युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
लठ्ठपणाशी लढण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली 250 हुन अधिक सायकलस्वार एकत्र आले
Posted On:
02 FEB 2025 3:17PM by PIB Mumbai
देशातील नागरिकांना लठ्ठपणाच्या समस्येविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी नवी दिल्लीत आज सायकल रॅलीचे नेतृत्व केले. मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये या आठवड्यातील फिट इंडिया संडे या उपक्रमाअंतर्गत ही सायकल रॅली आयोजित केली गेली होती. यात असंख्य डॉक्टर आणि पोषणाआहार तज्ञांनी सहभाग नोंदवला.
पॅरिस पॅरालिम्पिक पदक विजेती खेळाडू रुबीना फ्रान्सिस तसेच दिल्ली इथले भारती महाविद्यालय आणि सोनिया विहार वॉटर स्पोर्ट्स क्लबचे अनेक युवा प्रतिनिधी या सायकल रॅलीत सहभागी झाले होते.
लठ्ठपणा ही युवा वर्गातली मोठी समस्या आणि मोठे आव्हान आहे. जगभरातील आठपैकी एक व्यक्ती लठ्ठ असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे आजच्या काळात आरोग्याच्या दृष्टीने व्यायाम आणि खेळ खूप महत्वाच्या बाबी ठरल्या आहेत. हीच गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेहराडून इथल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनाच्या वेळीही ठळकपणे अधोरेखीत केली होती. आपण आपल्या सेवनातील तेलाचा वापर कमी केला पाहिजे आणि आपल्या आहाराबद्दल खूप जागरूक राहिले पाहिजे . या लठ्ठपणाविरोधातल्या लढ्यामध्ये नियमीतपणे सायकल चालवणे फायदेशीर ठरणार असल्याचे डॉ. मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे. फिट इंडियाच्या माध्यमातून आपण ही लढाई जिंकू शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
मधुमेह आणि स्थूलत्व तज्ज्ञ डॉ. त्रिभुवन गुलाटी, जे सायकलस्वारांच्या गटाचा एक भाग होते, त्यांनी स्थूलत्वामुळे आरोग्यासंदर्भात उद्भवणाऱ्या विविध धोक्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले, "स्थूलत्वामुळे 130 विविध आजार उद्भवू शकतात. यात हाडांचा संधिवात, मूत्रपिंडाचे आजार, यकृताचे आजार, चरबीयुक्त यकृत, मधुमेह, महिलांमध्ये `पीसीओडी`, तसेच पुरुष आणि महिलांमध्ये लैंगिक समस्या इत्यादी."
वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉ. पीयूष जैन यांनी स्थूलत्वाविरोधात लढा देण्यासाठी सायकल चालवणे हा सकारात्मक उपाय असल्याचे नमूद केले. त्यांनी सांगितले, "आजकाल मुलांमध्ये मोबाईल फोनच्या वापरामुळे आणि मैदानी खेळांच्या कमतरतेमुळे निष्क्रियता वाढली आहे. सायकल चालवण्याच्या मोहिमेच्या माध्यमातून या संदर्भात जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या 20% भारतीय मधुमेही आहेत आणि 2030 पर्यंत हा आकडा 35% होईल. आपण निरोगी आहार आणि व्यायामापासून दूर जात आहोत. एकदा का सायकल चालवणे किंवा कोणताही व्यायाम सुरू केला की, शरीराचा चयापचय दर वाढतो."
डॉ. मांडविया यांनी गेल्या वर्षी 17 डिसेंबर रोजी याच ठिकाणी ही अनोखी सायकल चालवण्याची मोहिम सुरू केली आणि त्यानंतर दर आठवड्याला संपूर्ण भारतभर अनेक सायकल चालवण्याच्या मोहिमा राबविल्या जात आहेत. हा उपक्रम संपूर्ण देशातील 3500 हून अधिक ठिकाणी पार पडला असून, 3 लाखांहून अधिक सायकलस्वारांनी यात सहभाग घेतला आहे. या स्पर्धा एकाच वेळी साई प्रादेशिक केंद्रे, नॅशनल सेंटर्स ऑफ एक्सलन्स (एनसीओइएस) आणि खेलो इंडिया केंद्रे (केआयसीएस) येथेही आयोजित केल्या जात आहेत.
***
S.Kane/T.Pawar/N.Gaikwad/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2098942)
Visitor Counter : 36