संरक्षण मंत्रालय
राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र ही भारताची संपत्ती आहे, त्यांनी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करावेत: राष्ट्रीय छात्र सेना प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 येथे संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन
Posted On:
20 JAN 2025 6:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) छात्रांनी कठोर परिश्रम करावेत, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. संरक्षण मंत्र्यांनी 20 जानेवारी 2025 रोजी दिल्ली कॅन्ट येथील राष्ट्रीय छात्र सेना प्रजासत्ताक दिन शिबिराला भेट देऊन छात्रांना संबोधित केले, त्यावेळी या संबोधनात संरक्षण मंत्र्यांनी छात्र ही भारताची संपत्ती असल्याचा उल्लेख केला. छात्र सेनेचे छात्र , मग ते कोणत्याही क्षेत्रात काम करत असो, एनसीसीने त्यांच्या अंगी बाणवलेल्या 'नेतृत्व', 'शिस्त', 'महत्वाकांक्षा' आणि 'देशभक्ती' या गुणांद्वारे राष्ट्र उभारणीत महत्त्वापूर्ण योगदान देतात, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
छात्रांची वचनबद्धता, शिस्त आणि राष्ट्रावरील प्रेम या गुणांबद्दल संरक्षण मंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. भारताने एक देश म्हणून जे काही साध्य केले आहे ते सर्वांच्या, विशेषतः तरुणांच्या कठोर परिश्रमातून सकार झाले आहे, हे सिंह यांनी अधोरेखित केले.
छात्रांना नेतृत्वाचा खरा अर्थ समजावून सांगताना, संरक्षण मंत्र्यांनी 26/11 च्या मुंबई हल्ल्यादरम्यान मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या वीर बलिदानाचा उल्लेख केला. मेजर उन्नीकृष्णन यांचे बलिदान देशाला प्रेरणा देत आहे, असेही ते म्हणाले.
आपल्या भोवतालची परिस्थिती सतत बदलत असते आणि बदलती परिस्थिती प्रत्येक वेळी नवीन दृष्टिकोन आणि नवीन कौशल्याची मागणी करत असते, त्यामुळे छात्रांनी शिकण्याची प्रक्रिया अखंड सुरु ठेवावी असे आवाहन त्यांनी केले. जुन्या दृष्टिकोनाने किंवा जुन्या कौशल्याने नवीन समस्या सोडवल्या जाऊ शकत नाहीत, म्हणून बदलत्या काळानुसार स्वतःत बदल घडवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. भविष्यावर नजर ठेवून, कौशल्य विकासाला देखील प्राधान्य दिले पाहिजे, असे ते म्हणाले. 'कधीही हार मानू नका' ही वृत्ती यशाची गुरुकिल्ली आहे असे सांगून, प्रत्येक आव्हानाला आत्मविश्वासाने आणि अपयशाची भीती न बाळगता तोंड देण्याचे आवाहन संरक्षण मंत्र्यांनी केले.
छात्रांना मोठी स्वप्ने पाहण्यास, त्यांचे खरे चरित्र्य आणि धैर्य जाणून घेण्यास आणि ते साध्य करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करण्यास प्रोत्साहित करून संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
या कार्यक्रमात झालेल्या 'अलंकरण समारंभात' छात्र सेनेच्या छात्रांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी आणि कर्तव्याप्रती समर्पणासाठी संरक्षण मंत्री पदक आणि प्रशंसापत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.या वर्षी, केरळ आणि लक्षद्वीप संचालनालयाचे उपाध्यक्ष अंडर ऑफिसर तेजा व्ही.पी आणि ईशान्य प्रदेश संचालनालयाचे वरिष्ठ अंडर ऑफिसर आर्यमित्र नाथ यांना संरक्षण मंत्री पदक प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र संचालनालयाचे सार्जंट मनन शर्मा तसेच मध्य प्रदेश आणि छत्तीसगड संचालनालयाचे सार्जंट राहुल बघेल यांना प्रशंसापत्रे प्रदान करण्यात आली.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2094582)
Visitor Counter : 25