पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराक्रम दिनानिमित्त साधला विद्यार्थ्यांशी संवाद

Posted On: 23 JAN 2025 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जानेवारी 2025

 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या पराक्रम दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात युवा मित्रांशी विशेष संवाद साधला. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना विचारले की 2047 पर्यंत काय साध्य करणे हे राष्ट्राचे ध्येय आहे, या पंतप्रधानांनी विचारलेल्या प्रश्नाला एका विद्यार्थ्याने अत्यंत आत्मविश्वासाने “भारताला विकसित राष्ट्र (विकसित भारत) बनवणे” हे उत्तर दिले. पंतप्रधानांनी ‘2047 पर्यंतच का”?  असे विचारले असता, "तोपर्यंत, भारत जेव्हा आपल्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल तेव्हा आपली सध्याची पिढी देशसेवेसाठी तयार असेल" असे उत्तर दुसऱ्या विद्यार्थ्याने दिले.

त्यानंतर, पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना आजच्या दिवसाचे महत्त्व विचारले. त्यावर विद्यार्थ्यांनी उत्तर दिले की आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असून त्याचा जन्म ओदिशातील कटक येथे झाला होता. कटकमध्ये नेताजी बोस यांच्या जयंतीनिमित्त एक भव्य कार्यक्रम आयोजित केला जात असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. त्यानंतर,  त्यांनी दुसऱ्या विद्यार्थिनीला विचारले की नेताजींचे कोणते वाक्य तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा देते? उत्तरादाखल तिने "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा (तुम्ही मला रक्त द्या आणि मी तुम्हाला स्वातंत्र्य देण्याचे वचन देतो)" या नेताजींच्या घोषणेचा उल्लेख केला. नेताजी बोस यांनी देशाला इतर सर्वांपेक्षा प्राधान्य देऊन खरे नेतृत्व केले आणि त्यांचे हेच समर्पण आपल्याला खूप प्रेरणा देत आहे, हे त्या विद्यार्थिनीने सांगितले. या प्रेरणेतून तुम्ही कोणती कृती करत आहात, असा प्रश्न पंतप्रधानांनी विचारला. त्यांच्या उत्तरात  विद्यार्थिनीने सांगितले की ती राष्ट्राचे कार्बन फूटप्रिंट कमी करण्यास प्रेरित आहे, जो शाश्वत विकास उद्दिष्टांचा (SDGs) देखील एक भाग आहे. त्यानंतर, पंतप्रधानांनी या विद्यार्थिनीला कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी भारतात कोणते उपक्रम हाती घेतले आहेत? याबद्दल विचारले, त्यावर तिने उत्तर दिले की इलेक्ट्रिक वाहने आणि बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने दिल्लीत 1200  हून अधिक इलेक्ट्रिक बसेस कार्यरत आहेत आणि निकट भविष्यात त्यांची संख्या वाढेल, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना हवामान बदलाचा सामना करण्याचे एक साधन म्हणून, पंतप्रधान सूर्यघर योजनेबाबत माहिती दिली. या योजनेचा एक भाग म्हणून, घराच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती होईल आणि वीज बिल भरण्याची गरज पडणार नाही, असे त्यांनी सांगितले. या सौर पॅनेलपासून निर्माण होणारी वीज ई-वाहने चार्ज करण्यासाठी वापरली जाऊ शकते,यामुळे जीवाश्म इंधनावरील खर्च कमी होईल आणि प्रदूषणही कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वैयक्तिक वापरानंतर घरात निर्माण होणारी कोणतीही अतिरिक्त वीज सरकारला विकता येते, सरकार तुमच्याकडून ती वीज खरेदी करेल आणि त्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील, असेही त्यांनी सांगितले. याचा अर्थ हा की तुम्ही घरी वीज निर्माण करू शकता आणि नफ्यासाठी ती विकू शकता, असेही पंतप्रधान म्हणाले.

 

 

* * *

S.Patil/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2095570) Visitor Counter : 11