उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

शेतकऱ्याचा पुत्र नेहमी सत्याची कास धरतो - उपराष्ट्रपती जगदीप धनखड


विकसित भारताचा मार्ग गावांमधूनच जातो - उपराष्ट्रपती जगदीप धनखड

स्टार्टअप्सना आता गावांकडे वळावे लागेल - उपराष्ट्रपती जगदीप धनखड

Posted On: 17 FEB 2025 4:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2025

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राष्ट्रीय कृषी-खाद्योत्पादने आणि जैवउत्पादन संस्थेतील (National Agri-Food and Biomanufacturing Institute - NABI) प्रगत उद्योजकता आणि कौशल्य विकास कार्यक्रम (Advanced Entrepreneurship and Skill Development Programme - A-ESDP) संकुलाचे उद्घाटन केले.

यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. आपण स्वतः शेतकरी पुत्र आहोत, आणि शेतकऱ्याचा पुत्र नेहमी सत्याची कास धरतो असे ते म्हणाले. भारताचा आत्मा हा इथल्या गावांमध्ये वसतो आणि हीच ग्रामीण व्यवस्था देशाचा कणा म्हणून काम करते असे त्यांनी सांगितले. विकसित भारताचा मार्ग इथल्या गावांमधूनच जात असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. शेतीशी आपले गहीरे नाते आहे, आणि आता विकसित भारत हे केवळ स्वप्न राहिले नसून, तेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी आणि दुग्धजन्य उत्पादनांचे मूल्यवर्धन करू शकतील अशा सूक्ष्म उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्याची गरज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यावेळी व्यक्त केली.गावात अथवा खेड्यापाड्यांमध्ये कृषी उत्पादनात मोलाची भर घालू शकतील,  पशुधनापासून मिळणार्‍या उत्पादनांचे तसेच दुग्धजन्य उत्पादनांचे मूल्यवर्धन करू शकतील असे सूक्ष्म उद्योग शेतातच उभारता येथील अशी यंत्रणा आपण विकसित करायला हवी असे मतही त्यांनी व्यक्त केले.यामुळे शाश्वत समाज निर्माण होण्यास मदत होईल तसेच अन्नात्तील पौष्टिक मूल्यही निश्चितच वाढेल असे ते म्हणाले. खेड्यापाड्यात आईस्क्रीम, पनीर, मिठाई आणि तत्सम पदार्थांचे उत्पादन घेण्यासाठीचे उद्योजक कौशल्य आत्मसात करण्यापासून आपल्याला कोणी रोखले आहे,असा सवालही त्यांनी उपस्थित केला.आपण बोलत असलेल्या गोष्टींमुळे रोजगार निर्मिती होऊ शकेल तसेच ग्रामीण युवा वर्गाच्या गरजा पूर्ण होऊ शकतील, त्यामुळेच या गोष्टी महत्त्वाच्या असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

कृषी क्षेत्राची कार्यक्षमता आणि उत्पादकता सुधारण्यासाठी शेतीच्या पद्धतींमध्ये तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला पाहिजे यावरही त्यांनी भर दिला. आता टियर -2 आणि टियर -3 शहरांमध्येही आज स्टार्टअप्स स्थापन झाले आहेत. शेतीमाल ही अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी आहे, उद्योगासाठी कच्चा मालाचा स्रोत आहे, त्यामुळेच आता या स्टार्टअप्सना गावांकडे वळावे लागेल ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. आणि जेव्हा प्रत्यक्षात असे घडेल त्यावेळी, ग्रामीण भागातील शेतजमिनींजवळ, उद्योग व्यवसाय समूह विकसित होतील, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि लोकांचा शेतजमिनीवरचा विश्वासही दृढ होईल असे त्यांनी सांगितले.

S.Kakade/T.Pawar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2104093) Visitor Counter : 36