अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वर्ल्ड फूड इंडिया (डब्ल्यूएफआय) – 2025 च्या चौथ्या वर्षीच्या कार्यक्रमाशी संबंधित उपक्रमांच्या संदर्भात निवासी आयुक्तांशी गोलमेज संवाद

Posted On: 18 FEB 2025 4:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 18 फेब्रुवारी 2025

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने (एमओएफपीआय) काल दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी साडेअकरा वाजता देशातील राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या निवासी आयुक्तांसोबत एका गोलमेज संवादाचे आयोजन केले. वर्ल्ड फूड इंडिया 2025 या कार्यक्रमासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह सहयोगाच्या संभाव्य क्षेत्रांविषयी चर्चा करणे हा या गोलमेज परिषदेच्या आयोजनाचा उद्देश होता.

एफपीआयचे अतिरिक्त सचिव मिन्हाज आलम यांनी केलेल्या स्वागतपर भाषणात सांगितले की हा कार्यक्रम, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना संधींचे प्रदर्शन करण्यासाठी, जागतिक तसेच देशांतर्गत उद्योगांचे प्रमुख, पुरवठादार, खरेदीदार तसेच तंत्रज्ञान पुरवठादार यांच्याशी चर्चा करण्याची आणि त्यायोगे गुंतवणुकीला चालना देऊन अन्न प्रक्रियाविषयक मूल्य साखळीतील स्वारस्याला योग्य दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरेल.

हा भव्य कार्यक्रम 25 ते 28 सप्टेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला असून मंत्रालयाने यापूर्वी आयोजित केलेल्या अशाच कार्यक्रमापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती एफपीआयच्या सचिवांनी या प्रसंगी केलेल्या बीजभाषणात निवासी आयुक्त आणि उपस्थित प्रतिनिधींना दिली. भारताच्या जागतिक पदचिन्हांमध्ये वाढ करतानाच विविध क्षेत्रांतील गुंतवणूक, नवोन्मेष आणि मूल्यवर्धन सुधारण्याच्या उद्देशाने मंत्रालयातर्फे हाती घेण्यात आलेल्या, उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन अनुदान योजना (पीएलआयएस), पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे औपचारिकीकरण (पीएमएफएमई) योजना तसेच पंतप्रधान किसान संपदा योजना (पीएमकेएसवाय) यांची माहिती देखील त्यांनी ठळकपणे मांडली.

एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी मूल्य साखळीतील सर्व भागधारकांचे एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत हे सांगण्यावर एफपीआयच्या सचिवांनी अधिक भर दिला. या कार्यक्रमाची संपूर्ण क्षमता वापरता येण्यासाठी, सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांनी संपूर्ण ताकदीनिशी या कार्यक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या यशात भर घालण्यासाठी तसेच या कार्यक्रमाला महत्त्वाचा उपक्रम बनवण्यासाठी सक्रियपणे योगदान देण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांचे अभिप्राय आणि सूचना सामायिक कराव्यात असे आवाहन सचिवांनी यावेळी केले.

या कार्यक्रमात सहभागी झालेले निवासी आयुक्त आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश प्रशासनांचे प्रतिनिधी यांनी वर्ल्ड फूड इंडिया 2025साठी नियोजित उपक्रमांना आवश्यक असलेला पाठिबा देण्याची ग्वाही दिली. एकसारखी उत्पादने आणि अन्न प्रक्रिया परिसंस्था, एमएसएमई उद्योगांसाठी सहयोगी पाठबळ यांसह राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी एकत्रित सत्रे आयोजित करण्याच्या सूचना/अभिप्राय उपस्थितांकडून देण्यात आले.

भारतीय अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या ताकदीचे दर्शन घडवण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मंत्रालयासह एकत्र येऊन सक्रियतेने काम करण्याचे आणि या भव्य कार्यकमात अधिकाधिक प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन एफपीआयचे सह सचिव डी.प्रवीण यांनी त्यांच्या समारोपपर भाषणात केले.उद्योग क्षेत्रातील भागधारकांशी संवाद साधण्यासाठी, या कार्यक्रमाची जाहिरात करण्यासाठी आणि व्यवसाय करण्यातील सुलभता सुधारण्याच्या दृष्टीने उद्योगांसमोरील आव्हाने तसेच आवश्यक हस्तक्षेप याबद्दलचे विचार जाणून घेण्यासाठी मंत्रालयाचे अधिकारी विविध राज्यांना भेट देणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.


S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2104372) Visitor Counter : 20