माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारताच्या गेमिंग क्रांतीचा जागतिक स्तरावर विस्तारः भारत टेक ट्रायम्फ कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वातील 20 विजेते होणार वेव्हज शिखर परिषदेत सहभागी
वैशिष्ट्यपूर्ण गेम्स आणि स्वदेशी बनावटीचे गेमिंग आयपीज जागतिक गुंतवणूकदार, प्रकाशक आणि उद्योग धुरिणांचा समावेश असलेल्या प्रेक्षकवर्गासमोर 1 ते 4 मे दरम्यान होणार सादर
Posted On:
27 FEB 2025 9:37PM by PIB Mumbai
मुंबई, 27 फेब्रुवारी 2025
बीटीटीपी अर्थात भारत टेक ट्रायम्फ कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाच्या महाअंतिम फेरीच्या शेवटी विजेत्या ठरलेल्या 20 गेमिंग डेव्हलपर्सची घोषणा करण्यात आली. हे विजेते आता 17 ते 21 मार्च दरम्यान, सॅन फ्रान्सिस्को येथील जीडीसीमध्ये, भारतात 3 ते 5 एप्रिल दरम्यान होणाऱ्या स्टार्टअप महाकुंभमध्ये आणि 1 ते 4 मे दरम्यान होणाऱ्या जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत(वेव्हज) भारताचे प्रतिनिधित्व करतील आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गेम्सचे आणि स्वदेशी बनावटीच्या गेमिंग आयपीजचे जागतिक गुंतवणूकदार, प्रकाशक आणि उद्योग धुरिणांचा समावेश असलेल्या प्रेक्षकवर्गासमोर सादरीकरण करतील.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग यांनी भारताच्या गेम विकास प्रतिभेचा प्रसार करण्यासाठी बीटीटीपीचे आयोजन केले आहे. इंटरॅक्टिव्ह एन्टरटेन्मेंट अँड इनोव्हेशन कौन्सिल( आयईआयसी) आणि विन्झो गेम्स यांचा हा महत्त्वाचा उपक्रम आहे.
टेक ट्रायम्फ कार्यक्रमाची तिसरी आवृत्तीः जागतिक आणि राष्ट्रीय मान्यतेचे प्रवेशद्वार
बीटीटीपीच्या तीन आवृत्त्यांमध्ये भारताचे सर्वोत्तम गेम डेव्हलपर्स आणि विद्यार्थी यांचा समावेश असलेले 1500 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले. ज्यामुळे जागतिक तंत्रज्ञान आणि आयपींसाठी मेड इन इंडिया नवोन्मेष आणि उद्यमशीलतेला चालना देणारा हा एक मंच बनला आहे.
सहभाग आणि बाजाराची उपलब्धता आणि निर्यात संधी या दोन्हींच्या दृष्टीकोनातून ही आवृत्ती सर्वात व्यापक आवृत्ती ठरली आहे.भारतभरातली याची व्याप्ती विचारात घेता गेमिंग स्टुडिओज, इंडी डेव्हलपर्स, अग्रणी आयआयटी आणि आयआयएम्स आणि पीसी, मोबाईल, कन्सोल यातील स्टार्टअप आणि इमर्सिव प्लॅटफॉर्म यांच्यामधील 1000 पेक्षा जास्त सहभागींची नोंद झाली आहे.
अधिक माहितीसाठी www.thetechtriumph.com येथे भेट द्या.
तिसऱ्या पर्वातील विजेत्या गेम्सचे मूल्यांकन भारताचे आघाडीचे गुंतवणूकदार आणि व्यावसायिक यांच्यातील दिग्गजांच्या परीक्षकमंडळाने केले
टेक ट्रंफ प्रोग्राम(भारत आवृत्ती) च्या तिसऱ्या पर्वातील विजेत्यांची यादी येथे आहे
भारताचे गेमिंग क्षेत्र आता नवोन्मेष, वृद्धी आणि तंत्रज्ञान आणि आयपीसाठी एका अतिशय महत्त्वाच्या वळणावर आहे
भारताच्या गेमिंग उद्योगातील एका महत्त्वाच्या वळणावर बीटीटीपीचा ठसा उमटवला जात आहे, ज्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणातील वृद्धीची नोंद होत आहे. अमेरिका –भारत धोरणात्मक भागीदारी मंचाच्या अहवालानुसार भारताच्या गेमिंग संधींचे आकारमान सध्या 4 अब्ज डॉलर असून 2034 पर्यंत ते 60 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आकारमानाची बाजारपेठ बनण्यासाठी सज्ज आहे.
बीटीटीपी हा या संधीला दिलेला प्रत्यक्ष प्रतिसाद असून संवादात्मक मनोरंजन, गेमिंग तंत्रज्ञान तसेच स्वदेशी आयपी निर्मिती क्षेत्रात जागतिक नेत्याच्या रुपात भारताचे स्थान निश्चित करण्याच्या उद्देशाने याचे आयोजन केले आहे. हा उपक्रम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘क्रिएट इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ म्हणजेच ‘जगाच्या वापरासाठी भारतात निर्मिती करा’ या संकल्पनेला अनुसरून असून भारतातील कलाकारांना गेमिंग, एव्हीजीसी (अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स) तसेच डिजिटल कथाकथन या क्षेत्रांतील संधींचा लाभ घेण्याच्या त्यांच्या आवाहनाला बळकटी देणारा आहे.
याप्रसंगी उपस्थित असलेले केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सह सचिव सी.सेन्थिल राजन यांनी गेमिंग क्षेत्रातल्या सर्व संबंधितांना महाराष्ट्रातल्या मुंबईत होणाऱ्या वेव्हज 2025 मध्ये उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले. गेमिंग क्षेत्रातील काही भारतीय व्यावसायिक याआधीच जगातील काही सर्वात यशस्वी उपक्रमांमध्ये योगदान देत असून ते सर्जनशीलता आणि तांत्रिक नवोन्मेष यासाठीचे केंद्र म्हणून भारताचा नावलौकिक आणखी बळकट करत आहेत.” ते पुढे म्हणाले की भारताच्या एव्हीजीसी क्षेत्राच्या भविष्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (एमआयबी) आर्थिक वृद्धी तसेच रोजगार निर्मितीला चालना देण्याची या क्षेत्राची क्षमता ओळखली असून त्याच उद्देशाने वेव्हज आणि एव्हीजीसी-एक्सआर साठीचे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र यांसारखे धोरणात्मक उपक्रम हाती घेतले आहेत. भारताला जागतिक एव्हीजीसीचे पॉवरहाऊस म्हणून भारताचे स्थान निश्चित करणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे. क्रिएट इन इंडिया स्पर्धा आणि टेक ट्रिम्फ कार्यक्रम यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून, वेव्हज उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील सहयोगाला चालना देतो, अस्सल कार्यक्रमांच्या निर्मितीला प्रोत्साहन देतो आणि या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय भागीदारीचा मार्ग सुलभ करतो असे त्यांनी सांगितले.
वेव्हज 2025 विषयी थोडक्यात माहिती:
केंद्र सरकारने महाराष्ट्रात, मुंबई येथे 1 ते 4 मे 2025 या कालावधीत आयोजित केलेली पहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद म्हणजेच वेव्हज हा कार्यक्रम माध्यमे आणि मनोरंजन (एम आणि ई) क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
तुम्ही या उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक असा अथवा, गुंतवणूकदार, सर्जक अथवा नाविन्यपूर्ण निर्मिती करणारे असा, या शिखर परिषदेत तुम्हाला इतरांशी जोडले जाण्यासाठी, सहयोगासाठी, नव्या संशोधनासाठी आणि एम आणि ई क्षेत्राच्या परीदृश्यात योगदान देण्यासाठी अनोखा जागतिक मंच उपलब्ध होईल.
सामग्री निर्मिती, बौद्धिक मालमत्ता आणि तांत्रिक नवोन्मेष यांसाठीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून भारताचे स्थान उंचावत वेव्हज हा उपक्रम भारताची सर्जनशील क्षमता वाढवेल. या कार्यक्रमात प्रसारण, मुद्रित माध्यमे, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल माध्यमे, समाज माध्यम मंच, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता, वर्धित वास्तव (एआर), आभासी वास्तव (व्हीआर) तसेच विस्तारित वास्तव (एक्सआर) या उद्योगांवर आणि क्षेत्रांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे येथे शोधा.
चला ! वेव्हज साठी आताच नोंदणी करा.
N.Chitale/S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2106776)
Visitor Counter : 18