शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, योगी आदित्यनाथ आणि डॉ. एल. मुरुगन यांनी केटीएस 3.0 चे केले उद्घाटन 

Posted On: 15 FEB 2025 7:24PM by PIB Mumbai

 

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आणि संसदीय कार्य मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे काशी तमिळ संगममच्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेशाद्वारे या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले  की, प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभच्या दरम्यान हा कार्यक्रम होणे अधिक महत्वपूर्ण  ठरते. त्यांनी काशी आणि तामिळनाडूमधील हजारो वर्षांपासून टिकून असलेल्या नात्याला अधोरेखित करताना, गंगा आणि कावेरी यांच्यातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक नातेसबंधांचाही विशेष उल्लेख केला.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेप्रति कृतज्ञता व्यक्त केली आणि सांगितले की, काशी-तमिळ संगमम उत्तर आणि दक्षिण भारताच्या समृद्ध परंपरांना जोडणारा सेतू आहे. त्यांनी हेही नमूद केले की, भारताच्या सांस्कृतिक विविधतेतील एकात्मतेचे प्रतीक म्हणून हा उपक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. 

यंदाच्या संगमाची संकल्पना ऋषी अगस्त्य यांच्याभोवती केंद्रित असून, ते काशी आणि तामिळनाडूमधील सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि बौद्धिक परंपरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहेत. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केटीएस 3.0 वाराणसीत आयोजित केल्याबद्दल आभार मानले आणि या संगमासाठी वाराणसीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व प्रतिनिधींचे हार्दिक स्वागत केले.  महाकुंभच्या पार्श्वभूमीवर संगमाचे आयोजन होणे ही एक ऐतिहासिक संधी आहे. आतापर्यंत 51 कोटी भाविक महाकुंभात सहभागी झाले असून, तामिळनाडूचे प्रतिनिधीही आता या भव्य सोहळ्याचा भाग बनणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.  उत्तर आणि दक्षिण भारत, तसेच संस्कृत आणि तमिळ यांच्यातील सांस्कृतिक संगमात ऋषी अगस्त्य यांची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. 

डॉ. एल. मुरुगन यांनी आपल्या भाषणात काशी तमिळ संगमम  मागील दोन वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "एक भारत श्रेष्ठ भारत" या संकल्पनेच्या आधारावर आयोजित केला जात असल्याचे नमूद केले. त्यांनी सांगितले की, जसे तमिळ लोकांना काशीला भेट देण्याची इच्छा असते, तसेच काशीतील लोकांनाही रामेश्वरम् येथे जाण्याची तीव्र इच्छा असते. हे सांस्कृतिक नाते केवळ आधुनिक काळातले नसून, ते प्राचीन काळापासून असेच दृढ राहिले आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. 

कार्यक्रमादरम्यान प्रतिनिधी महाकुंभ आणि अयोध्या धामलाही भेट देतील. या उपक्रमामुळे त्यांना एक दिव्य आणि अविस्मरणीय अनुभव मिळेल, तसेच तामिळनाडू आणि काशी यांच्यातील ऐतिहासिक बंध अधिक दृढ होतील. 

***

S.Kane/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2103690) Visitor Counter : 42