पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

'एकतेचा महायज्ञ ' चे प्रतीक ठरलेल्या महाकुंभची सांगता,प्रयागराज इथे एकतेच्या महाकुंभात तब्बल 45 दिवसांपर्यंत ज्या प्रकारे एकतेच्या महासोहळ्याचे,एका महोत्सवात एकाच ठिकाणी एकत्र आलेल्या 140 कोटी देशवासियांच्या आस्थेचे जे दर्शन घडले ते खरोखरच मंत्रमुग्ध करणारे होते – पंतप्रधान नरेंद्र मोदी


भारताला आपल्या वारशाचा अभिमान असून, आता भारत एका नव्या ऊर्जेने पुढे वाटचाल करत आहे.ही देशाचे नवे भवितव्य लिहिणाऱ्या परिवर्तनाच्या युगाची पहाट आहे - पंतप्रधान

महाकुंभ मेळ्यात प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या भाविकांची संख्या म्हणजे केवळ एक विक्रम नसून, या संख्येने आपली संस्कृती आणि वारसा यापुढची अनेक शतके अधिक मजबूत आणि समृद्ध राहावा यासाठी भक्कम पाया रचला आहे - पंतप्रधान

समाजाच्या प्रत्येक वर्गातील आणि प्रत्येक क्षेत्रातील लोक या महाकुंभात एकत्र आले - पंतप्रधान

Posted On: 27 FEB 2025 11:43AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2025


महाकुंभ हा एकतेचा महायज्ञ होता असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की भारताला आपल्या वारशाचा अभिमान असून, आता भारत एका नव्या ऊर्जेने पुढे वाटचाल करत आहे. ही देशाचे नवे भवितव्य लिहिणाऱ्या परिवर्तनाच्या युगाची पहाट आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. यंदाच्या महाकुंभ मेळ्यात प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या भाविकांची संख्या म्हणजे केवळ एक विक्रम नसून, या संख्येने आपली संस्कृती आणि वारसा यापुढची अनेक शतके अधिक मजबूत आणि समृद्ध राहावा यासाठी भक्कम पाया रचला आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. हा एकतेचा महाकुंभ यशस्वीरित्या पार पडल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. याबद्दल त्यांनी नागरिकांची मेहनत, त्यांचे प्रयत्न आणि निर्धाराबद्दल त्यांचे आभार मानले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले विचार एका ब्लॉगच्या माध्यमातून लिहून ते एक्स या समाज माध्यमावर सामायिक केले आहेत.

"महाकुंभ संपन्न झाला... एकतेचा महायज्ञ संपन्न झाला. प्रयागराज इथे एकतेच्या महाकुंभात तब्बल 45 दिवसांपर्यंत ज्या प्रकारे 140 कोटी देशवासियांची आस्था एकत्र, एकाच वेळी या एका पर्वाशी जोडली गेली, ते मंत्रमुग्ध करणारे आहे! महाकुंभाची सांगता झाल्यानंतर जे विचार मनात आले, त्यांना मी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे…"

"महाकुंभात ज्या मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला, तो केवळ एक विक्रम नाही, तर आपल्या संस्कृती आणि वारशाला सुदृढ आणि समृद्ध ठेवण्यासाठी अनेक शतकांकरता एक भक्कम पाया देखील रचला गेला आहे."

"प्रयागराजमधील महाकुंभ आज संपूर्ण जगभरातील व्यवस्थापन तज्ज्ञांच्या बरोबरीनेच नियोजन आणि धोरण तज्ञांसाठीही संशोधनाचा विषय बनला आहे.

आज आपल्या वारशाचा अभिमान बाळगणारा भारत आता एका नव्या ऊर्जेसह पुढे वाटचाल करत आहे. ही युग परिवर्तनाची चाहूल आहे, जी देशाचे नवे भविष्य लिहिणार आहे."

"समाजाच्या प्रत्येक वर्गातील आणि प्रत्येक क्षेत्रातील लोक या महाकुंभात एकत्र आले. हे एक भारत, श्रेष्ठ भारताचे चिरस्मरणीय दृश्य, कोट्यवधी देशवासियांसाठी आत्मविश्वासाचा महान सोहळा ठरले आहे."

"एकतेचा हा महाकुंभ यशस्वी करण्यासाठी देशवासियांनी घेतलेले कष्ट, त्यांचे प्रयत्न, त्यांचे संकल्प यामुळे मंत्रमुग्ध झालेला मी, बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग, श्री सोमनाथाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. मी श्रद्धेच्या रूपातील संकल्प पुष्प अर्पण करत प्रत्येक भारतीयासाठी प्रार्थना करेन. देशवासियांमधील एकतेचा हा अखंड प्रवाह असाच वाहता राहो अशी मी कामना करेन. "

 

 

S.Kane/T.Pawar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2106583) Visitor Counter : 40