावेशन आणि क्रीडा विज्ञान यावर चर्चा झाली.प्रमुख उद्दिष्टांमध्ये ऑलिंपिक आणि पॅरालिम्पिक क्रीडा संघटनांविषयी ज्ञानाची देवाणघेवाण, भारतीय आणि ऑस्ट्रेलियन शैक्षणिक आणि क्रीडा संस्थांमधील संबंध मजबूत करणे, खेळाशी संबंधित उद्योगांमध्ये कॉर्पोरेट गुंतवणूक आणि व्यापाराला प्रोत्साहन देणे, प्रगत क्रीडा विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे खेळाडूंची कामगिरी उंचावणे आणि भविष्यासाठी पथदर्शक आराखडा तयार करणे, याचा समावेश होता.

क्रीडा विषयक पायाभूत सुविधांचे केंद्र म्हणून गुजरातचे वाढते महत्व अधोरेखित करून रक्षा खडसे यांनी क्रीडा महासत्ता बनण्याच्या भारताच्या दृष्टीकोनाबद्दल विश्वास व्यक्त केला.

“अशा प्रकारच्या देवाणघेवाणीमुळे भारताला जागतिक क्रीडा शक्ती बनायला सहाय्य मिळेल, असा मला विश्वास आहे. खेळाची संस्कृती वाढत जाईल आणि मजबूत भागीदारीसह आम्ही जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण सुविधा विकसित करू,” त्या म्हणाल्या.

ऑस्ट्रेलिया-भारत क्रीडा उत्कृष्टता मंच, हा एक अधिक मजबूत, अधिक स्पर्धात्मक क्रीडा परिसंस्था बनण्याच्या दिशेने भारताच्या प्रवासातील एक महत्वाचे पाऊल असून, यात ऑस्ट्रेलिया हा प्रमुख धोरणात्मक भागीदार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया क्रीडा सहकार्याला मार्गदर्शन करण्यासाठी काही शिफारशी तयार केल्या जातील. यामध्ये परस्परांच्या क्रीडा संस्थांदरम्यानच्या घनिष्ट  संबंधांची जोपासना, उच्च शिक्षण सहकार्य मजबूत करणे आणि ऑस्ट्रेलियन कौशल्याच्या सहाय्याने भारताच्या दीर्घकालीन ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक धोरणाला पाठबळ देणे याचा समावेश आहे.

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2108544) Visitor Counter : 26