युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडविया आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या महाराष्ट्रात पुणे येथे "जय शिवाजी जय भारत" पदयात्रेचे नेतृत्व करणार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचा गौरव करण्यासाठी सुमारे 20,000 माय भारत स्वयंसेवक या पदयात्रेत होणार सहभागी
अशाच प्रकारच्या पदयात्रा महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये आयोजित केल्या जाणार
Posted On:
18 FEB 2025 4:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2025
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि कामगार आणि रोजगार मंत्री, डॉ. मनसुख मांडविया आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या 19 फेब्रुवारी 2025 रोजी 20,000 माय भारत स्वयंसेवकांसह "जय शिवाजी जय भारत" पदयात्रा काढणार आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर राज्यमंत्री, खासदार आणि आमदार/महापालिका सदस्य देखील पदयात्रेत सामील होतील.
या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने विकसित भारताला कायम प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व, शौर्य, धैर्य आणि चिरस्थायी वारशाचा गौरव केला जाणार आहे.

निसर्गरम्य वातावरणातून 4 किलोमीटर अंतरांची वाटचाल करणाऱ्या या पदयात्रेचा आरंभ पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणातून होणार असून फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत ही पदयात्रा जाणार आहे. युवावर्ग, स्थानिक नेते आणि नागरिकांना एकत्र आणत, प्रथमच, संपूर्ण राज्यात सर्व 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी अशाच प्रकारच्या पदयात्रा काढण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या पदयात्रेपूर्वी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांची मालिका आयोजित करण्यात आली होती.
यात पुढील उपक्रमांचा समावेश होता.
ऐतिहासिक स्थळे आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात स्वच्छता मोहीम.
शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा प्रसार करण्यासाठी योगासनांची सत्रे.
शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आणि नेतृत्वावर आधारित पाहुण्यांची व्याख्यानमाला.
शिवाजी महाराजांच्या वारशाला अधोरेखित करणाऱ्या स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम.
महाराष्ट्रातील जय शिवाजी जय भारत पदयात्रा पूर्व कार्यक्रम

छायाचित्र 1: नाशिक जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी स्वच्छता उपक्रम.

छायाचित्र 2: नांदेड जिल्ह्यातील चैतन्यमय सांस्कृतिक मिरवणुका.

छायाचित्र 3: धाराशिव जिल्ह्यात सणानिमित्त काढलेल्या मिरवणुका.

छायाचित्र 4: पुणे जिल्ह्यात स्वच्छता मोहीम.

छायाचित्र 5: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील नाट्य.

छायाचित्र 6: चंद्रपूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशावर व्याख्यानांचे आयोजन.
संविधानाच्या 75 वर्षपूर्तीच्या सन्मानार्थ आणि भारताची चैतन्यमय सांस्कृतिक विविधता साजरी करण्यासाठी नियोजित 24 पदयात्रांच्या मालिकेतील पुण्यातील जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा, ही सहावी पदयात्रा आहे. देशभरात अशाच प्रकारचे विविध कार्यक्रम वर्षभर आयोजित केले जाणार असून त्या माध्यमातून राष्ट्रभक्तीची भावना मनामनात रुजवणे आणि भारताच्या समृद्ध वारशाशी अनुबंध जोडणे हा त्यामागील उद्देश आहे.
भारतभरातील तरुणांनी माय भारत पोर्टलवर (www.mybharat.gov.in) नोंदणी करून या पदयात्रेत सहभागी व्हावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा तसेच अखंड आणि आत्मनिर्भर भारताबद्दलची त्यांची दूरदृष्टी, यांचा सन्मान करावा, असे आवाहन मंत्रालयाने केले आहे.
S.Patil/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2104368)
Visitor Counter : 136