वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत आणि ओमान संयुक्त आयोगाच्या बैठकीचे आयोजन, व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, अन्न सुरक्षा आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्यावर नेत्यांनी दिला भर
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या ओमान दौऱ्याची यशस्वी सांगता
Posted On:
28 JAN 2025 8:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या 27-28 जानेवारी 2025 दरम्यानच्या ओमान भेटीची यशस्वी सांगता झाली. या भेटीदरम्यान गोयल यांनी ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री महामहीम कैस बिन मोहम्मद अल् युसूफ यांच्यासोबत भारत-ओमान संयुक्त आयोगाच्या बैठकीच्या 11 व्या सत्राचे सहअध्यक्षपद भूषवले. या बैठकीत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, अन्न सुरक्षा आणि नवीकरणीय ऊर्जा आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी फलदायी चर्चा झाली. केंद्रीय मंत्र्यांनी ओमानचे मंत्री कैस याच्यासोबत झालेल्या फलदायी बैठकीत भारत आणि ओमान यांच्यातील द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक संबंधांचा सविस्तर आढावा घेतला आणि परस्परांना फायदेशीर असलेल्या व्यापारी संबंधांना अधिक बळकट करणाऱ्या भक्कम उपाययोजना विचारात घेतल्या.
दोन्ही मंत्र्यांनी भारत-ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार(CEPA) याबाबत विचारविनिमय केला ज्याच्या संदर्भात वाटाघाटी प्रगतीपथावर आहेत. दोन्ही मंत्र्यांनी हा करार लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी वाटाघाटींचा वेग वाढवण्याबाबत सहमती व्यक्त केली. हा करार दोन्ही देशांदरम्यानच्या द्विपक्षीय व्यापारी संबंधांमधील एक मैलाचा दगड ठरणार असून दोन्ही बाजूंनी होणाऱ्या व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्याची क्षमता त्यात आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी भारत-ओमान दुहेरी करआकारणी टाळण्याच्या करारामध्ये सुधारणा करण्याच्या प्रोटोकॉलवर स्वाक्षऱ्या केल्या. सीमेपलीकडील कर आकारणीला आंतरराष्ट्रीय मानकांच्या स्तरावर आणणे, कर प्रक्रिया सोपी करणे आणि करविषयक प्रकरणांमध्ये दोन्ही देशांमध्ये अधिक चांगले सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी या सुधारणा करण्यात येणार आहेत.
गोयल यांनी ओमानचे आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहकार्य व्यवहार विषयक उपपंतप्रधान आणि महामहिमांचे विशेष प्रतिनिधी महामहीम सय्यद असद बिन तारिक अल सईद यांची 28 जानेवारी 2025 रोजी भेट घेतली. असद यांनी सप्टेंबर 2023 मध्ये जी-20 शिखर परिषदेसाठी भारत दौऱ्यावर आलेल्या ओमानी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते.
गोयल यांनी ओमानचे वित्तमंत्री महामहीम सुलतान बिन सालेम अल हब्सी आणि विशेष आर्थिक क्षेत्रासाठी सार्वजनिक प्राधिकरणाचे अध्यक्ष अली बिन मसूद अल सुनैदी यांची देखील आर्थिक संबंध बळकट करण्यासाठी भेट घेतली.
भारत-ओमान संयुक्त व्यापार परिषदेच्या बैठकीतही गोयल सहभागी झाले. ओमान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने(OCCI) या बैठकीचे फिक्कीच्या शिष्टमंडळाच्या सहकार्याने आयोजन केले होते.
ओमानच्या व्यापारी नेत्यांची आणि सीईओंच्या एका विशिष्ट गटाची देखील गोयल यांनी भारतीय दुतावासातील भारतीय राजदुतांनी आयोजित केलेल्या गोलमेज परिषदेत भेट घेतली. गोयल यांच्या या यशस्वी दौऱ्यामुळे भारत-ओमान संबंधांचा पाया भक्कम झाला असून व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2097164)
Visitor Counter : 30