पंचायती राज मंत्रालय
नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या परेडला विशेष अतिथी म्हणून 600 हून अधिक पंचायत नेते राहणार उपस्थित
प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाच्यापूर्वी पंचायत नेत्यांचा होणार सत्कार; ‘ग्रामोदय संकल्प’ मासिकाचे होणार प्रकाशन
Posted On:
24 JAN 2025 4:02PM by PIB Mumbai
पंचायत राज मंत्रालयाने येत्या 26 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे साक्षीदार होण्यासाठी सहाशेहून अधिक पंचायत नेत्यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे. या विशेष पाहुण्यांची निवड त्यांच्या संबंधित पंचायतींमध्ये प्रमुख योजनांच्या अंतर्गत लाभार्थ्यांसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे करण्यात आली आहे. या योजनांमध्ये हर घर जल योजना, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), मिशन इंद्रधनुष, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्मान भारत), प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री पोषण योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आणि किसान क्रेडिट कार्ड या योजनांचा समावेश आहे. निमंत्रितांमध्ये संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करणारे विविध प्रदेश, सामाजिक-आर्थिक गट आणि आकांक्षी जिल्ह्यांतील, आरोग्य, शिक्षण, महिला आणि बालविकास, पाणी आणि स्वच्छता, आणि हवामान कृती यासारख्या महत्त्वाच्या विकासात्मक क्षेत्रात उत्कृष्ट कार्यकर्तृत्व गाजविणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील तसेच राज्य स्तरावरील पुरस्कार प्राप्त पंचायत नेत्यांचा समावेश आहे.ही सुसंधी म्हणजे त्यांच्या कर्मक्षेत्र ते कर्तव्य पथ या त्यांच्या प्रवासाचे प्रतीक असून प्रजासत्ताक दिनी, हे विशेष निमंत्रित त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह प्रजासत्ताक दिन परेडच्या भव्य सोहळ्याचे साक्षीदार होतील.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित विशेष सत्कार कार्यक्रम
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 25 जानेवारी 2025 रोजी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ऑफिसर्स इन्स्टिट्यूट,नवी दिल्ली येथे,या पंचायत नेत्यांचा सन्मान करण्यासाठी विशेष सत्कार कार्यक्रम आयोजित केला जाईल.या कार्यक्रमात 'ग्रामोदय संकल्प' मासिकाच्या पंधराव्या अंकाचे प्रकाशन होणार आहे तसेच पंचायत नेत्यांचा सत्कार आणि संविधान दिन-2024 यानिमित्ताने पंचायत राज मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘आपले संविधान जाणून घ्या’ या प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्रे आणि पारितोषिक प्रदान करणे या कार्यक्रमांचा समावेश असेल.केंद्रीय, पंचायती राज मंत्रालय आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री, श्री राजीव रंजन सिंग उर्फ ललन सिंह, पंचायत राज राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल, पंचायत राज सचिव विवेक भारद्वाज, आणि इतर वरिष्ठ अधिकारी या समारंभाला उपस्थित असतील.
***
N.Chitale/S.Patgoankar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2095875)
Visitor Counter : 41