युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी खो-खो विश्वचषक 2025 विजेत्या संघांचा केला सत्कार; देशाचा अभिमान वाढवल्याबद्दल केला खेळाडूंचा गौरव
Posted On:
22 JAN 2025 10:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जानेवारी 2025
केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री तसेच कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज नवी दिल्ली येथे खो-खो विश्वचषक 2025 चे विजेतेपद पटकावणाऱ्या संघांचा सत्कार केला. भारतीय पुरुष आणि महिला संघांनी 19 जानेवारी रोजी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये नेपाळचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला आणि पहिल्या खो-खो विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले.
या सोहळ्यात पुरुष व महिला संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया (केकेएफआय)चे अध्यक्ष सुधांशु मित्तल आणि क्रीडा मंत्रालय तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
परंपरागत खेळांच्या देशात पुन्हा एकदा होत असलेल्या पुनरुत्थानावर भाष्य करताना डॉ. मांडविया म्हणाले, "परंपरागत खेळ आपल्याला, एकात्मता व महत्त्वाचे म्हणजे आपल्या सांस्कृतिक क्रीडामूल्यांचे दर्शन घडवतात. या परंपरागत खेळांच्या समृद्धीतून जग खूप काही शिकू शकते."
ते पुढे असेही म्हणाले की,"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राष्ट्रीय व्यासपीठांवर नेहमीच सांगितले आहे की परंपरागत खेळांना उत्तम संधी द्यायला हवी. आता आपले संघ केवळ उत्तम संधी मिळवत नाहीत तर यशही मिळवत आहेत. मी आपल्या खेळाडूंच्या जिद्दीचे आणि दोन्ही संघांच्या परंपरागत कौशल्यांचे अभिनंदन करतो."
भारताने 2036 च्या ऑलिंपिकचे यजमानपद मिळवण्यासाठी आपण बोली लावली असल्याचा उल्लेख करताना, डॉ. मांडविया म्हणाले की,"यासाठी सर्व संबंधित घटकांकडून सुरू असलेला यशाचा प्रवाह कायम राहिला पाहिजे. 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धा हे आपले पुढील लक्ष्य आहे.आम्ही जसा खो-खो विश्वचषक उत्तम प्रकारे आयोजित केला, तसेच या खेळाडूंना आशियाई क्रीडा स्पर्धेतही खेळण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. 2036 च्या ऑलिंपिकमध्ये खो-खो चा समावेश करण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी खेळाडू व प्रशिक्षकांनी सातत्याने चांगली कामगिरी केली पाहिजे त्याचप्रमाणे फेडरेशनचे व्यवस्थापनही उत्तम असणे आवश्यक आहे. क्रीडा मंत्रालय खेळाडूंच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा करण्यासाठी पाठिंबा देत राहीलच."
नवी दिल्ली येथे झालेल्या खो-खो विश्वचषक 2025 स्पर्धेत 23 देश सहभागी झाले होते. यामध्ये भारताने विजेतेपद पटकावले. या यशामध्ये जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या एक महिन्याच्या विशेष शिबिराचा देखील महत्त्वाचा वाटा आहे.
S.Patil/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2095294)
Visitor Counter : 9