कृषी मंत्रालय
पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण
9.8 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना थेट हस्तांतरणाद्वारे 22,000 कोटींपेक्षा अधिक लाभ
10,000 FPO निर्मिती व प्रोत्साहन योजनेअंतर्गत 10,000 FPO ची निर्मिती
राष्ट्रीय गोकुळ अभियानांतर्गत देशी प्रजातींसाठी मोतीहारी येथे 33.80 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या क्षेत्रिय उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन
बरौनी येथे 113.27 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेल्या दुग्धोत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन
526 कोटी रुपये गुंतवणुकीच्या वारीसालिगंज-नवदाह-तिलैया रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे (36.45 किमी.) उद्घाटन
47 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या इस्माइलपूर – राफीगंज रस्त्यावरील उड्डाणपुलाचे उद्घाटन
Posted On:
22 FEB 2025 1:19PM by PIB Mumbai
केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्र्यांनी शुक्रवारी पीएम किसान योजनेच्या आगामी 19 व्या हप्त्याच्या वितरणासंबंधीची माहिती माध्यमांना दिली. 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू झालेल्या पीएम किसान योजनेद्वारे पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6000 रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येते. आतापर्यंत 18 हप्त्यांमध्ये देशभरातल्या शेतकरी कुटुंबांना 3.46 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वितरीत करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या कल्याणाला मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे केंद्रिय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये सुरू केलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेती उत्पादन वाढविणे, लागवडीवरील खर्च कमी करणे, शेतमालाला रास्त दराची हमी, शेतीतल्या नुकसानीची भरपाई, शेतीमध्ये वैविध्य आणणे आणि किमती कमी करणे हा हेतू आहे. आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी भागलपूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल असे सांगण्यास मला आनंद होत आहे असे चौहान म्हणाले. हे पीएम किसान योजनेच्या सहा वर्षांच्या यशस्वी अंमलबजावणीचे प्रतीक आहे. देशभरातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचे काम यापुढेही सुरूच राहील. याअनुषंगाने कृषी मंत्रालयातर्फे पशु संवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग, रेल्वे मंत्रालय व बिहार राज्य सरकारच्या सहकार्याने भागलपूर येथे किसान सन्मान समारंभ आयोजित केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
शिवराज सिंग चौहान म्हणाले की पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता 9 कोटी 60 लाख शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला. एखादा पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहिला असेल तर त्याला यामध्ये समाविष्ट करण्यासाठी कृषी मंत्रालय सक्रिय प्रयत्न करत आहे आणि या प्रयत्नांमुळेच 19 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 19 व्या हप्त्याच्या वितरणाच्या माध्यमातून 2.41 कोटी महिला शेतकऱ्यांसह देशभरातील 9.8 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना कोणत्याही मध्यस्थाच्या मदतीशिवाय थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून 22,000 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित केले जाईल. यातून सरकारची शेतकरी कल्याण व कृषी समृद्धीप्रती असलेली वचनबद्धता प्रतीत होते. एकट्या बिहार राज्यात आधीच्या हप्त्यांच्या माध्यमातून 89.56 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 25,497 कोटींपेक्षा अधिक लाभ मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. 19 व्या हप्त्याअंतर्गत सुमारे 76.37 लाख शेतकऱ्यांना 1,591 कोटींपेक्षा जास्त लाभ मिळेल. यामुळे बिहारमधील लाभार्थ्यांना मिळालेली एकंदर रक्कम सुमारे 27,088 कोटी रुपये इतकी होईल. पीएम किसान योजनेच्या १८ हप्त्यांद्वारे केवळ भागलपूरमध्येच आतापर्यंत 813.87 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम सुमारे 2.82 लाख लाभार्थ्यांना देण्यात आली आहे. 19 व्या हप्त्यापोटी 2.48 लाख लाभार्थ्यांना 51.22 कोटी रुपयांपेक्षा जास्त लाभ मिळेल. लाभाची एकूण रक्कम सुमारे 865.09 कोटी रुपये इतकी असेल.
भागलपूरमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बिहारचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतन राम मांझी, पंचायत राज व मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री लालन सिंग आणि अन्य मान्यवर सहभागी होतील. हा कार्यक्रम बिहारसह प्रत्येक स्तरावर आयोजित करण्यात आला आहे. राज्य सरकारांतर्फे राज्य, तालुका, गट व ग्राम पंचायत स्तरावर हा कार्यक्रम त्याचवेळी आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली.
देशातील 731 कृषी विज्ञान केंद्रांमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. केंद्र आणि राज्य शासनांच्या योजनांबाबतची जागरुकता वाढविण्याच्या उद्देशाने लाभ वितरणाचा दिवस किसान सन्मान समारंभ म्हणून साजरा केला जाईल. राज्यांचे कृषी मंत्री, खासदार व आमदार आपापल्या क्षेत्रातून या कार्यक्रमात सहभागी होतील. कार्यक्रमादरम्यान सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते तेलबिया अभियान, कृषी पायाभूत निधी, प्रत्येक थेंबातून अधिक पीकउत्पादन आणि पंतप्रधान कृषी विमा योजनेअंतर्गत, कृषी यंत्रसामुग्री व बियाणे संच यांचे वितरण केले जाईल असे त्यांनी सांगितले. याशिवाय FPO व KVK च्या नेतृत्वात राज्य आणि जिल्हा स्तरावर नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती आणि भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांवर आधारित प्रदर्शनांचे आयोजन केले जाईल. शाश्वत शेती तंत्रज्ञान स्वीकारण्याबाबतची जागरुकता वाढविण्यासाठी मुख्य कार्यक्रमानंतर 2 ते 3 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनांमुळे नवकल्पना व शाश्वत शेती प्रयोगांना प्रोत्साहन मिळेल.
19 वा हप्ता वितरण कार्यक्रमाचे थेट प्रसारण डीडी किसान वाहिनी, MyGov वेबकास्ट, यूट्यूब, फेसबुक आणि 5 लाखांपेक्षा जास्त समान सेवा केंद्रांद्वारे करण्यात येईल असे चौहान यांनी पत्रकारांना सांगितले. प्रत्यक्ष आणि आभासी माध्यमातून सुमारे अडीच कोटींपेक्षा जास्त शेतकरी या कार्यक्रमात सहभागी होतील.
केंद्रिय मंत्री म्हणाले की किसान सन्मान निधीमुळे छोट्या शेतकऱ्यांचे आयुष्य बदलून गेले आहे. या योजनेअंतर्गत 6,000 रुपयेतीन हप्त्यांमध्ये थेट जमा केले जातात. सुमारे 3.46 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. 19 वा हप्ता वितरीत केल्यानंतर एकंदर 3.68 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. पेरणीच्या वेळी छोट्या शेतकऱ्यांना बियाणे व खतांच्या खरेदीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, मात्र आता या निधीतून त्यांना शेतीसाठी आवश्यक खर्च करता येईल, असे ते म्हणाले. IFPRI ने पी एम किसान योजनेचा स्वतंत्रपणे अभ्यास केला आहे. या योजनेतून मिळालेल्या निधीमुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या अडचणीतून मुक्तता मिळाली असून त्यांची जोखीम पत्करायची क्षमता वाढली आहे असे या अभ्यासाद्वारे आढळून आले आहे. किसान क्रेडीट कार्डद्वारे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 3 लाख रुपये मिळत असत पण आता त्याची मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाविषयी बोलताना केंद्रिय मंत्री म्हणाले, या कार्यक्रमाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी भागलपूरमध्ये काही अन्य उपक्रमांचेही उद्घाटन करतील. बिहारमध्ये बरौनी येथे 113.27 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरू केलेल्या आणि 2 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या अत्याधुनिक दुग्धोत्पादन प्रकल्पाचा प्रारंभ होईल. हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचा कार्यक्रम असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोतीहारी इथे राष्ट्रीय गोकुळ अभियानांतर्गत पशुपालन व दुग्धउत्पादन वाढविण्यासाठी 33.80 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेल्या क्षेत्रिय उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करतील.
पंतप्रधान मोदी बिहारमधील 10,000 व्या शेतकरी उत्पादक संस्थेचे (FPO) उद्घाटन करतील. यामुळे 2020 साली चालू झालेल्या योजनेअंतर्गत 10,000 (FPO) सुरू करण्याचे उद्दीष्ट साध्य होईल असे चौहान यांनी सांगितले. हे उद्दीष्ट साध्य झाल्यामुळे शेतकऱ्यांची सौदे करण्यातली क्षमता वाढवून त्यांचा बाजारातील सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या उपक्रमाची यशस्वी पूर्तता होईल. वर्ष 2027-28 पर्यंत 6,865 कोटी रुपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकाची ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 फेब्रुवारी 2020 रोजी सुरू केली. ही योजना सुरू झाल्यापासून 254.4 कोटींचा समभाग निधी 4,751 FPO ना देण्यात आला आहे आणि 453 कोटी रुपयांचे पत हमी संरक्षण 1,900 FPO ना देण्यात आले आहे.
चौहान म्हणाले की वरील उपक्रमांसह बिहारमधील दळणवळणाची सुविधा सक्षम करुन सुरळीत वाहतूक उपलब्ध करुन देण्यासाठी उभारलेल्या काही महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटनदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. उद्घाटन होणाऱ्या प्रकल्पांमध्ये 526 कोटी रुपये गुंतवणुकीच्या व 36.45 किमी लांबीच्या वारीसालिगंज-नवादाह-तिलैया रेल्वे मार्ग प्रकल्पाचा समावेश आहे. या विस्तारीकरणामुळे रेल्वेची क्षमता वाढेल, गर्दी कमी होईल व प्रवासी आणि मालाच्या सुरळीत वाहतूकीची हमी मिळेल. महत्त्वाच्या भागांमधील वाहतूक सुविधा सक्षम झाल्यामुळे स्थानिक प्रवासी, व्यापारी आणि व्यावसायिक यांच्यासाठी अधिक कार्यक्षम व गतीमान रेल्वे सेवा उपलब्ध होईल.
तसेच 47 कोटी रुपये खर्चाच्या इस्माइलपूर-राफिगंज उड्डाणपुलाचेही उद्घाटन होईल. यामुळे त्या भागातील वाहतूक कोंडी कमी होऊन रस्ता सुरक्षेतही सुधारणा होईल. बिहारमध्ये मखाना हे महत्त्वाचे पीक आहे. मखाना उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी मखाना मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती चौहान यांनी माध्यमांना दिली. ते म्हणाले की ते 23 तारखेला बिहारमध्ये येतील आणि थेट मखाना उत्पादकांशी मखाना उत्पादक शेतकऱ्यांना अधिक सुविधा पुरविण्याबाबत चर्चा करतील. ही चर्चा कुठल्याही सभागृहात नाही तर तळ्यांच्या बाजूलाच केली जाईल. या पत्रकार परिषदेच्या शेवटी देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणाला सरकारचे प्राधान्य असल्याच्या मुद्द्यावर चौहान यांनी भर दिला.
शेतकरी केंद्रित डिजिटल पायाभूत सुविधांमुळे सरकारच्या योजनांचा लाभ देशातल्या शेतकऱ्यांना कोणत्याही मध्यस्थाविना थेट मिळेल. शेतकऱ्यांनी स्वप्रमाणित केलेली पात्रता व तिला राज्य शासनाने दिलेला दुजोरा यावर व विश्वासाच्या आधारावर ही योजना सुरू झाली. लाभार्थ्यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रमाणीकरणासाठी व वैधता तपासण्यासाठी देशातील डिजिटल यंत्रणांचा हळूहळू वापर केल्यामुळे लाभ शेवटपर्यंत पोहोचत असल्याची खात्री झाली आणि योजनेच्या अंमलबजावणीत कमालीची पारदर्शकता व कार्यक्षमता आली. यामध्ये PFMS, UIDAI, प्राप्तीकर विभाग इत्यादींच्या पोर्टलचा समावेश आहे. पीएम किसान योजनेतील माहितीचा दर्जा सुधारण्यासाठी पीएम किसान योजनेमध्ये अनिवार्य तपासण्यांची अंमलबजावणी करण्यात आली.
***
M.Pange/S.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2105502)
Visitor Counter : 28