विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
आयआयजीचे कुलाबा संशोधन केंद्र करणार 180 वर्षांहून अधिक जुन्या भूचुंबकीय वेधशाळेतील संग्रहित डेटा संचांचे डिजिटायझेशन
Posted On:
20 JAN 2025 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 20 जानेवारी 2025
आयआयजी अर्थात भारतीय भूचुंबकीय संस्थेच्या कुलाबा संशोधन केंद्राचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे(DST) सचिव प्राध्यापक अभय करंदीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या केंद्राचे उद्घाटन करताना, प्राध्यापक करंदीकर यांनी प्राचीन उपकरणांच्या मदतीने भू-चुंबकीय डेटाचे दस्तऐवजीकरण करून ठेवलेल्या या ऐतिहासिक स्थळाची पाहणी केली. गेल्या काही वर्षातील भू-चुंबकीय वादळांची नोंद या उपकरणांद्वारे करण्यात आली असून हे संशोधन भारतातील वैज्ञानिक संशोधनाच्या इतिहासाचा एक भाग बनले होते.
भारतातील सर्वात जुन्या वेधशाळांपैकी एक असलेले हे संशोधन केंद्र, 180 वर्षांहून जुन्या कुलाबा भूचुंबकीय वेधशाळेतील संग्रहित डेटा संचांचे डिजिटायझेशन करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. हे केंद्र एका ऐतिहासिक स्थानावर वसलेले असून भारतातील भूचुंबकीय क्षेत्रातील बदलांचे पहिले नियमित निरीक्षण या ठिकाणी करण्यात आले होते.
या प्राचीन इमारतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऐतिहासिक भूचुंबकीय वादळांची सखोल माहिती मिळवली जाणार आहे.
भविष्यातील भूचुंबकीय वादळांच्या शक्यता तपासून पाहण्यासाठी एक मानक म्हणून ते काम करेल. या केंद्रात अंतराळातील हवामान आणि संबंधित क्षेत्रातील घडामोडींचे देखील संशोधन केले जाणार आहे.
1841 मध्ये पहिल्यांदा कुलाबा भूचुंबकीय वेधशाळेने सातत्यपूर्ण चुंबकीय निरीक्षणांची नोंद केली होती, तेव्हापासून 180 वर्षांपेक्षा जास्त काळ सातत्यपूर्ण चुंबकीय डेटा उपलब्ध झाला आहे.
डॉ. नानाभॉय मूस हे कुलाबा चुंबकीय वेधशाळेचे पहिले भारतीय संचालक होते. त्यांनी चुंबकीय डेटा आणि विविध भूचुंबकीय घटनांचे एका खंडात संकलन केले ज्याला मूस व्हॉल्युम म्हणून ओळखले जात असून ऐतिहासिक भूचुंबकीय घटनांचा अभ्यास करण्यासाठी त्याचा जगभर वापर केला जात आहे.
मॅग्नेटोग्राम्स, मायक्रोफिल्म्स आणि व्हॉल्युम्स यांच्या माध्यमातून ही वेधशाळा चुंबकीय डेटाचे जतन करते आणि भारतातील 01-02 सप्टेंबर 1859 रोजीच्या अति-तीव्र कॅरिन्ग्टन घटनेची नोंद करणारी ती एकमेव वेधशाळा आहे. यावेळी चुंबकीय क्षेत्रात 1600 nT ने घट झाली होती.
हे केंद्र आंतरराष्ट्रीय भूचुंबकीय डेटा साठवणाऱ्या केंद्रांना भूचुंबकीय क्षेत्रातील बदलांची रियल टाईम माहिती देखील उपलब्ध करून देते.
आयआयजीचे संचालक प्राध्यापक ए. पी. डिमरी यांनी या संस्थेच्या विविध कामांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये पृथ्वीच्या भूचुंबकीय संरक्षक कवचाचा अभ्यास, पृथ्वीच्या मॅग्नेटोस्फिअरमधील वेव्ह पार्टिकल इंटरॅक्शनचा अभ्यास, तलावातील गाळांच्या गाभ्यांचे संकलन, ईशान्य हिमालयीन प्रदेशातील एकात्मिक भूभौतिकीय अभ्यास आणि इतर कामांच्या माहितीचा समावेश होता.
कुलाबा वेधशाळेनंतर 1971 मध्ये डीएसटीची एक स्वायत्त संस्था म्हणून आयआयजीची स्थापना झाली. हे केंद्र भूचुंबकशास्त्र, जियोफिजिक्स, वातावरणीय पदार्थविज्ञान, अंतराळ पदार्थविज्ञान आणि प्लाझ्मा फिजिक्स यांच्या मूलभूत आणि उपयोजित संशोधनाला समर्पित आहे आणि सूर्य-सौर वारे- मॅग्नेटोस्फिअर-आयनोस्फिअर-ऍटमॉस्फिअऱ(वातावरण) यांच्या सर्व पैलूंचा समावेश असलेले आंतरशाखीय संशोधन करते. हे केंद्र भारतातील 13 चुंबकीय निरीक्षण वेधशाळांचे परिचालन करत असून सर्वसमावेशक भूचुंबकीय डेटा जतन करणारे एक जागतिक भूचुंबकीय डेटा केंद्र आहे.
आयआयजीमध्ये होणारे संशोधन अतिशय महत्त्वाचे असून अंतराळ हवामान भाकिते, पर्यावरणीय देखरेख आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्यासह महत्त्वाचे सामाजिक परिणाम साध्य करत आहे.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2094653)
Visitor Counter : 11