श्रम आणि रोजगार मंत्रालय
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे कामगार मंत्री आणि सचिवांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा आज झाला समारोप
अस्थायी, मुक्त कामगार आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स यांच्यासह इमारत आणि बांधकाम कामगारांचे कल्याण याला सरकारची सर्वोच्च प्राथमिकता : डॉ. मांडविया यांचे प्रतिपादन
सर्वसमावेशक सामाजिक सुरक्षा शाश्वत प्रारुप विकसित करण्यासाठी तीन समित्यांची स्थापना
Posted On:
30 JAN 2025 5:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2025
केंद्रीय श्रम आणि रोजगार तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे कामगार मंत्री आणि सचिवांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप झाला. यावेळी श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यादेखील उपस्थित होत्या.
या बैठकीत सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत गेल्या वर्षभरात आयोजित सहा प्रादेशिक स्तरावरील कार्यशाळा आणि इतर अनेक चर्चासत्रांचाही यशस्वीपणे समारोप झाला. दोन दिवस चाललेल्या परिषदेतील पाच सत्रांमधून दहापेक्षा जास्त विषयांवर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली आणि लक्ष्यित कृती आराखडा आखण्याच्या उद्देशाने माहिती गोळा करण्यात आली. यावेळी प्रत्येकी पाच राज्यांचा समावेश असलेल्या तीन समित्या स्थापन करण्यात आल्या. कार्यशाळेदरम्यान झालेल्या चर्चेच्या आधारे,या समित्या सल्लामसलत करून कामगारांसाठी सर्वसमावेशक सामाजिक सुरक्षेसाठी एक शाश्वत प्रारुप विकसित करतील, जे मार्च 2025 मध्ये सादर केले जाईल.
दोन दिवसीय परिषदेतील चर्चा आणि सूचनांचा आढावा घेत, केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या भाषणात सर्व भागधारकांसाठी व्यापक कृती आराखडा सादर केला. त्यांनी राज्यांना मागील दोन दिवसांत विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सादर केलेल्या उत्कृष्ट पद्धतींचा अभ्यास करून त्यांची अंमलबजावणी करण्याच्या शक्यतांचा आढावा घेण्याचे आवाहन केले. मंत्रालय संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांचे कल्याण करण्यासाठी राज्य सरकारांसोबत सहकार्य करत राहील आणि विविध सुधारणा तसेच उपक्रम राबवण्यासाठी कायम प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. निवृत्तीवेतन, आरोग्यसेवा, जीवनविमा आणि अपघात विमा पुरवणाऱ्या समग्र कल्याणकारी कार्यक्रमांबाबत यावेळी चर्चा झाली.
या परिषदेत विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सामाजिक सुरक्षेवर सखोल चर्चा करण्यात आली. यात इमारत बांधकाम क्षेत्रातील कामगार, गिग म्हणजे मुक्त,अस्थायी कामगार आणि प्लॅटफॉर्म अर्थव्यवस्थेतील कर्मचारी म्हणजे संस्थेसाठी प्रमाणित रोजगार कराराशिवाय ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरून काम करणारे कामगार तसेच इतर असंघटित क्षेत्रांतील मजुरांचा समावेश होता. केंद्रीय मंत्र्यांनी या कामगारांसाठी शाश्वत आणि प्रभावी सामाजिक सुरक्षा प्रतिमान विकसित करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी, केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी देशाच्या प्रगतीसाठी आणि "विकसित भारत 2047" या ध्येयाच्या पूर्ततेसाठी देशाच्या कष्टाळू आणि कार्यक्षम कामगारवर्गाने दिलेल्या योगदानाचा गौरव केला.
* * *
S.Kakade/Sampada/Gajendra/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2097658)
Visitor Counter : 18