युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडवीय, कुस्तीपटू शिवानी पवार, वेलनेस इन्फ्लुएन्सर्स तसेच फिटनेस ग्रुप्सचे सदस्य मुंबई आणि दिल्ली येथे आयोजित फिट इंडिया संडेज ऑन सायकल अभियानांमध्ये होणार सहभागी

Posted On: 15 FEB 2025 7:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली /मुंबई 15 फेब्रुवारी 2025

सायकलस्वारांच्या वेगवेगळ्या गटांसह केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडवीय मुंबईत उद्या (16 फेब्रुवारी,2025 रोजी) होत असलेल्या ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ उपक्रमात भाग घेणार आहेत. ‘लठ्ठपणाविरोधात लढा’ या संकल्पनेला अनुसरत उद्या सकाळी 7 वाजता गेट वे ऑफ इंडिया येथून सुरु होणारा हा मुंबईतील सायकलिंग उपक्रम गिरगाव चौपाटी येथे संपन्न होईल.

याप्रसंगी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मांडवीय यांच्यासह लाईफ कोच आणि फिट इंडियाचे सदिच्छा दूत डॉ.मिकी मेहता, भारतीय फॅशन डिझायनर आणि समाजसेवक शायना नाना चुडासामा, बीवायसीएस इंडिया फाउंडेशनच्या संचालक आणि सीईओ डॉ.भैरवी नाईक जोशी, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलाचे अतिरिक्त महासंचालक कृष्ण प्रकाश, महाराष्ट्राचे उप-लोकायुक्त संजय भाटीया हे मान्यवर आणि महाराष्ट्र योग संघटना आणि हार्टफुलनेस संस्थेचे लाईफस्टाईल वेलनेस प्रशिक्षक देखील उपस्थित असतील.

याच वेळी संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी देखील अशाच प्रकारचा सायकलिंग उपक्रम राबवण्यात येणार आहे.नवी दिल्ली येथे उद्या सकाळी 8 वाजता सुरु होणाऱ्या या कार्यक्रमात 2024 च्या वरिष्ठ आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेती आणि 2025 च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतील सुवर्णपदक विजेती शिवानी पवार सहभागी होणार आहे.

डेकॅथलॉन, कल्ट फिट, भारतीय क्रीडा प्राधिकरण, राष्ट्रीय क्रीडा विज्ञान आणि संशोधन केंद्र (एनसीएसएसआर) या संस्थांचे प्रतिनिधी तसेच योगासन भारत या संस्थेचे स्वास्थ्य प्रशिक्षक देखील नवी दिल्ली येथील सायकलिंग उपक्रमात सहभागी होणार आहेत. या रविवारी दिल्ली येथील सायकल फेरी मेजर ध्यानचंद स्टेडियम इथून सुरु होईल आणि तेथेच संपन्न होईल.

संपूर्ण भारतभरात रविवारच्या दिवशी हे सायकलिंग अभियान राबवण्यात येते.  देशभरातील एसएआयची प्रादेशिक केंद्रे, राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे (एनसीओईएस) आणि खेलो इंडिया केंद्रे (केआयसीएस) अशा विविध ठिकाणी एकाच वेळी हा कार्यक्रम होणार आहे.

***

S.Kane/S.Chitnis/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2103679) Visitor Counter : 33