गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठकांचे आयोजन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार ‘दहशतवाद मुक्त जम्मू-काश्मीर’साठी कटिबद्ध आहे

Posted On: 11 FEB 2025 9:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025


केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री  अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठका आज पार पडल्या. 4 आणि 5 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकींच्या अनुषंगाने या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार ‘दहशतवाद -मुक्त जम्मू-काश्मीर’साठी कटिबद्ध आहे. दहशतवादमुक्त जम्मू-काश्मीरचे लक्ष्य साध्य करण्यासाठी  निमलष्करी दलाच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला. गृहमंत्र्यांनी सीमा सुरक्षा दलाला कडक दक्षतेचा अवलंब करून, सीमा ग्रिड मजबूत करणे आणि पाळत ठेवण्यासाठी तसेच सीमेच्या सुरक्षेसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून आंतरराष्ट्रीय सीमेवरून शून्य घुसखोरी सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.

अमित शाह यांनी सीआरपीएफला भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत समन्वय कायम राखण्याचे  निर्देश दिले. त्यांनी सीआरपीएफच्या हिवाळी कृती आराखड्याचा आढावा घेतला आणि क्षेत्रात वर्चस्व राखण्यात कोणतीही कसर राहणार नाही याची काळजी घेण्याचे  निर्देश दिले.शाह यांनी जम्मू प्रदेशावर लक्ष केंद्रित करून उंचावरील क्षेत्रात दबदबा कायम राखण्याचे निर्देश दिले.

गृहमंत्र्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत गुप्तचर यंत्रणेचाही आढावा घेतला आणि विश्वासार्ह गोपनीय माहिती मिळवण्यासाठी व्याप्ती आणि प्रवेश वाढविण्याचे निर्देश दिले. गोपनीय माहिती मिळवण्यात  तंत्रज्ञानाच्या महत्त्वाचा त्यांनी पुनरुच्चार केला. शाह पुढे म्हणाले की, दहशतवादाला होणाऱ्या वित्तपुरवठ्यावर देखरेख , नार्को-दहशतवाद प्रकरणांवर पकड घट्ट करणे आणि जम्मू आणि काश्मीरमधील संपूर्ण दहशतवादी परिसंस्था उध्वस्त करण्याला  मोदी सरकारचे प्राधान्य आहे. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये 'शून्य दहशतवाद  योजनेसाठी ठोस पावले उचलली जात आहेत.

देशद्रोही घटकांकडून केल्या जात असलेल्या नकारात्मक प्रचाराचा सामना करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देशही गृहमंत्र्यांनी दिले जेणेकरून लोकांसमोर योग्य चित्र  मांडता येईल. सर्व संस्थांमध्ये  समन्वय कायम राखण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करून अधिकाधिक गोपनीय माहिती  मिळवण्याबाबत  मार्गदर्शन केले.

अमित शाह यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे  आणि जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी समन्वयाने  काम सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. या प्रयत्नात सर्व संसाधने उपलब्ध करून दिली जातील असे आश्वासन त्यांनी दिले.


N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2102042) Visitor Counter : 39