पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस येथे एआय-कृती शिखर परिषदेत केलेले उद्घाटनपर भाषण

Posted On: 11 FEB 2025 6:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025


मान्यवर,

मित्रहो,

एका साध्यासोप्या प्रयोगाने मी सुरुवात करतो.

जर तुम्ही तुमचा मेडिकल रिपोर्ट एआय ऍपवर अपलोड केला तर तो तुम्हाला साध्या भाषेत कोणत्याही अडचणीविना तुमच्या आरोग्याची माहिती समजावून सांगू शकतो. पण याच ऍपला जर तुम्ही एका अशा व्यक्तीचे चित्र काढायला सांगितले जी व्यक्ती तिच्या डाव्या हाताने लिहीत आहे तर बहुधा हे ऍप उजव्या हाताने लिहीणाऱ्या माणसाचे चित्र काढेल.याचे कारण म्हणजे ते पूर्णपणे याच ट्रेनिंग डेटावर आधारित आहे.

यातून असे दिसते की एआयची सकारात्मक क्षमता आश्चर्यकारक असली तरी अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये काहीसा विरोधाभास आहे ज्याचा आपण काळजीपूर्व विचार केला पाहिजे. म्हणूनच ही शिखर परिषद आयोजित केल्याबद्दल आणि तिचे सहअध्यक्ष भूषवण्यासाठी मला निमंत्रित केल्याबद्दल माझे मित्र मॅक्राँ यांचा मी अतिशय ऋणी आहे.

मित्रांनो,

कृत्रिम बुद्धिमत्तेने आधीपासूनच आपले राजकीय क्षेत्र, अर्थव्यवस्था, आपली सुरक्षा व्यवस्था आणि अगदी आपल्या समाजाला नवा आकार देण्यास सुरूवात केली आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता या शतकातील मानवतेचा कोड अर्थात परवलीचा संकेतांक लिहू लागली आहे. पण मानवतेच्या इतिहासात तंत्रज्ञानाने जे टप्पे गाठले त्यापेक्षा हे सर्वस्वी वेगळे आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता अभूतपूर्व प्रमाण आणि गतीने विकसित होत आहे आणि तिचा अंगिकार आणि वापर तर त्यापेक्षा जास्त वेगाने होत आहे. त्या प्रकारेच तिचे सीमेपलीकडे अतिशय जास्त परस्पर अवलंबित्व आहे. त्यामुळेच या तंत्रज्ञाना संदर्भात आपली सामाईक मूल्ये टिकवण्यासाठी शासन आणि मानके प्रस्थापित करण्यासाठी तसेच जोखमींचे निरसन करण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी एकत्रिक जागतिक प्रयत्नांची गरज आहे.

मात्र, जोखीम व्यवस्थापन आणि प्रतिस्पर्धा व्यवस्थापनापुरते शासन मर्यादित नाही.  त्यामुळे आपल्याला अतिशय सखोल विचार करण्याची आणि नवोन्मेष आणि शासनाबाबत खुलेपणाने चर्चा करण्याची गरज आहे.

तंत्रज्ञान हाताळणीचे शासन हे सर्वांना उपलब्धतेविषयी विशेषतः ग्लोबल साऊथच्या उपलब्धतेविषयी देखील असले पाहिजे. या अनुषंगानेच या क्षमतांमध्ये कमतरता आहेत मग त्या ऊर्जा संगणन, गुणवत्ता, डेटा किंवा आर्थिक संसाधनांची  असो.

मित्रांनो,

कृत्रिम बुद्धिमत्ता आरोग्य, शिक्षण, कृषी आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा करून लक्षावधींच्या आयुष्यात परिवर्तन घडवू शकते. शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांकडे वाटचाल सुलभ आणि गतिमान होईल, असे जग निर्माण करण्याला देखील त्याची मदत होईल. हे सर्व करण्यासाठी संसाधने  आणि प्रतिभा यांचे आपण एकीकरण केले पाहिजे. आपण विश्वास आणि पारदर्शकता वाढवणाऱ्या ओपन सोर्स प्रणाली विकसित केल्या आहेत.कोणत्याही भेदभावापासून मुक्त असे दर्जेदार डेटा संच आपण तयार केले पाहिजेत.आपण तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केले पाहिजे आणि लोकाभिमुख ऍप्लिकेशन्स तयार केली पाहिजेत. आपण सायबर सुरक्षा, चुकीची माहिती आणि डीप फेक्स यासंदर्भातील समस्यांची सोडवणूक केली पाहिजे. आणि आपण हे देखील सुनिश्चित केले पाहिजे की तंत्रज्ञान प्रभावी आणि उपयुक्त बनण्यासाठी ते स्थानिक परिसंस्थेमध्ये रुजलेले असले पाहिजे

मित्रांनो,

कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वात मोठा भीतीदायक प्रभाव म्हणजे रोजगारांच्या संख्येतील कपात हा आहे.मात्र,इतिहासात हे दिसले आहे की तंत्रज्ञानामुळे काम कमी होत नाही. त्यांचे स्वरुप बदलते आणि नव्या प्रकारचे रोजगार निर्माण होतात.आपल्याला एका एआय-आधारित भविष्यासाठी स्किलिंग आणि रि-स्किलिंगमध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे.

मित्रांनो,

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उच्च ऊर्जा तीव्रतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे यात शंका नाही.  येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्याला चालना देण्यासाठी हरित ऊर्जेची आवश्यकता असेल.

भारत आणि फ्रान्सने सूर्याच्या शक्तीचा उपयोग करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसारख्या उपक्रमांद्वारे वर्षानुवर्षे एकत्र काम केले आहे. आम्ही आमची कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील भागीदारी जसजशी पुढे नेत आहोत, तसतसे एक स्मार्ट आणि जबाबदार भविष्य घडवण्यासाठी शाश्वततेपासून नवोन्मेषाकडे एक नैसर्गिक प्रगती घडत आहे.

त्याच वेळी, शाश्वत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे केवळ स्वच्छ ऊर्जा वापरणे असे नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारुप आकारमान, डेटा गरजा आणि संसाधन आवश्यकतांमध्ये कार्यक्षम आणि टिकाऊ असणे आवश्यक आहे.  शेवटी, कविता तयार करण्यासाठी किंवा अंतराळ यानाचे आरेखन करण्यासाठी मानवी मेंदू बहुतेक एका बल्बच्या ज्वलनासाठी लागणाऱ्या शक्तीपेक्षा कमी शक्ती वापरून ही कामे पूर्ण करु शकतो.

मित्रांनो,

भारताने 1.4 अब्ज लोकांसाठी अत्यंत कमी खर्चात यशस्वीरित्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. या पायाभूत सुविधा खुल्या आणि सुलभ  नेटवर्कभोवती तयार केलेल्या आहेत. आमच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी, प्रशासनामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि आमच्या लोकांच्या जीवनात परिवर्तन करण्याच्या उद्देशाने या पायाभूत सुविधांसाठी नियम आणि विस्तृत अनुप्रयोग ठरवण्यात आले आहेत.

आम्ही आमच्या डेटा सक्षमीकरण आणि संरक्षण संरचनेद्वारे डेटाची शक्ती खुली केली आहे  आणि, आम्ही डिजिटल कॉमर्स लोकशाहीवादी   आणि सर्वांसाठी सुलभ केले आहे.ही दृष्टी भारताच्या राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता मिशनचा पाया आहे.

म्हणूनच,आमच्या जी 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता जबाबदारीने, चांगल्या हेतूसाठी आणि सर्वांसाठी वापरण्यावर एकमत बनवले.आज, भारत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करण्यात तसेच डेटा गोपनीयते संदर्भात तांत्रिक-कायदेशीर पर्याय शोधण्यात आघाडीवर आहे.

आम्ही लोकहितासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ऍप्लिकेशन्स विकसित करत आहोत. आमच्याकडे जगातील सर्वात मोठ्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रज्ञावंत समुहांपैकी बहुसंख्य प्रज्ञावंत आमच्याकडे आहेत.आपल्या विविधतेचा विचार करून भारत स्वतःचे मोठे भाषा मॉडेल तयार करत आहे.  संगणकीय शक्ती सारख्या संसाधनांचे एकत्रीकरण करण्यासाठी आमच्याकडे सार्वजनिक-खाजगी भागीदारी प्रारुप देखील आहे. आमच्या स्टार्ट-अप्सना आणि संशोधकांना परवडणाऱ्या किमतीत हे प्रारुप उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्य सर्वांसाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी आहे हे  सुनिश्चित करण्यासाठी भारत आपला अनुभव आणि कौशल्य सामायिक करण्यास देखील तयार आहे.

मित्रांनो,

आपण मानवतेच्या मार्गाला आकार देणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता युगाचा उष:काल पाहत आहोत. काही लोकांना यंत्रे  बुद्धिमत्तेत मानवांपेक्षा श्रेष्ठ बनतील अशी चिंता आहे. परंतु, आपल्या सामूहिक भविष्याची आणि सामायिक नशिबाची गुरुकिल्ली मानवाशिवाय इतर कोणाकडेही नाही.

हीच जबाबदारीची भावना आपल्याला मार्गदर्शन करेल.

धन्यवाद.


N.Chitale/S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2101934) Visitor Counter : 16