आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते ओदिशातील पुरी येथे सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीतील चांगल्या आणि अनुकरणीय पद्धती आणि नवोन्मेष यावरील 9 व्या राष्ट्रीय शिखर परिषदेचे उद्घाटन


"भारतात माता मृत्युदरात झालेली घट जागतिक स्तरावरील घसरणीच्या तुलनेत दुप्पट आहे, जी तळागाळापर्यंत आरोग्य सेवा यंत्रणा बळकट करण्यासाठी घेतलेले प्रयत्न अधोरेखित करते. बाल मृत्युदर आणि 5 वर्षांखालील मृत्युदरातही लक्षणीय घट झाली आहे"

"जागतिक आरोग्य संघटनेचा जागतिक मलेरिया अहवाल 2024 आणि जागतिक क्षयरोग अहवाल 2024 मध्ये या दोन्ही आजारांचे उच्चाटन करण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने भारताने केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीची दखल घेतली आहे"

नड्डा यांनी जन भागीदारीचे महत्त्व केले अधोरेखित; आरोग्य सेवा क्षेत्रातल्या उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय आशा कार्यकर्त्या, एसएचओ आणि इतर तळागाळातील आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले

Posted On: 28 FEB 2025 3:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2025

 

केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज ओदिशातील पुरी येथे सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीतील चांगल्या आणि अनुकरणीय पद्धती आणि नवोन्मेषावरील 9 व्या राष्ट्रीय शिखर परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी उपस्थित होते.

दोन दिवस चालणाऱ्या या शिखर परिषदेत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांना भेडसावणाऱ्या सार्वजनिक आरोग्य आव्हानांना तोंड देण्यासाठी अवलंबलेल्या विविध सर्वोत्तम पद्धती आणि नवोन्मेष प्रदर्शित केले जातील तसेच त्यांचे दस्तऐवजीकरण केले जाईल. तसेच ही परिषद  राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना ज्ञानाची देवाणघेवाण आणि अनुभवांमधून शिकण्याची संधी देखील प्रदान करेल.

सत्राला  संबोधित करताना  जे.पी. नड्डा यांनी अधोरेखित केले की  2014 पासून भारताने आरोग्यसेवेत लक्षणीय प्रगती केली आहे. राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 ने उपचारात्मक आरोग्यसेवेच्या दृष्टिकोनात आमूलाग्र  बदल घडवून  उपचारात्मक तसेच प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक आणि व्यापक पैलूंचा समावेश असलेला दृष्टिकोन दिला आहे असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले की सरकारने प्राथमिक आणि दुय्यम आरोग्यसेवेत सुधारणा करण्याव्यतिरिक्त तृतीयक आरोग्यसेवेलाही मोठी चालना दिली आहे.  लोकांसाठी दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा सुनिश्चित करण्यावर केंद्र सरकारचा भर आहे असे ते म्हणाले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिराबाबत केलेल्या कामामुळे एकूण आरोग्यसेवा व्यवस्थेत प्राथमिक आरोग्यसेवेचा पाया मजबूत झाला आहे.

नड्डा म्हणाले की, "भारतात माता मृत्युदरात झालेली  घट जागतिक घसरणीच्या तुलनेत दुप्पट असून तळागाळातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी केलेले प्रयत्न अधोरेखित करते. बाल  मृत्युदर  आणि 5 वर्षांखालील बालकांच्या मृत्युदरातही लक्षणीय घट झाली आहे."

   

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी  अधोरेखित केले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) जागतिक मलेरिया अहवाल 2024 अनुसार, भारतात मलेरियाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे मान्य करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भारतात 2015 ते 2023 या कालावधीत क्षयरोगाचे (टीबी) प्रमाण 17.7% टक्क्यांनी घटले आहे, जे जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक क्षयरोग अहवाल 2024 अनुसार, 8.3% इतक्या जागतिक सरासरी घसरणीच्या दुप्पट आहे, असे ते म्हणाले.

कोविड-19 च्या संकटानंतरही भारताने क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट कमी केले नाही, असे त्यांनी नमूद केले. देशातील 33 राज्यांमधील 455 जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या 100-दिवसांच्या  क्षयरोग निर्मूलन मोहिमेचा त्यांनी विशेष उल्लेख केला, ज्यामध्ये आतापर्यंत 5 लाख क्षयरुग्ण आढळून आले आहेत.

कोणत्याही मोहिमेच्या यशात जनाभागीदारीचे असलेले महत्व ओळखून, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य क्षेत्रात मिळालेल्या यशाचे श्रेय आशा कार्यकर्ते, एसएचओ आणि तळागाळापर्यंत कार्यरत असलेल्या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना दिले. ते म्हणाले की, भारतातील आरोग्य सेवेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पंचायती राज संस्थांना अधिक सक्षम करणे गरजेचे आहे.

असंसर्गजन्य आजारांपासून (एनसीडी) असलेल्या धोक्याबद्दल बोलताना, केंद्रीय मंत्री नड्डा यांनी जीवनशैलीत बदल करण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी एनएचएमच्या (राष्ट्रीय आरोग्य मिशन) सध्या सुरू असलेल्या विशेष एनसीडी स्क्रीनिंग मोहिमेची प्रशंसा केली, ज्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाचा अशा 3 प्रकारच्या कर्करोगाची विनामूल्य तपासणी केली जाते.

नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘लॅन्सेट‘ अभ्यासावरही त्यांनी प्रकाश टाकला, ज्यात असे आढळले आहे, की एबी पीएम-जेएवाय    (AB PM-JAY) अंतर्गत नोंदणी झालेल्या कर्करोगाच्या रूग्णांना आजाराचे निदान झाल्यावर 30 दिवसांच्या आत उपचार मिळण्याचे प्रमाण 90% वाढले आहे, ज्यामुळे उपचारांना होणारा विलंब कमी झाला आणि कर्करोगाच्या रूग्णांचा आर्थिक बोजा कमी झाला.

केंद्रीय मंत्री जे पी नड्डा म्हणाले की, पुढील तीन वर्षांत देशातील प्रत्येक जिल्ह्यात ‘डे केअर कॅन्सर सेंटर’ असतील आणि यंदाच्या वर्षीच 200 जिल्ह्यांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाईल. आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी टेलिमेडिसिनच्या उपयुक्ततेवरही त्यांनी भर दिला.

नोव्हेंबर 2024 मध्ये 19 राज्यांमध्ये करण्यात आलेल्या 16 व्या ‘कॉमन रिव्ह्यू मिशन (सीआरएम)’, अर्थात ‘सामान्य पुनरावलोकन मिशन’च्या अहवालावर चर्चा, हा शिखर परिषदेचा एक महत्त्वाचा भाग असेल. सीआरएमअंतर्गत   18 नोव्हेंबर 2024 रोजी राष्ट्रीय स्तरावर माहिती देण्यात आली आणि त्यानंतर 19 ते 23 नोव्हेंबर 2024 दरम्यान 17 राज्यांमध्ये (अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, त्रिपुरा, मिझोराम, ओदिशा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल), आणि 26 ते 30 नोव्हेंबर 2024 दरम्यान आणखी दोन राज्यांमध्ये (झारखंड आणि महाराष्ट्र) क्षेत्रीय भेट आयोजित करण्यात आली. सीआरएममध्ये सरकारी अधिकारी, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, नागरी समाजाचे प्रतिनिधी आणि विकास भागीदार यांसह एकूण 19 पथके सहभागी झाली होती.

 

* * *

S.Kakade/Sushma/Rajshree/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2106923) Visitor Counter : 55