संरक्षण मंत्रालय
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांची राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजला भेट
भविष्यातील सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी तांत्रिक प्रगती, धोरणात्मक विचारसरणी आणि अनुकूलता या गोष्टींचा अंगिकार करण्याचे जनरल अनिल चौहान यांचे छात्रांना आवाहन
Posted On:
19 FEB 2025 8:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2025
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी 19 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालयाला भेट दिली. भारतीय सशस्त्र दलाच्या भावी नेतृत्वाला आकार देण्यात संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरआयएमसीचे कमांडंट, प्राध्यापक आणि छात्रांकडून जनरल चौहान यांचे प्रेमाने तसेच संपूर्ण लष्करी शिष्टाचारानुसार सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. त्यांच्या या भेटीत, त्यांनी छात्रांशी आणि प्राध्यापकांशी संवाद साधला तसेच संस्थेतील काळजीपूर्वकपणे आखण्यात आलेले प्रशिक्षण, शैक्षणिक अभ्यासक्रम आणि नेतृत्व विकास कार्यक्रम याबाबतचे त्यांचे विचार जाणून घेतले.
जनरल चौहान यांनी आपल्या भाषणात, उल्लेखनीय कर्तृत्व गाजविणारे लष्करी अधिकारी घडविण्याच्या आरआयएमसीच्या परंपरेची प्रशंसा केली, तसेच शिस्त, निष्ठा आणि देशसेवा या मूल्यांचे महत्त्व विशद केले. संस्थेचे छात्र भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यास सज्ज असतील याची खबरदारी घेण्याबरोबरच आधुनिक शिक्षणाची लष्करी परंपरांशी सांगड घालण्यात संस्थेने दाखविलेल्या वचनबद्धतेचे त्यांनी कौतुक केले. युद्धतंत्राचे नवीन स्वरूप विकसित होत असल्याचे स्पष्ट करत भविष्यातील सुरक्षेच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तांत्रिक प्रगती, धोरणात्मक विचार आणि अनुकूलता यांचा अवलंब करण्याचे त्यांनी छात्रांना आवाहन केले.

जनरल चौहान यांनी RIMC चा समृद्ध इतिहास आणि संस्थेतील नामवंत माजी विद्यार्थ्यांनी देशासाठी दिलेले योगदान दर्शविणाऱ्या सोमनाथ रिसोर्स सेंटर आणि संग्रहालयालाही भेट दिली. विविध लष्करी कारवायांमध्ये RIMC मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांनी बजावलेल्या भूमिकेचे प्रतिबिंब असलेल्या प्रदर्शनीय वस्तूंची जनरल चौहान यांनी अत्यंत आस्थेने माहिती घेतली. वाढीचे आणि लवचिकतेचे प्रतीक म्हणून, जनरल चौहान यांनी संस्थेच्या आवारात वृक्षारोपण केले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाबद्दल छात्रांनी त्यांचे आभार मानले. RIMC ची मूल्ये आणि परंपरा जपण्याचा निर्धार व्यक्त केल्यानंतर या भेटीचा समारोप झाला.
भविष्यातील लष्करी नेत्यांना घडविण्यात आणि त्यांच्यामध्ये सेवा आणि देशभक्तीची अढळ भावना निर्माण करण्यासाठी समर्पित असलेली प्रमुख संस्था म्हणून असलेली RIMC ओळख जनरल चौहान यांच्या भेटीमुळे अधिक दृढ झाली.
* * *
M.Pange/M.Ganoo/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2104839)
Visitor Counter : 56